आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शब्दसृष्टीतील खेळीया! (संपादकीय)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेक्सपिअरच्या ४००व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने जगात सर्वत्र अनेक कार्यक्रम साजरे होत आहेत. स्ट्रॅटफोर्ड या त्याच्या गावी तर कार्यक्रमांची रेलचेल आहे. लंडनमधील संग्रहालयात प्रदर्शने, व्याख्याने आहेत. शेक्सपिअरचे आयुष्य कसे गेले यावरील संशोधन अद्याप थांबलेले नाही. त्याच्या मृत्युपत्राची वैज्ञानिक तपासणी करून काही नवे निष्कर्ष काढले जात आहेत. ग्रंथ प्रकाशक संशोधनाच्या नव्या आवृत्त्या काढीत आहेत. शेक्सपिअरने किती कमाई केली यावर तपशीलवार संशोधन करून पुस्तकही प्रकाशित झाले आहे. शेक्सपिअरच्या नाटकांचा नवा अर्थ लावून होणाऱ्या प्रयोगांना तर अंत नाही. ब्रिटनपेक्षा अमेरिकेत अधिक उत्साह आहे. जगात इंग्रजी भाषा जेथे पोहोचली तेथील अभिजनवर्गावर शेक्सपिअर विराजमान झाला. इंग्रजी सत्तेचा अस्त झाला तरी त्याचे स्थान ढळले नाही. त्याच्या नाटकांची, कवितांची, त्याच्या शब्दकळेची मोहिनी अद्यापही कायम आहे.
शंभर वर्षंापूर्वी असेच वातावरण होते. १९१६मध्ये ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने शेक्सपिअरवर १० विशेष पुरवण्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामध्ये इमर्सन, डॉ. सॅम्युअल जॉन्सनपासून अनेक मान्यवरांचे लेख होते. शेक्सपिअरचे वागणे-बोलणे कसे होते यावर अतिशय माहितीपूर्ण लेख त्यामध्ये प्रसिद्ध झाला होता. ब्रिटन व अमेरिका यांच्यात सांस्कृतिक प्रेम नाही. मात्र, शेक्सपिअर दोघांनाही पसंत आहे. अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांवर शेक्सपिअरची मोहिनी आहे. जेफर्सन व अॅडम्स यांनी मुद्दाम स्ट्रॅटफोर्डला भेट देऊन शेक्सपिअरच्या थडग्याचे दर्शन घेतले होते. मॅक्बेथसारखे नाटक नाही, असे अब्राहम लिंकन म्हणत असे. क्लिंटन शेक्सपिअरचे चाहते आहेत व ओबामा यांनाही शेक्सपिअरच्या नाटकातील स्वगते तोंडपाठ आहेत. नेल्सन मंडेला यांनी आपल्या दीर्घ तुरुंगवासात फक्त शेक्सपिअरची नाटके संग्रही ठेवली होती. त्यातील अनेक प्रसंग ते सहकैद्यांना वाचून दाखवीत.
शेक्सपिअरची ताकद कशात आहे? त्याच्या जीवनदृष्टीत, नाटकाच्या रचनेत, मूळ कथेत की शब्दसौष्ठवात? इंग्रजांचे राज्य गेल्यानंतही तो टिकला तो त्याच्यातील साहित्य गुणांमुळेच. शेक्सपिअरने तशी कोणतीच जीवनदृष्टी दिली नाही, कारण जीवनाची सर्व अंगे त्याला मोहवीत होती. तो एकसुरी नव्हता. ३७पैकी ३५ नाटकांच्या कथा त्याने उसन्या घेतलेल्या आहेत. रोमिओ-ज्युलिएट व किंग लिअरवर पूर्वी नाटकेही आली होती. मात्र, मूळ कथेला शेक्सपिअरचा परिसस्पर्श झाला व ती अभिजात साहित्याचा एक भाग बनून गेली. याचे कारण त्या कथेतील वैश्विक सत्ये शेक्सपिअर लखलखीतपणे लोकांसमोर ठेवीत गेला. त्याने केलेल्या स्वभावचित्रणातून मानवी स्वभावाचे इतके कंगोरे लोकांसमोर आले की जणू प्रत्येक पात्र हे आपलेच एक रूप आहे, असे पाहणाऱ्याला वा वाचणाऱ्याला वाटावे. तो पंडित नाही, तो विश्लेषण करीत नाही, तो प्रबोधन करीत नाही, तो कोणत्याही विचारधारेचे समर्थन किंवा विरोध करीत नाही, शेक्सपिअर वाचल्याने आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीत, नवे तत्त्वज्ञान मिळत नाही, दु:खावर उपाय सापडत नाही, सुख वाढत नाही. तरीही त्याची संगत आपल्याला समृद्ध करून जाते. लेखक म्हणून त्याचा कोणताही अजेंडा नाही. तो जीवनाचे ते जसे आहे तसे दर्शन घडवितो आणि स्वत: त्यापासून मोकळा होतो. शेक्सपिअर त्याच्या साहित्यात सर्वत्र आहे आणि कुठेही नाही. इतके मोठे भांडार उघडे करूनही अलिप्त राहणे ही शेक्सपिअरची खासियत आहे. तो माणसे समोर ठेवतो, त्यांचे स्वभाव रेखाटतो, त्या स्वभावामुळे त्यांची होणारी फरपट दाखवितो, त्यातून छाती दडपून जावी अशा नाट्यकृती जन्माला येतात. मात्र हा त्यातून सहज बाहेर पडतो. हॅम्लेट व किंग लिअरसारख्या अजरामर शोकांतिका लिहितानाही शेक्सपिअर गाववाल्यांशी कोर्टकचेऱ्या करीत होता हे वाचले की आश्चर्य वाटते.
