Home | Editorial | Agralekh | editorial, agralekh

ग्रीक ट्रॅजिडी!

दिव्य मराठी | Update - Jun 23, 2011, 05:52 AM IST

एकेकाळी जगावर राज्य करण्याची स्वप्ने पाहणाºया ग्रीसवर आज त्याच जगापुढे मदतीसाठी हात पसरण्याची वेळ आलेली आहे.

  • editorial, agralekh

    एकेकाळी जगावर राज्य करण्याची स्वप्ने पाहणाºया ग्रीसवर आज त्याच जगापुढे मदतीसाठी हात पसरण्याची वेळ आलेली आहे. ग्रीसमध्ये खिस्तपूर्व काळापासून अभिजात रंगभूमी विकसित झाली व बहरली. त्यातील ‘ट्रॅजिडी’ (शोकांतिका) या नाट्यप्रकाराचा विलक्षण प्रभाव पडून ती ग्रीक ट्रॅजिडी म्हणून मान्यता पावली. ग्रीस देशावर जी आर्थिक दुरवस्था ओढवली हीदेखील एक प्रकारे ग्रीक ट्रॅजिडीच असून तिचा नवा अंक आता जागतिक पटलावर सुरू आहे. अ‍ॅरिस्टॉटल, सॉक्रेटिस, प्लेटो अशा महान विचारवंतांची परंपरा सांगणारा, पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा उद््गाता समजला गेलेला ग्रीस हा देश पार रसातळाला जाण्याच्या अवस्थेला पोहोचला तो तेथील अत्यंत बेजबाबदार राज्यकर्ते, बेलगाम कामगार संघटनांनी आंदोलने, संप यांच्या माध्यमातून चालविलेला धिंगाणा व आर्थिक बेशिस्त कारभारामुळे. जगाला शहाणपणाच्या गोष्टी सांगणाºया या देशातील राज्यकर्ते व जनता हेच शहाणपण हरवून बसले आहेत, याचे ही परिस्थिती द्योतक आहे. युरोपियन समुदायात ग्रीससह सामील झालेले देश हे स्वेच्छेने तसेच जागतिक अर्थव्यवस्थेतील अमेरिकेच्या दादागिरीला लगाम घालण्यासाठी एकत्र आले आहेत, तसेच युरो या सामायिक चलनात हे सर्व देश व्यवहार करतात. दोन महायुद्धांत युरोपला मोठी झळ पोहोचली असून त्यात तेथील देशांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर ही राष्ट्रे पुन्हा उभी राहिली व प्रगत देशांमध्ये जाऊन बसली. ग्रीसची अर्थव्यवस्थाही गेल्या दशकापर्यंत ठीकठाक होती. युरोपीय समुदायात असल्याचे फायदेही ग्रीसला मिळत होते. मात्र, या देशातील बेशिस्त कारभारामुळे ग्रीस देशाच्या सकल उत्पन्नाच्या १७० टक्के अधिक इतक्या प्रमाणात कर्जाच्या बोजाखाली दबला गेला आहे. या कर्जाच्या सापळ्यातून बाहेर काढण्यासाठी ग्रीसचे विद्यमान पंतप्रधान जॉर्ज पापेंद्रू यांनी आर्थिक कठोर शिस्तीचे उपाय योजले होते. त्यांचा अपेक्षित उत्तम परिणाम दिसेल अशी असलेली आशाही मावळू लागली आहे. दरम्यान ग्रीसच्या संसदेत आपल्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजुर करून घेण्यात पापेंद्रू यांनी राजकीय बाजी मारली आहे. शासकीय खर्चात सुमारे ७८ अब्ज युरो इतकी कपात सुचवणारा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात मंजूर करण्याकडे आता त्यांचे लक्ष्य लागले आहे. बेशिस्त कामगार, त्यांना भडकावणाºया ट्रेड युनियन, त्यामुळे बंद पडणाºया उद्योगांची वाढती संख्या व पर्यायाने वाढलेली बेकारी या सापळ्यात ग्रीस पुरता अडकला आहे. कर्जाच्या बोजातून ग्रीसला सोडविण्यासाठी युरोपियन समुदायाने यथाशक्ती प्रयत्न चालविले असून सुमारे १२ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत त्या देशाला दिली जाईल, असे दिसत असले तरी हे प्रयत्न तोकडे आहेत. युरोपीय समुदायामध्ये युरो हे सामायिक चलन असून त्यातील देशांना आर्थिक स्वायत्तता नाही व युरोपियन सेंट्रल बँकेच्या माध्यमातूनच व्याजदर ठरविले जातात. ही व्यवस्था लक्षात घेता आर्थिक दुरवस्थेतून बाहेर पडण्यासाठी ग्रीसच्या हातपाय मारण्यालाही काही मर्यादा पडतात हे लक्षात येते. ग्रीसमध्ये असंतुष्ट लोक रस्त्यांवर येऊन निदर्शने तसेच पापेंद्रू यांच्या नावाने शंख करीत आहेत. ग्रीस हा ज्वालामुखीच्या तोंडावर बसला असून त्यात आपला बळी जायला नको म्हणून चाणाक्ष पापेंद्रू यांनी गेल्या शुक्रवारी जॉर्ज पापाकॉन्स्टंटिनो यांना अर्थमंत्रिपदावरून हटविले व त्यांच्या जागी व्हेनिझेलोस यांची नियुक्ती केली. पण या साºया मलमपट्ट्या आहेत. ग्रीसमधील शेतकरी हे विलक्षण असंतुष्ट असून अन्नधान्याच्या किमती अधिक वाढवा तसेच सबसिडींमध्येही वाढ करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सगळीकडे अन्नधान्याच्या किमती कमी करा, अशी ओरड होत असताना या शेतकºयांनी या किमती वाढवा अशी केलेली मागणी विचित्रच आहे. मात्र, त्यामुळे आपल्या शेतमालाला अधिक भाव मिळून आर्थिक तंगीत तगून राहता येईल, ही एक वेडी आशा ग्रीसच्या शेतकºयांना आहे. उत्पादनात वाढ न करता केवळ रोख्यांची विक्री करून ग्रीस सरकारने भांडवलाची उभारणी केली व या रोख्यांच्या परतफेडीची वेळ आल्यावर त्या सरकारचे डोळे पांढरे झाले आहेत. ग्रीसमधील आर्थिक पेचप्रसंगाला अमेरिकेत आलेली मंदीही काही अंशी कारणीभूत ठरली होती. अमेरिकी डॉलरशी तगडी स्पर्धा करण्याच्या इर्षेने व सामायिक बाजारपेठ विकसित करण्याच्या मिषाने एकत्र आलेल्या युरोपीय देशांपैकी काही देश ग्रीसला मदत करण्याच्या बाबतीत कटकट करीत आहेत. यावरून युरोपीय समुदायातही एकसंघपणाची जाणीव नाही हे स्पष्ट होते. ग्रीस असो वा जर्मनी, तेथील नागरिक प्रथम स्वत:च्या कल्याणाचा विचार करतो. ग्रीसमधील आर्थिक कोंडीचा परिणाम शेजारच्या स्पेन, पोर्तुगाल, आयर्लंड या देशांवरही झाला आहे. पोर्तुगाल हा आर्थिक दुरवस्था ओढवण्याच्या संकटापासून सुदैवाने थोडक्यात वाचला आहे. मात्र, गळ्यापर्यंत बुडालेल्या ग्रीसला मदत करण्यास जर्मनी फारसा उत्सुक नाही. त्यामुळे शेजारी नाराज आणि दूरचेही कपाळाला आठ्या घालून, अशा संकटात सापडलेल्या ग्रीसच्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या १३ टक्के इतकी असलेली वित्तीय तूट कमी कशी करता येईल, याचा खल व प्रयत्न आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, अमेरिका व युरोपातील समृद्ध राष्ट्रे करीत आहेत. ग्रीसमधील आर्थिक पेचप्रसंगाला अमेरिकेत आलेली मंदीही काही अंशी कारणीभूत ठरली होती. ग्रीस या परिस्थितीतून कधी बाहेर येणार, हे आत्ता कोणीच ठामपणे सांगू शकणार नाही. ग्रीक ट्रॅजिडीचे सादर होत असलेले अंक पाहून उसासे टाकण्याशिवाय जागतिक समुदायाच्या हाती फारसे काही नाही.

Trending