आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तात्पुरती मलमपट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यातील 44 टोल बंद करण्याचा निर्णय घेताना आपल्याला लोकभावनेची कदर असल्याचा आभास सरकारने निर्माण केला असला तरी वास्तवात हा निर्णय म्हणजे टोलप्रश्नी हैराण झालेल्या सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यांत धूळफेकच आहे. कारण मुळात यातले बहुसंख्य टोल हे अल्प उत्पन्नाचे असून त्याविषयी कुणाची फारशी तक्रारच नव्हती. लोकांचा खरा आक्षेप आहे तो अव्यवहार्य, अनावश्यक आणि अतिरिक्त टोलवसुलीला. आजच्या गतिमान जीवनात प्रवास जलद, सुरक्षित व सुकर होण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा अर्थात चौपदरी रस्ते, उड्डाणपूल वगैरे बांधणे आवश्यक आहे. त्याच्या उभारणीसाठी लागणारा प्रचंड निधी सरकारकडे नसल्याने खासगीकरणाच्या माध्यमातून यासाठी पैशाची उभारणी करावी व त्याबदल्यात संबंधितांना टोलवसुलीचा पर्याय द्यावा, हे धोरण ठरले. व्यवहार्य दृष्टिकोनातून पाहता त्याला कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. पण वरवर दिसतो तेवढा हा मामला सरळ नाही. मुळातच प्रकल्पाची किंमत फुगवणे, टोलची दरनिश्चिती, कालमर्यादा, वाहन संख्येतील तफावत अशा अनेक गैरमार्गांनी या प्रक्रियेत अव्वाच्या सव्वा मलिदा काढणार्‍या हितसंबंधीयांची एक साखळी तयार होत गेली. त्यातून सत्ताधारी, प्रभावशाली राजकारणी, निर्णयक्षम अधिकारी, कंत्राटदार, वसुली यंत्रणा असा एक माफिया अस्तित्वात आला. मग सर्वत्र टोल रस्त्यांचे पेव फुटले. रस्तोरस्ती त्याचा जाच सर्वसामान्यांना होऊ लागला. थोड्याशा अंतरासाठीही प्रत्येक वेळी शे-पन्नास रुपयांना भुर्दंड पडू लागला. हा प्रकार म्हणजे सरळसरळ गोलमाल दिसत असल्याने त्याबाबत ओरड सुरू झाली. मात्र, त्यामध्ये पारदर्शकता आणण्याचे कोणतेही प्रयत्न सरकारने केले नाहीत. कालांतराने टोलप्रश्नी राजकारणही सुरू झाले, ठिकठिकाणी आंदोलने छेडली गेली. लोकसभा निवडणुकीतसुद्धा तो प्रचाराचा मुद्दा बनला. हे सारे पाहता, अल्प उत्पन्नाचे टोल बंद करण्याचा निर्णय घेऊन लोकांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचा आव राज्य सरकारने आणला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रस्ते विकास महामंडळाच्या टोलनाक्यांवर एस.टी. बसेसना टोलमाफी देण्याची तरतूदही त्यामध्ये आहे. पण त्यामुळे फार काही साध्य होईल, अशी स्थिती नाही. परिणामी तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची तात्पुरती मलमपट्टी म्हणूनच या निर्णयाकडे पाहावे लागेल.