आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संन्याशाचे ब्रह्मचर्य (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अण्णा राजकारणच करत होते. गेली बरीच वर्षे. फक्त त्यांच्या राजकारणाचा मुखवटा संन्याशाचा होता. परंतु हा मुखवटा आता गळून पडला आहे. म्हणजे आता त्यांनीच तसे जाहीर केले आहे. किंवा असेही म्हणता येईल की त्यांना तसे जाहीर करणे भाग पडले. ते आणि त्यांची टीम ऊर्फ टोळी अशा कोंडीत सापडली की त्यातून बाहेर पडायचे तर मुखवटा फेकून देण्याखेरीज दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता. या संन्याशांच्या टोळ्यांनी उपोषणाचा एक मंत्र भ्रष्टाचाररूपी राक्षसाच्या निर्दालनासाठी निर्माण केला होता. हा मंत्रपारंगत मांत्रिक त्याचे मंत्र-तंत्राचे जादूटोणे ‘जंतरमंतर’ या दिल्लीतील नाम-सयुक्तिक मैदानावर करत असे. त्या संन्याशांच्या मंत्रसामर्थ्याने प्रभावित झालेले हजारो लोक त्या मैदानावर मंत्रमुग्ध होऊन अण्णांच्या संतवाणीला दाद देत.
‘अण्णा’ नावाचा स्वतंत्र-समांतर चॅनल सुरू करता येईल का, याविषयीही त्यांच्या टोळीत चर्चा झाली होती. पण सगळेच न्यूज चॅनल्स प्रत्यक्षात ‘अण्णा चॅनल’ असल्यासारखे वागत असल्याने वेगळा चॅनल काढायची काय गरज, असा प्रश्न ‘टीम अण्णा’ला पडला होता. त्यांनी काढलेला भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि त्याच्या विरोधात सादर केलेले उपोषण व अन्य प्रहसनाचे प्रयोग यांना उत्तम ‘टीआरपी’ मिळत होता. त्यामुळे सगळे चॅनल्स अण्णांचे ‘जंतरमंतर’चे प्रयोग एखाद्या आध्यात्मिक वाहिनीप्रमाणे भक्तिभावाने दाखवत.
गेल्या वर्षी तर बहुतेक खासगी टीव्ही कंपन्यांनी अण्णांना ‘इंडियन ऑफ द इयर’ असा सन्मानही प्रदान केला होता. अण्णांचे प्रयोग अनेक अर्थांनी चॅनल्सना फायदेशीर ठरत. एकदा त्या मैदानावर कॅमेरे लावून ठेवले की दुसरे काही दाखवावे लागत नाही. त्यामुळे इतर बातम्या कव्हर करण्याचा खर्च वाचतो. शिवाय या एकाच बातमीत अध्यात्म, राजकारण, करमणूक आणि सेलिब्रिटीज हे सर्व असल्याने सर्वच ग्रामीण-शहरी आबालवृद्धांना त्यात काही ना काही मिळत असे.
स्वयंभू विद्वानांची ‘अण्णा फिनॉमिनन’वर चर्चा ठेवली की एक तथाकथित ‘इंटेलेक्च्युअल’ कार्यक्रम सादर केल्याचे सार्थकी लागत असे. त्यातही मुद्दा भ्रष्टाचाराचा. म्हणजे राजकीय नैतिकतेचा. त्यामुळे राजकारणाचे शुद्धीकरण चालू आहे, असे प्रेक्षकांनाही वाटत असे. चॅनल्सचेही आपसूक पापक्षालन होत असे. अशा रीतीने अण्णांचे हे राजकारण ‘जो जो वांच्छिल तो ते लाहो’ शैलीत चालू असे. म्हणजेच राजकारण करूनही प्रत्यक्ष सत्तेच्या राजकारणात नसल्याचा विश्वामित्री पवित्रा घेणे अण्णांना शक्य होते.
संसदेला, पंतप्रधानांना, सर्वोच्च न्यायालयाला भ्रष्टाचाराचे भूत दाखवून समांतर अराजकी सत्ताकारणही या संन्याशांनी सुरू केले होते. आता तर राष्ट्रपतींनाही त्यांनी आव्हान द्यायला सुरुवात केली होती. ‘आमरण उपोषण’ हे हत्यारही असे की ज्यामुळे भावनात्मक आणि नैतिक ब्लॅकमेलिंगला एका व्यापक जनचळवळीचे परिमाण प्राप्त होत असे. अण्णांनी तर त्यांचा आमरण उपोषण हा महात्मा गांधीजींच्या सत्याच्या प्रयोगांपेक्षा परिणामकारक असा प्रयोग सादर करायला सुरुवात केली होती.