आत्मविलोपाची साधना त्याला जमली होती आणि त्यामुळेच त्याची पात्रे वैश्विक ठरली. जगण्याची सर्व दालने त्याने नाटकातून पुढे आणली. त्याने सुखात्मिका लिहिल्या, शोकांतिकाचे सर्वोच्च शिखर गाठले आणि त्यातून पुनर्रचना दाखविणाऱ्या रोमान्सेस लिहिल्या. १५८८मध्ये ‘ट्रॅजेडी ऑफ एरर्स’ पासून हा प्रवास सुरू होतो. हा प्रवास २०-२२ वर्षांचाच असला तरी त्याची झेप व खोली फार मोठी आहे. त्यामध्ये क्रूरकर्मा तिसरा रिचर्ड भेटतो, रोमिओ-ज्युलिएटचे निर्व्याज पण अपयशी प्रेम भेटते. मर्चंट ऑफ व्हेनिसमधील शॉयलॉक भेटतो, मध्येच हलकीफुलकी नाटके येतात, त्यानंतर हॅम्लेटपासून एक झंझावात सुरू होतो. मॅकबेथ, ऑथेल्लो, किंग लिअर पाहताना वा वाचताना भोवळ यावी असे प्रसंग समोर येतात. अखंड शोक यापलीकडे आयुष्याला अर्थ काय, असा प्रश्न आपल्याला पडतो. पण असा प्रश्न पाडणारा शेक्सपिअर तोपर्यंत पुढच्या टप्प्यावर गेलेला असतो व आपल्यापुढे ‘टेम्पेस्ट’ हे वेगळेच नाटक येते. ‘ओ ब्रेव्ह न्यू वर्ड’ अशा शब्दात जगाची पुनर्रचना होत असल्याचे संकेत नाटकात मिळतात. शेक्सपिअरसारखा पल्ला गाठणारे फक्त महाभारत. त्यामधील व्यक्तिरेखाही शेक्सपिअरच्या व्यक्तिरेखांइतक्याच अजोड. जीवन निरर्थक आहे इथपासून जीवनाला विलक्षण अर्थ आहे, असे सांगणाऱ्या.
माणसातील भावभावनांचे रसरशीत चित्रण पाहायचे असेल व माणसाला समजून घ्यायचे असेल तर शेक्सपिअर वाचण्याशिवाय पर्याय नाही. निदान शेक्सपिअर वाचण्यासाठी तरी इंग्रजी शिकलीच पाहिजे. सोप्या इंग्रजीतही आता शेक्सपिअर सांगितला जातो, पण खरी चव आहे ती मूळ शेक्सपिअरच्या भाषेत. त्याच्या भाषेचे शब्दकोशही आता उपलब्ध आहेत. शेक्सपिअरची नाटके आताच्या पिढीला क्वचित कंटाळवाणी वाटतील; पण शेक्सपिअरची नाटके ऐकली तर वेगळाच अनुभव येतो. काही चित्रपटही त्याची ताकद दाखवितात. द्वेष, असूया, खुनशीपणा, नागडा स्वार्थ, लसलसती वासना याचे लखलखीत दर्शन घ्यायचे असेल तर लॉरेन्स ऑलिव्हिए यांचा तिसरा रिचर्ड पाहावा. ‘मी खलनायकच होणार’ या प्रतिज्ञेने स्वत:ला बांधून घेतलेल्या रिचर्डच्या स्वभावातच नाट्य भरलेले आहे व शेक्सपिअरची अद््भुत भाषा ते आपल्यासमोर नागडेउघडे उभे करते. आपल्याला हवी ती सत्ता, हवी ती स्त्री, हव्या त्या मार्गाने हा रिचर्ड मिळवतो, पण अनेकांची छाटलेली मुंडकी त्याच्यासमोर फेर धरतात आणि धैर्यवान रिचर्डही स्वप्नात घाबरून उठतो. सर्व मिळाले पण प्रेम मिळाले नाही ही खंत त्याला शेवटपर्यंत सोडत नाही. A horse, a horse! My kingdom for horse! असे म्हणत त्वेषाने लढणारा रिचर्ड I shall despair. There is no creature loves me. And if I die, no soul will pity me असे उद््गार काढणारा रिचर्ड, प्रेमाविना सर्व व्यर्थ आहे ही जाणीव करून देतो.
