आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मजबूत इतना... दारासिंग जितना’ (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फँटम, सुपरमॅन, स्पायडरमॅनपासून ते आताच्या ‘ही मॅन’ आणि ‘पॉवर रेंजर’पर्यंत...शत्रूंचा नायनाट करणारी ही सगळी फायटर मंडळी. मार्केटिंगच्या अत्याधुनिक फंड्यामुळे घराघरांत पोहोचलेली. मात्र, तरीही काल्पनिकच. अस्सल, आपल्या मातीतला आणि पाहता क्षणीच शत्रूला धडकी भरवणारा या देशातला एकच रिअल हीरो म्हणजे दारासिंग. उगाच नाही ‘मजबूत इतना दारासिंग जितना’ ही म्हण गेल्या सहा दशकांपासून या देशात प्रचलित आहे. हा मजबूत जोड आता तुटलाय. वयाच्या 84व्या वर्षी एका अफाट ताकदीची अखेर झाली आहे. शेतकरी, कुस्तीगीर, अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक, लेखक आणि एक सच्चा माणूस ही दारासिंग यांची खरी ओळख. पिळदार शरीर, अंगापिंडाने भक्कम; पण मनाने तितकेच मृदू, संवेदनशील आणि सहृदय माणूस... पैलवान ते चित्रपट अभिनेता असा प्रवास करणारे दारासिंग हे मोठे अजब रसायन होते. वयाच्या 20व्या वर्षापर्यंत ज्या तरुणाचा कुस्तीशी काडीचाही संबंध नसतो, तो पठ्ठ्या वयाच्या 30व्या वर्षी राष्ट्रकुल पदक जिंकतो, भल्याभल्या पैलवानांना अस्मान दाखवतो. फक्त दोन चित्रपटांत पाहिलेला मल्ल सुमारे चार दशके सिनेसृष्टीत बहुरंगी-बहुढंगी भूमिका साकारतो. मधल्या काळात पुन्हा कुस्तीकडे वळतो आणि जगज्जेतेपद पटकावतो, हे फक्त दारासिंगच करू जाणे. खरे म्हणजे, दारासिंग यांचा शेतीकडे जास्त ओढा होता. अंगात भरपूर ताकद असल्याने काम करण्याचा जबरदस्त आवाका. एका दिवसात संपूर्ण एका एकरावरील गव्हाची केवळ विळ्याने कापणी करायचा दारासिंग यांचा विक्रम आजही अबाधित आहे, असे म्हटले जाते. गावातले अनेक जण नोकरी-धंद्यानिमित्त सिंगापूरला जातात म्हणून दारासिंगही सिंगापूरला गेले आणि तिथेच या विलक्षण मल्लाचा जन्म झाला. एका लष्करी मद्यालयावर पहारेक-याची नोकरी करता करता दारासिंग यांना मित्रांकडून ऐकलेल्या गामा पैलवानच्या कहाण्यांमध्ये रस येऊ लागला. तिथेच त्यांना एक वस्ताद भेटला आणि मग त्या वस्तादाने दारासिंग यांना दाढी, मानेपर्यंत रुळणारे केस आणि पगडीचा त्याग करायला लावला. वयाच्या 19व्या वर्षी दारा कुस्तीच्या आखाड्यात उतरला. पहिल्या जाहीर कुस्तीत त्यांनी एका चिनी पैलवानाला चीतपट केले आणि जिंकलेल्या इनामामधून पैलवानाला अत्यावश्यक असलेल्या खुराकाची सोय झाली. आणखी एक-दोन कुस्त्या जिंकल्यानंतर दारासिंग यांनी रखलवालदाराची नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ कुस्तीवर लक्ष केंद्रित केले. कुस्त्या जिंकायची मग दारासिंग यांना सवयच जडली! सिंगापूरला हरवण्यासारखे कोणीही न उरल्यानंतर मग त्यांनी इंडोनेशिया आणि श्रीलंका येथील मल्लांनाही माती दाखवली. त्या वेळी मुंबईत युरोपीय कुस्तीगीर किंगकाँगचा मोठा बोलबाला होता. किंगकाँग आपल्या पाशवी शक्तीसाठी आणि उद्धटपणासाठी कुप्रसिद्ध होता. दारासिंग मायदेशी परतल्यानंतर सगळ्यात अगोदर त्यांनी किंगकाँगचाच नक्षा उतरवला आणि ते देशाचे हीरो झाले. त्या वेळी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये फ्री स्टाइल (हल्लीच्या डब्ल्यूडब्ल्यूएफ) कुस्त्या चालायच्या. दारासिंग यांचा धाकटा भाऊ रंधवा हादेखील त्या वेळी कुस्ती खेळायचा. मायटी चँग हा जिलेटीन चॉप मास्टर, टायगर जोगिंदर असे किती तरी देश-विदेशातले मल्ल इथे येऊन एकमेकांना आव्हान द्यायचे. वर्तमानपत्रांत या कुस्त्यांच्या मोठमोठ्या जाहिराती यायच्या. त्यात कोणी तरी दारासिंग यांना आव्हान दिलेले असायचे. मग त्या खाली दारासिंगचे ते सुप्रसिद्ध वाक्य लिहिलेले असे... ‘पहले रंधवा से लडो, उसे हराओगे तोही मुझ से लडो!’ हे वाक्य वाचले की तमाम पब्लिक खुश. दुस-या दिवशी वर्तमानपत्रांत आलेल्या कुस्त्यांच्या निकालावर लोकांच्या उड्या पडायच्या. ‘इंडियन डेथ लॉक’ हा दारासिंग यांचा रामबाण डाव होता, तर ‘किंग कोब्रा’ हा रंधवाचा रामबाण डाव. लोकांना यातले काहीच कळायचे नाही. प्रतिस्पर्ध्याला खाली पाडून त्याच्या नरड्यावर पाय रोवून उभे राहणे म्हणजे ‘इंडियन डेथ लॉक’ आणि आपले दोन्ही हात एका बाजूला घेऊन प्रतिस्पर्ध्याची मानगूट त्या हाताच्या कात्रीत पकडायची म्हणजे ‘किंग कोब्रा’, असा स्वत:च अंदाज बांधून लोक नाक्यानाक्यावर चर्चा करायचे. कुस्ती ऐन भरात आली असतानाच 1960मध्ये दारासिंग यांना चित्रपटाची ऑफर आली. चित्रपट हा खरे तर दारासिंग यांचा फार जिव्हाळ्याचा विषय नव्हता. मात्र, जुन्या निवृत्त कुस्तीगिरांची केविलवाणी अवस्था त्यांनी पाहिली होती आणि म्हणूनच प्रसिद्धीच्या शिखरावर असताना चित्रपटात जायला काय हरकत आहे, कोण जाणे पुढे कोणी नवा मल्ल येईल आणि आपली कारकीर्द संपवून जाईल... महेश भटांचे वडील नानाभाई भट यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी ‘किंगकाँग’ हा पहिला चित्रपट केला. 1950-60 च्या काळात दारासिंग यांच्या चित्रपटांची मोनोपॉली सुरू झाली. त्यांच्या चित्रपटांचे नामकरणही दारासिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असायचे. फौलाद, आँधी और तुफान, आवारा अब्दुल्ला, रुस्तम-ए-रोम, सॅमसन, हर्क्युलस, आया तूफान ही त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांची नावे. लोखंडी गज वाकवणारा, साखळदंड तोडणारा, कुस्त्या खेळणारा अशी बलदंड दारासिंग यांची विविध रूपे. निशी, हेलन, प्रवीण चौधरी, कुमकुम किंवा मुमताज या त्यांच्या नायिका. जसा राम म्हणजे चंद्रकांत आणि सीता म्हणजे साक्षात शोभना समर्थ तसेच टारझन म्हणजे दारासिंग आणि त्याच्या बाहुपाशातील जेन म्हणजे मुमताज. त्यांना पाहण्यासाठी चाहते थिएटरवर तुटून पडायचे. मुमताजला दारासिंग यांनीच मुंबईत आणले. दारासिंगचे चित्रपट कितीही पैसा मिळवून देत असले तरी त्यांच्याबरोबर काम करायला त्या काळच्या साधना-वैजयंतीमाला यांसारख्या नट्या तयार होत नसत. काही झाले तरी दारासिंगच्या चित्रपटांना बी ग्रेडचा दर्जा होता. रोमान्सचा शॉट देताना दारासिंग यांची चांगलीच तारांबळ उडायची. एकदा तर शूटिंगमध्ये कुमकुमला हळूच धक्का द्यायचा प्रसंग होता. दारासिंग यांचा कुमकुमला इतका जोरात धक्का लागला की, कुमकुमला ते चांगलेच महागात पडले. हाणामारीच्या प्रसंगातही तीच गत असायची. दारासिंग खराखुरा मारतो की काय, अशी भीती सतत समोरच्याला वाटत राहायची. मात्र, दारासिंगना त्याने काहीच फरक पडत नव्हता. ते दिवसातून तीन पाळ्यांमध्ये काम करायला लागले. पुढे त्यांना चित्रपटांचा कंटाळा आला आणि पुन्हा ते कुस्तीच्या प्रेमात पडले. रोज 3000 जोर आणि तितक्याच बैठका मारायला त्यांनी सुरुवात केली. अमेरिकेत गेले. तिथल्या चॅम्पियन रुफूसला हरवून जगज्जेतेपद मिळवले. वयाच्या 53व्या वर्षापर्यंत सक्रिय कुस्तीगीर राहिलेल्या दारासिंगांनी आपल्या साठीत रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये हनुमानाची अजरामर भूमिका केली. जाट समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी राजकारणातही प्रवेश केला. मात्र, तिथे ते फारसे रमले नाहीत. शक्ती आणि भक्ती यांचा सुरेख संगम साधणा-या दारासिंग यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
रुस्तम-ए-हिंद दारा सिंग पंचतत्वात विलीन; मुंबईत अंत्यसंस्कार