महात्मा गांधींचेच नव्हे तर आपण स्वामी विवेकानंदांचे आणि क्रांतिवीर भगतसिंग यांचेही अवतार आहोत, असा साक्षात्कारही अण्णांना आणि अलीकडे त्यांच्या टीमलाही होऊ लागला होता. त्यामुळे आपल्या अहिंसक आंदोलनाला हिंसक वळण लागले तर त्याचे कारण आपल्या प्रेरणा भगतसिंग व सुभाषचंद्रांच्याही आहेत, असे अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि प्रशांत भूषण सांगू लागले होते. गेल्या वर्षी केंद्र सरकारच नव्हे तर अवघी संसद अण्णांच्या या मंत्र-तंत्रांना घाबरून हतप्रभ झाली.
अवघ्या लोकसभेने आणि खुद्द पंतप्रधानांनी अण्णांना सलाम ठोकून उपोषण मागे घेण्याची विनंती केली, तेव्हा अण्णांना आता आपण एक ‘मसीहा’ आहोत असे वाटू लागले. पुढे ‘टाइम’ साप्ताहिकाने अण्णांवर ‘कव्हरस्टोरी’ केली तेव्हा तर अण्णा स्वत:ला संभाव्य नोबेल शांतता पुरस्काराचे उमेदवारच मानू लागले. हा भ्रमाचा भोपळा फुटला तो मुंबईच्या मैदानात. मुंबईला त्यांच्या उपोषणाची ब्लॅक कॉमेडी पाहायला कुणी माणसे आली नाहीत. माणसे आली नाहीत त्यामुळे चॅनल्सना त्यात दाखवण्यासारखे काही वाटले नाही. मीडिया कव्हरेज न मिळाल्यामुळे टीम अण्णाची धांदल उडालीच, पण आपली चळवळ म्हणजे एक भ्रमाचे भूत होते हेही लोकांच्या लक्षात येऊ लागले. पण गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये दिल्लीतील रामलीला व जंतरमंतर मैदानांवर चढलेली गर्दीची आणि आत्ममहतीची नशा अजून गेलेली नव्हती.
नव्या राष्ट्रपतीची निवडणूक झाल्यानंतर आपण लोकपालच्या मुद्द्यावरून पुन्हा देशात वादळ निर्माण करू शकू, असे या संन्याशांना वाटू लागले होते. म्हणून त्यांनी पुन्हा आमरण उपोषणाचा महा-फार्स करण्याचा घाट घातला. पण जंतरमंतर येथे मंत्रजागर करूनही माणसे जमेनात, तेव्हा योगी रामदेव बाबा यांची मदत घेऊन थोडीफार गर्दी वाढवली गेली. पण टीम अण्णाला या अण्णा-रामदेव आघाडीचा धर्म पाळता आला नाही. रामदेवबाबांनी नरेंद्र मोदींची प्रशंसा करून टीम अण्णाला अडचणीत आणले. संघ परिवाराने अण्णांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बळ देऊन आपले राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. पण अण्णा हे परिवारालाच जड होऊ लागले, तेव्हा संघाने थोडेसे हातचे राखून पाठिंबा द्यायला सुरुवात केली. इतर विरोधी पक्षांनी गेल्या वर्षी अण्णांच्या काँग्रेसविरोधी राजकारणात आपलेही घोडे पुढे दामटता येईल म्हणून त्यांना पाठिंबा दिला होता. पण या वेळेस त्यांनीही अंग काढून घेतले. परिणामी अण्णा व टीम अण्णांचे ‘आमरण उपोषण’ हे एकदम पोरके होऊ लागले.
केंद्र सरकारने तर या वेळेस त्या उपोषणाला कोणताच प्रतिसाद द्यायचा नाही, हा निर्धार केला. गेल्या वर्षी अण्णांना अटक करून त्यांचा ‘महात्मा’ करण्याचा नतद्रष्ट प्रयत्न गृहमंत्रालयाकडून झाला होता. किंबहुना त्यानंतरच अण्णांना देशव्यापी आणि कायमचा पाठिंबा असल्याचे चित्र निर्माण झाले. अण्णा आंदोलनाला उदात्तता प्राप्त झाली ती त्यामुळेच. या वेळेस ती उदात्तता आटली. विरोधकांचे समर्थन क्षीण झाले. सरकारने दुर्लक्ष केले. लोकांनी पाठ फिरवली. मीडियाने अण्णांचा ‘फियास्को’ जाहीर करून राजाच्या अंगावर वस्त्रेच नाहीत, हे सांगायला सुरुवात केली. शेवटी कोंडीत सापडलेल्या अण्णांनी आपण राजकारणात उतरणार असल्याची घोषणा केली आणि संन्याशाचा मुखवटा दूर झाला.
अण्णा, राजकारण नको, समाजकारणच बरे!