आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अराजकाचे ढग (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसाममधील बोडो विरुद्ध उपरे बांगलादेशी मुस्लिम यांच्यातील संघर्षाने अखेर अखिल भारतीय व्याप्ती मिळवलीच. खरे तर संसदेच्या मान्सून अधिवेशनात याच मुद्द्यावरून भाजपला सत्ताधारी काँग्रेस पक्षावर शरसंधान करायचे होते; परंतु मध्येच लालकृष्ण अडवाणींनी केलेल्या असंसदीय व अश्लाघ्य टिप्पणीनंतर सोनियांनी जे दुर्गेचे रूप प्रकट केले त्यातून विरोधी पक्षाचे धाबे दणाणले आणि आसामच्या मुद्द्यावरून संसदेत घालावयाचा गोंधळ थिजला. मात्र, आता पुन्हा एकदा आसामच्या मुद्द्याने देशातील विविध ठिकाणी हिंसक मूळ धरायला सुरुवात केली आहे. आसाममध्ये बांगलादेशीयांच्या विरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद, बंगलोर आणि आपल्याकडील पुणे, नाशिक, मुंबई या शहरांमधील ईशान्येकडील विद्यार्थी व कामगारांना धमक्यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यातून या सर्व ईशान्येकडील नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणामुळे दररोज शेकडो, हजारो ईशान्यवासी आपापल्या राज्यांकडे परत फिरत आहेत. विविधतेत एकतेच्या प्रतिज्ञा इयत्ता पहिलीपासून शिकविल्या जाणा-या या देशात यापेक्षा दुसरे मोठे लांच्छन असू शकत नाही. मुळात ईशान्य भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या भारताच्या मुख्य भूमीपासून खूपच वेगळा आहे. ब्रिटिशांनी भविष्यातील भूराजकीय डावपेचांचा विचार करून हा भाग देशाला जोडला होता. या भागातील नागरिकांना देशाच्या प्रमुख भूभागामध्ये सांस्कृतिक समानतेची वागणूक मिळत नाही. मंगोलवंशीय असलेल्या या भारतीयांकडे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे येथील सुजाण नागरिक आजही नेपाळी, चिनी, कोरियन व तत्सदृश म्हणूनच पाहतात. त्यामुळे आधीच आपल्या राहत्या घरापासून, संस्कृतीपासून दूर कुठे तरी मुंबई-पुण्यात आलेले ईशान्येतील विद्यार्थी व कामगार हे कायमच एका दबावाखाली वावरत असतात. त्यातच आसामातील दंग्यांनंतर त्यांच्यावर सूड उगवला जाईल, अशा धमक्या त्यातील काही जणांना एसएमएसद्वारे, फेसबुकद्वारे जाहीररीत्या दिल्या जाऊ लागल्या. या धमक्या देण्यामागे नक्की कोण आहे, याचा काहीही थांग पोलिसांना लागलेला नाही. दुसरीकडे या धमक्या मुस्लिम धर्मांध गटांकडून येत असल्याचे गृहीत धरून हैदराबाद व बंगळुरूसारख्या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भगवी उपरणी वाटायला सुरुवात केली. हे उपरणे तुम्ही गळ्यात घाला, मग पाहतो आम्ही तुम्हाला कोण हात लावतो ते, असा उपदेशही या बजरंगींनी त्यांना केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. आता ईशान्येकडील राज्यातून येणारे मिझो, नागा, कुकी, खासी, मणिपुरी यातील बहुतांश विद्यार्थी वा कामगार हे धर्माने ख्रिस्ती असतात; पण त्यांच्या धर्माशी व संस्कृतीशी कुणाला कसले देणे-घेणे फारसे आढळत नाही. त्यातच आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी आसामी लोकांच्या सुरक्षेची हमी आम्ही आसाम सोडून इतर राज्यांमध्ये घेऊ शकत नाही, असे विधान केल्याची जोरदार अफवा या ईशान्येतील लोकांमध्ये पसरली. वास्तविकरीत्या असे कोणतेही विधान गोगोई यांनी केले नव्हते. मात्र, त्यानंतर ईशान्येतील नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना पसरली व त्यातूनच त्यांचे लोंढेच्या लोंढे पुन्हा आपापल्या राज्यांकडे निघाले. आता त्यांच्या मनातील ही असुरक्षिततेची भावना घालवून त्यांना ईशान्येबाहेर सुरक्षित वाटणे हे केवळ पोलिसांचे काम असू शकत नाही. त्यामुळे त्यांना आम्ही पोलिस