आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युतीची बोटे तुपात! (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आणि देशातल्या काही लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नुकतेच मतदान झाले होते. ८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता पंतप्रधानांनी केलेल्या ऐतिहासिक घोषणेच्या पार्श्वभूमीवर या निवडणूक निकालांबाबत उत्सुकता होती. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातली जनता दुखावली असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून केला जात होता. संसदेच्या दोन्ही सदनांमध्येही याच मुद्द्यावरुन विरोधकांनी गदारोळ माजवला आहे. नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनता किंवा विधान परिषदेसाठी मतदान करणारा प्रस्थापित राजकीय वर्तुळातला वर्ग नाराज झाला असल्याचे निकालातून दिसलेले नाही. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूतील निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांनी बाजी मारली. त्रिपुरातल्या पोटनिवडणुकीत डाव्यांनी ताकद दाखवली. बंगाल, तामिळनाडू आणि त्रिपुरातल्या निवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपला अपेक्षा नव्हतीच. मात्र, सत्ताधारी असलेल्या मध्य प्रदेश व आसाम या राज्यांमधल्या पोटनिवडणुकीत जनतेने भाजपच्या बाजूने दिलेला कौल पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुखावणारा असेल. या जागांवरील विजय-पराजयामुळे सत्तेची समीकरणे अजिबातच बदलणारी नाहीत. मात्र, नोटबंदीच्या विरोधात लोकांनी कौल दिलेला नाही, याचा मोठा आनंद भाजप मिरवू शकेल. सर्वसामान्य जनता भयंकर त्रस्त असल्याचा दावा करत संसदेचे कामकाज रोखणाऱ्या विरोधकांनीही या निकालातून बोध घ्यावा. भ्रष्टाचाऱ्यांचा काळा पैसा बाहेर येणार असेल तर काही काळ त्रास सहन करण्याची तयारी असल्याचा संदेशच जणू या पोटनिवडणुकांनी दिला, असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरू नये. महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या सहा निवडणूक निकालांमधूनही हाच संदेश मिळाला आहे. खरे म्हणजे राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक असलेल्या वर्गाने या निवडणुकीसाठी मतदान केले. सत्ताधारी भाजप-शिवसेनेने सहापैकी जळगाव, यवतमाळ आणि भंडारा-गोंदिया या जागा जिंकण्यात यश मिळवले हे दखलपात्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हुरूप वाढवणारा हा निकाल आहे.

रोज उठून एकमेकांविरोधात जाहीर कलगीतुरा करणाऱ्या भाजप-सेनेने प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात मात्र एकदिलाने काम केल्याचे यावरून सिद्ध झाले. अशीच एकी विरोधात असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने न दाखवल्याने त्यांच्या पायावर धोंडा पडला. वास्तविक प्रत्येक मतदारसंघातील कागदावरील संख्याबळ लक्षात घेता दोन्ही काँग्रेसना मिळून किमान पाच जागा सहज जिंकता आल्या असत्या. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात समेट न होण्यात दोन्हीकडच्या नेत्यांचा अहंकार जितका आड आला, तितकीच महत्त्वाची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांचीही होती. पुणे, सातारा-सांगली या अजिबातच ताकद नसलेल्या जागा राष्ट्रवादीसाठी सोडून फडणवीसांनी जळगाव, भंडारा-गोंदिया आणि यवतमाळ पदरात पाडून घेतले.
सिंचन घोटाळ्याचा भुंगा दाखवत यवतमाळमधल्या विद्यमान राष्ट्रवादी आमदाराला माघार घ्यायला लावून यवतमाळची जागा शिवसेनेला देत फडणवीसांनी मित्राचीही काळजी घेतली. हा धूर्तपणा काँग्रेस-राष्ट्रवादीने दाखवला नाही. काही महिन्यांपूर्वीच पंढरपुरातील विधान परिषदेची जागा गमावण्याची नामुष्की अजित पवारांवर आली होती. तशीच दारुण अवस्था सांगली-साताऱ्यात झाली. साताऱ्यात राष्ट्रवादीने पृथ्वीराज चव्हाणांवर गोळीबार केला हे खरे असले तरी येथील विजयाचे श्रेय मात्र पतंगराव कदमांना द्यावे लागेल. विरोधी मतांची बेरीज सव्वाशेपेक्षा जास्त असूनही कदमांनी राष्ट्रवादीला लोळवले. साताऱ्यातले अपयश राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागणारे आहे. नांदेडमध्येही राष्ट्रवादीने भाजप-सेनेशी हातमिळवणी करत अशोक चव्हाणांना मात देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यातून सर्वाधिक नुकसान झाले ते फक्त राष्ट्रवादीचे. अजित पवारांची रणनीती राष्ट्रवादीच्या फायद्याची ठरत नसल्याचे यातून सिद्ध झाले. पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादीचे मुख्य शत्रू आहेत की भाजप-सेना याचा निर्णय अजित पवारांना घ्यावा लागेल. डिसेंबरमध्ये विधान परिषदेच्या आणखी पाच जागांसाठी निवडणूक होईल. त्यातही काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांना अपशकुन करण्याचा प्रयत्न केला तर युतीचाच फायदा होईल. नव्या विधान परिषदेतील युतीचे संख्याबळ आता राष्ट्रवादीपेक्षा जास्त झाले आहे. विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे असले तरी कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादीला सोबत घेत कामकाज रेटण्याची संधी सत्ताधाऱ्यांना आता मिळाली आहे. सत्ताधाऱ्यांसाठी ही निवडणूक फायद्याची ठरली असली तरी एका गोष्टीवर मात्र शिक्कामोर्तब झाले. जाणत्या वरिष्ठांचे सभागृह अशी ख्याती असलेल्या परिषदेत निवडून जाण्यासाठी लक्ष्मीचा वरदहस्त जास्त महत्त्वाचा ठरला. अनुभवसंपन्न,व्यासंगी आणि महाराष्ट्रहिताची कळकळ असणाऱ्या वरिष्ठांचे सभागृह अशी नवी ओळख कधी निर्माण होणार?
बातम्या आणखी आहेत...