आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रघुरामांची (अ) सत्यवाणी (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरोबर १० वर्षांपूर्वी २००८ च्या आर्थिक संकटाचे भाकीत करणारे आणि आज भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले रघुराम राजन यांच्या गेल्या आठवड्यात लंडन बिझनेस स्कूलच्या भाषणाने जग हादरून गेले आहे. निर्मितीचा आधार नसलेल्या नोटा छापण्याचा उद्योग जगाच्या मुळावर उठू शकतो आणि त्यातून १९२९ ला सुरू झालेली आणि पुढे तब्बल दशकभर ठाण मांडून बसलेल्या महामंदीसारखा धोका जगात निर्माण होऊ शकतो, असे विधान राजन यांनी केले होते. सर्व जग अर्थकारणाने असे काही बांधले गेले आहे आणि त्यात काय चढउतार होतात, यावर सर्व ठरू लागल्याने जगभर त्याचे पडसाद ऐकू येऊ लागले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अर्थतज्ज्ञांनी राजन यांचे म्हणणे खोडून काढले आहे, तर राजन ज्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे नेतृत्व करतात, त्या बँकेनेही राजन यांना ‘तसे’ म्हणायचे नव्हते, त्यांना वेगळे काही म्हणायचे आहे, असे म्हणून राजन यांच्या विधानाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या आठवड्यात राजन लंडनमध्ये बोलत होते, तेव्हा युरोपच्या रंगमंचावर दुसरा एक खेळ सुरू होता, त्याचे नाव ग्रीस. तो देश कर्जफेडीसाठी काय करणार, त्याला काय मदत करता येईल, असे प्रयत्न युरोपियन युनियन करत होती, मात्र तिचे ते प्रयत्न फोल ठरल्याच्या बातम्या येत होत्या. आता कर्ज फेडण्याची ३० जूनची मुदत ग्रीस पाळणार का, यावर जगाचे लक्ष लागले आहे. ग्रीस दिवाळखोरी जाहीर करेल, असे गृहीत धरून जगभरातले शेअर बाजार सोमवारी कोसळले. त्यात भारताचाही समावेश आहे; पण कोसळले म्हणताना ते अखेरच्या टप्प्यात सावरलेही! जगात आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक ठकशाही एकत्र आल्याने काही सेकंदांना जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला पैसा फिरतो आहे. त्यावर जगातल्या काही शहाण्या माणसांचे नियंत्रण असते तर घाबरण्याचे काही कारण नव्हते, पण त्यावर आज ठकांचे नियंत्रण असल्याने भविष्यात नेमके काय होईल, हे आज कोणी सांगू शकत नाही. असे असताना रघुराम राजन यांनी भाकीत केले आहे! त्यांची ही वाणी खोटी ठरो, अशीच प्रार्थना जगाचे नागरिक करतील खरे; पण जगाने काहीच काळजी नाही घेतली तर ती वाणी खरी ठरू शकते, हे समजून घेतले पाहिजे.

१९२९ म्हणजे तब्बल ८५ वर्षांपूर्वी जी महामंदी आली होती, तिची सुरुवात शेअर बाजारातून झाली होती. अमेरिकेतील शेअर बाजार कोसळला होता. आपल्याच देशाच्या वस्तू जगात विकल्या जाव्यात, यासाठी आपल्या चलनाचे मूल्य कमी करण्याची चढाओढ सुरू झाली आणि त्यातून विकसित देशांनी पायात पाय घालून एकमेकांना पाडले, त्यातून जगातील सर्वात भीषण अशा मंदीचा जन्म झाला. अर्थात ती मंदी नेमकी कशामुळे आली, याविषयी जगाचे अजून एकमत झालेले नाही. त्यानंतर या शतकात जगाने अनुभवले ते २००८ चे आर्थिक संकट. या दोन्हीची सुरुवात झाली ती आर्थिक महासत्ता म्हणविणाऱ्या अमेरिकेतून. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करणाऱ्या अमेरिकेने चलनाचा आणि निर्मितीचा संबंध तोडला आणि पैसा कमावण्यासाठी ‘फायनान्स मॉडेल’ नावाचे खेळणे तयार केले. हे खेळणे ज्याला खेळायचे, त्याला अमेरिकन डॉलरची किल्ली हाती असणे बंधनकारक केले आणि त्यातून डॉलर छपाईचा खेळ जगात रंगला. आज जगातील प्रत्येक देश आपल्या तिजोरीत डॉलरचा साठा पाहिजे, म्हणून वाटेल ते करायला तयार आहे. चलन छापण्याची ही स्पर्धा थांबली पाहिजे, असे राजन यांना म्हणायचे आहे आणि ती न थांबली तर महामंदीचा धोका आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. अर्थतज्ज्ञांचे इशारे किती गंभीरपणे घ्यायचे, हे आज जनतेला कळेनासे झाले आहे, कारण इतकी परस्परविरोधी विधाने ते करत आहेत की त्यातून सत्याचा शोध घेणे शक्य नाही.

रघुराम हे एका दशकापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख होते. ती संस्था जगाचे अर्थकारण नियंत्रित करते, असे म्हटले जाते. याचा अर्थ त्या व्यवस्थेत रघुराम होतेच. पदावर असल्याने जबाबदारी येते, हे बरोबर आहे. मात्र, जग संकटात सापडणार असेल तर अशा जबाबदार अर्थशास्त्रज्ञाकडून अधिक अपेक्षा आहेत. या संकटाचा सामना कसा करायचा, हे मात्र आपण सांगू शकत नाही, असेही ते म्हणतात आणि जगाला त्यासाठी एकत्र येण्याचा सल्ला देतात. महामंदीच्या वेळी जगाने महायुद्धाचा मार्ग निवडला. त्या मार्गावर जगाने जाऊ नये, असे राजन यांना म्हणावयाचे असावे; पण तरीही ते एक सत्य सांगण्यास विसरलेच. निर्मिती आणि संपत्तीचे पारडे गेली तीन दशके सातत्याने चीन, भारत अशा विकसनशील आशिया खंडातील देशांकडे झुकते आहे. विकासाचे इंजिन जर हे देश झाले तर रघुराम राजन यांची भविष्यवाणी खरी ठरण्याचे काही कारण नाही. आणि तसेच होवो, अशी प्रार्थना करूया!
बातम्या आणखी आहेत...