संरक्षण देऊ, प्रत्येक विद्यापीठात पोलिसांच्या तुकड्या तैनात ठेवू, असल्या रेम्या डोक्याच्या कल्पनांनी हे होणे नाही. त्यांच्या मनातील असुरक्षितता वाढविण्यामागे एक ठोस राजकीय विचार आहे. हा राजकीय विचार भारतातील अशा अनेक घटकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागावी व त्यातून त्या छोट्या गटांनी हिंसेचा मार्ग पत्करावा असा आहे. भारतातील विविधतेतील एकता ही जशी आपल्या शेजारी राष्ट्रांना बोचणारी गोष्ट आहे तशी देशातील स्वत:ला बहुसंख्याक मानणा-यांनाही ही बोचणारी गोष्ट आहे. त्यामुळेच या गोष्टीचा विरोध हा राजकीय पातळीवरच करावा लागेल. ईशान्येतील विद्यार्थी असोत वा कामगार, ते आमचे बंधू-भगिनी आहेत. आम्ही सारे भारतीय असून आमच्या देशाच्या एकात्मतेसाठी प्रसंगी प्राणही पणाला लावण्याची आमची तयारी आहे, हे केवळ क्रमिक पुस्तकातील प्रतिज्ञेपुरते मर्यादित ठेवून चालणार नाही, तर सेक्युलर विचारधारा मानणा-या व राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना पक्ष म्हणून असे कार्यक्रम त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत राबवावे लागतील. दुर्दैवाचा भाग असा की, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना याबाबत कोणतेही सोयरसुतक नाही. आसामात काँग्रेसची सत्ता व राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा महाराष्ट्र सोडला की थेट मेघालयातच काँग्रेस मजबूत असताना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आसाम व मेघालय या राज्यांची राजधानी विचारलीत तर तीही सांगता येईल, असे वाटत नाही.
दुसरीकडे बांगलादेशीयांचा जो प्रश्न आसामच्या निमित्ताने उभा राहिला आहे, त्याकडे केंद्र सरकारला अत्यंत गांभीर्याने पाहावे लागेल. स्वातंत्र्याच्या आधीपासून बांगलादेशातून गरीब कामगार आसाममध्ये शेतमजूर म्हणून येत आहेत. स्वातंत्र्यानंतरही हे येणे सुरूच आहे. हातावर पोट घेऊन वेशी-सीमा ओलांडणे जगभरातच सुरू असते. मेक्सिकोमधून अमेरिकेत जाणा-यांची संख्या महासत्ता असलेली अमेरिकाही कमी करू शकलेली नाही. बांगलादेशात सध्या शेख हसीना वाजेद सत्तेवर आहेत. त्यांना बांगलादेशातील धर्मांध मुस्लिमांचा प्रचंड विरोध आहे. अशा वेळी आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुत्सद्देगिरी दाखवून त्यांना मदत करण्यात आपला दुहेरी फायदा आहे. एक तर बांगलादेशाची आर्थिक परिस्थिती सुधारली तरच हे लोंढे कमी होतील व दुसरीकडे बांगलादेशाची सत्ता धर्मांध शक्तींच्या हातात गेल्यास आणखी एका शेजा-याकडून डोकेदुखी सुरू होईल. काही दिवसांपूर्वी बांगलादेशातील पद्मा नदीवर पूल बांधण्यासाठी त्यांना हवे असलेले कर्ज देण्यास जागतिक बँकेने अचानक असमर्थता दर्शविल्यावर बांगलादेशाने भारताकडे आशेने पाहिले होते. मात्र, आपण त्यात नको तितका वेळ काढल्यावर चीनने तत्काळ त्यांना यासाठी मदत केली. तिस्ता नदीच्या पाणी वाटपाचा प्रश्न हा बांगलादेशासाठी अत्यंत कळीचा मुद्दा आहे; पण यूपीएमधील कचकचाट सम्राज्ञी ममता बॅनर्जी यांनी त्यात घातलेल्या खोड्याला पंतप्रधान सध्यातरी दबल्यासारखे वाटतात. हे सगळे मुद्दे या ना त्या कारणाने भारताच्या अंतर्गत प्रश्नांशी संलग्न आहेत. सध्या देशभरात आसामच्या निमित्ताने अस्वस्थता पसरविण्याचे काम ज्या शक्ती करीत आहेत, त्यांना शह देण्यासाठी काँग्रेस पक्षाने स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना सेक्युलर विचारधारेच्या आधारावर कामाला जुंपणे गरजेचे आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भविष्यातील देशहित लक्षात घेऊन बांगलादेशाशी सौहार्दाचे संबंध तयार करून चीन व पाकिस्तान यांना शह देणेही तितकेच गरजेचे आहे.