शेक्सपिअर सापडतो तो त्याच्या भाषेमध्ये. त्याचे नाट्य फुलते ते त्याच्याच भाषेमध्ये. माणसाचे खरेखुरे रूप, त्यातील विविध रंग केवळ त्याच्याच शब्दांत आपल्या मनात घर करून टाकतात. He has daily beauty in his life, that makes me ugly हे इयागोचे वाक्य असूया, दुस्वास या आपल्या मनातील भावनांचे बावन्नकशी दर्शन घडवते. कॅशिअस या खलनायकाबद्दल सीझर म्हणतो, Cassius has lean and hungry look, he thinks too much, such men are dangerous. असे डेंजरस आत्मे आपल्या आजूबाजूलाही अनेक असतात. लोकशाहीतही लोक किती अधम असतात व व्यक्तिमहात्म्याच्या आहारी गेलात की लोकशाहीचाही विनाश कसा होतो हे सीझरमध्ये कळते. भारताने तर त्याचा विशेष अभ्यास केला पाहिजे. सीझर, हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लिअर, मॅकबेथची स्वगते आपल्याला सुन्न करून टाकतात. त्यातील कित्येक अजरामर झाली आहे व अनेकांना आजही तोंडपाठ आहेत. जगताना समोर येणाऱ्या अनेक पेचप्रसंगी ही स्वगते ओठावर येतात आणि निराशेची असूनही जगण्याची नवी प्रेरणा देतात. जग अर्थशून्य आहे हे शेक्सपिअर इतक्या सुंदरपणे सांगतो की माणसाला जगावेसे वाटते असे एका टीकाकाराने म्हटले आहे. हॅम्लेटबद्दल आपुलकी न वाटणारा संवेदनशील माणूस जगात असणे शक्यच नाही. प्रत्येक संवेदनशील माणसाला भेडसािणारे प्रश्न हॅम्लेटला पडतात. ते न सुटल्यामुळे तो आत्महत्या करतो. How weary, stale, flat and unprofitable, seems to me all the uses of this world ही भावना कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात डोकावतेच. O I die Horatio…. The rest is silence हे शेवटचे वाक्य त्यानंतर कित्येक महिने आपला कब्जा घेते. Life is the tale told by an idiot, full of sound and fury, signifying nothing हे मॅकबेथचे उद््गार उच्चारण्याची वेळ आपल्यावरही कधी ना कधी येतेच. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. शेक्सपिअर वाचला किंवा पाहिला की तो आपल्या सबोध व अबोध मनात पुरता घर करून राहतो. जागोजागी भेटतो. आनंदात, दु:खात, वेदनेत, हास्यात, जगाच्या घडामोडी पाहताना, शेक्सपिअर साथीला असतोच असतो. टेम्पेस्टमधील प्रॉस्पेरोच्या तोंडीही निरोपाचा क्षण आहे, पण तो निराशा आणणारा नाही तर काहीसा खेळकर आहे. तेथे खरा शेक्सपिअर भेटतो असेही वाटते. We are such stuff, as dreams are made on, and our little life, is rounded with sleep असे सांगत प्रोस्पेरो आपला निरोप घेतो. शेक्सपिअरची लेखणी या नाटकाशी थांबते. निद्रेमध्ये गुंडाळले स्वप्न या पलीकडे आयुष्याला काय अर्थ हे खरे असले तरी त्याआधी याच नाटकात मिरांडा या शेक्सपिअरच्या अतिशय संस्मरणीय नायिकेच्या तोंडी असलेले, How beauteous mankind is! O brave new world, या उद््गारातील सुंदर मानवजात हे दोन शब्द उल्हसित करतात.
पुलंच्या शब्दात सांगायचे तर ‘शेक्सपिअर हे मानवी जीवनातील अद््भुत आहे. हा नाटककार आहे, कवी आहे, स्रष्टा आहे, द्रष्टा आहे, जीवनाचा भाष्यकार आहे, कल्पनेच्या झुल्यावर झोके घेणारा अवखळ कलाकार आहे, विदूषक आहे, तत्त्वज्ञ आहे, थिएटरमध्ये हसायला, रडायला लावणारा हा एकांतात अंतर्मुख करतो. जीवनाची व्यर्थता सांगतो, तर लगेच जगण्याची उमेदही वाढवितो. घटकेत जीवनाचे कोडे उलगडतो, घटकेत गूढाच्या गुहेत नेऊन सोडतो.’
जगाला रंगमंच मानणाऱ्या या खेळीयाला कृतज्ञतेने प्रणाम!