आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Water Shortage In Maharashtra, Divya Marathi

पाण्यासाठी महिलांची असह्य वणवण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाण्यासाठी डोक्यावर व कडेवर हंडे घेऊन गावाबाहेर जाणाऱ्या बायाबापड्या हे भारताच्या सर्वच राज्यांमध्ये जवळपास वर्षभर दिसणारे चित्र. नेहमी दिसत असल्याने त्याचे कुणालाच फारसे काही वाटत नाही. पण ग्रामीण भागातल्या निम्म्या बायकांना पाण्यासाठी एका वर्षात १७३ किमी चालावे लागते, ही आकडेवारी समोर आल्यावर त्याची दखल घ्यावीच लागते. पाणी आणण्याचे वा विहिरीतून उपसून भरून ठेवण्याचे काम करणारा पुरुष हे अत्यंत दुर्मिळ चित्र आहे, म्हणूनच सांख्खिकी मंत्रालयाने केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणातून समोर आलेली ही आकडेवारी फक्त महिलांचा स्पष्ट उल्लेख करते. या सर्वेक्षणातून असे दिसते, की दुरून पिण्याचे पाणी आणावे लागणाऱ्या महिलांचा वर्षातील तब्बल २७ दिवस एवढा काळ या कामात जातो. ही आकडेवारी आहे दोन वर्षांपूर्वीची. यंदा अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस अजूनही न झाल्याने त्यात काही तासांची भर नक्कीच पडली असेल. पाण्यासाठी बायाबापड्या दररोज किमान २०० मीटर आणि कमाल पाच किलोमीटर एवढं चालतात, शिवाय पाणवठ्याजवळ त्यांची १५ मिनिटं तरी मोडतातच. २७ दिवस म्हणजे वर्षातला जवळपास एक महिना पाणी आणण्यात जातो. म्हणजे या बायका तेवढे दिवस कामावर जाऊ शकत नाहीत आणि त्यांना तेवढ्या दिवसांच्या रोजगारावर पाणी सोडावे लागते. तसेच दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जाऊ लागल्याने त्यांना पाणी काढण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. अनेकदा पाणी दूषित असते ते वेगळेच. ते शुद्ध करण्यासाठी आणखी वेळ द्यावा लागतोच. हे चित्र अनेक मोठ्या शहरांमधल्या वस्त्यांमधूनही दिसून येते, तिथे फारसे चालावे लागत नसेल कदाचित. परंतु नळाला पाणी अत्यंत कमी वेळ येते आणि ते भरण्यात खूप वेळ खर्ची पडतो. अनेक घरांमधून मुलींना या पाणी भरण्याच्या कामामुळे शाळा सोडावी लागते. यावरूनच घराघरांत स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा होणे किती आवश्यक आहे, ते लक्षात येते. पाऊस बेभरवशाचा असला तरी असलेल्या पाण्याचे योग्य वाटप तरी भरवशाचे झाले पाहिजे एवढे नक्की.