Home | Editorial | Agralekh | editorial, agralekh, vilasrao deshmukh

विशेष संपादकीय : निधड्या छातीचा अजातशत्रू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 15, 2012, 04:10 AM IST

राजकीय जीवनात अगणित वादळांचा निधड्या छातीने मुकाबला करणा-या विलासराव देशमुख यांच्यासारखा राजकारणी विरळाच.

 • editorial, agralekh, vilasrao deshmukh

  महाराष्ट्राच्या राजकारणावर तब्बल 38 वर्षे अधिराज्य गाजवलेला एक मोलाचा दुवा आज निखळला आहे. राजकीय जीवनात अगणित वादळांचा निधड्या छातीने मुकाबला करणा-या विलासराव देशमुख यांच्यासारखा राजकारणी विरळाच. त्यांच्या स्वभावशैलीमुळे आणि राजकीय कौशल्यामुळेच महाराष्ट्रातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार 1999 नंतर सत्तेत येऊन टिकू शकले. नाहीतर त्याच वर्षी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकारी घरोबा करणे सोपे नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच काँग्रेसला आपला प्रतिस्पर्धी नव्हे, तर शत्रू मानले आहे.
  सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करून जून 1999मध्ये शरद पवारांनी स्वत:ची स्वतंत्र हवेली बांधायला घेतली होती. दिल्लीत भाजप आघाडीचे सरकार होते. भाजप आघाडी सरकारला पवारांबद्दल व राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल विशेष आस्था होती. वाजपेयी सरकारने पवारांना कॅबिनेट दर्जा देऊन ‘आपत्कालीन व्यवस्थापन’ गटाचे अध्यक्षपद दिले होते. म्हणजेच राज्यात व दिल्लीत काँग्रेसचे राजकारण करणे ही तारेवरची कसरत होती. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि मराठवाड्याचे सुपुत्र दिवंगत शंकरराव चव्हाण हे विलासरावांचे राजकीय गुरू. प्रशासन चालवण्यापासून पक्षांतर्गत व पक्षाबाहेरच्या विरोधकांशी दोन हात करण्याचे कसब त्यांनी शंकररावांकडूनच मिळवले. शंकररावांनाही विलासराव सर्वांत प्रिय होते. विलासरावांना त्यांचे मानसपुत्रच मानले जात असे. शंकररावांच्या निधनानंतर एका अर्थाने विलासरावांचा एकाकी प्रवास सुरू झाला. लातूर जिल्ह्यातील बाभळगावसारख्या एका छोट्या गावातून राजकीय कारकीर्द सुरू केलेले विलासराव स्वभाव, काम करण्याची शैली आणि जनसंपर्काच्या बळावर दिल्लीपर्यंत धडकले. विलासराव त्यांच्या राजकीय वर्तुळात एका अर्थाने अजातशत्रू होते. त्यांचे बाळासाहेब ठाकरेंशी जसे सौहार्दाचे संबंध होते, तसेच नितीन गडकरींशी आणि त्याच वेळेस गोपीनाथ मुंडेंशीसुद्धा. मुंडे आणि विलासराव ही मैत्री तर अनेकांच्या कुतूहलाची होती. असे असूनही राजकीय स्पर्धा आणि कट-कारस्थाने चालूच असत.
  काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने सुमारे तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर 2002च्या जून महिन्यात विलासरावांच्या सिंहासनाला सुरुंग लावण्याचा एक कट सेना-भाजपा युतीच्या गडावर शिजला होता. त्या कटाला राष्ट्रवादी काँग्रेसपैकी कुणाचे तरी आतून सहकार्य असावे, अशी चर्चा तेव्हा होती. त्या तर्काला जागा होती, कारण केंद्रात भाजपा आघाडीचे सरकार होते आणि पुन्हा जेव्हा लोकसभा निवडणुका होतील तेव्हा परत वाजपेयी सरकारच निवडून येणार, असे बहुतेकांचे मत होते. पवारांचा सोनियांना (व पर्यायाने काँग्रेसला) असलेला विरोध विचारात घेऊन जर 2002मध्येच महाराष्ट्रात सत्तापालट घडवून आणता आला तर 2004च्या निवडणुकीत केंद्रात व राज्यात भाजपा आघाडी सत्तेत येऊ शकेल, असा हिशेब होता. त्या कटामागचे सूत्रधार कोण होते व काय घडू शकले असते, याची आजही दहा वर्षांनंतर गप्पाष्टके होत असतात. असो. विलासरावांनी राजकीय हुशारीने तो कट उधळला. तरीही 2003मध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सुशीलकुमार शिंदेंकडे दिली गेली. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे आला. परंतु काँग्रेस-श्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपद मात्र विलासरावांकडे सुपूर्द केले. केंद्रातही 2004मध्ये भाजपा-आघाडीची सत्ता गेली. तेव्हापासून गेल्या आठ वर्षांत काँग्रेसवर अनेक संकटे आली-अगदी अलीकडले म्हणजे अण्णांचे आंदोलन. या काळात विलासराव हेही एक महाराष्ट्रातील ‘संकटमोचक’ ठरले!
  विलासरावांनी 1974मध्ये बाभळगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीतून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. 1979 पर्यंत ते या पंचायतीचे सदस्य होते आणि या दरम्यान 1974 ते 76 या काळात सरपंचही होते. त्या वेळी लातूर जिल्हा आजच्या उस्मानाबाद जिल्ह्याचाच एक भाग होता. राजकारणाची पुढची पायरी म्हणून त्यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाची निवडणूक लढवून विजय मिळवला. 1974 ते 80 दरम्यान ते लातूर तालुका पंचायत समितीचे उपाध्यक्ष होते. उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी 1975 ते 78 दरम्यान युवक काँग्रेसच्या पाच कलमी कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा पिंजून काढला. कार्यकर्त्यांचे मोहोळ उभे केले आणि ते तहहयात जपले. याच बळावर त्यांनी 1980, 85 आणि 90 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या.
  1995मध्ये राज्यात आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेत भल्याभल्यांप्रमाणे त्यांनाही लातूर मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. तो त्यांचा पहिला पराभव होता, पण त्याने खचून न जाता त्यांनी पूर्वीच्याच उत्साहाने मतदारसंघात काम केले. पराभवाची कारणे शोधली आणि 1999च्या निवडणुकीत 91 हजार मतांची विक्रमी आघाडी घेऊन पुन्हा आमदार झाले. त्याच वर्षी पहिल्यांदा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. तत्पूर्वी त्यांनी सरकारमधील गृह, सहकार, प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, कृषी, उद्योग, ग्राम विकास, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रीपदही भूषवले. अर्थात, पक्षांतर्गत बंडाळीचा त्रास त्यांनाही झाला, पण ती मोडून काढत ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशाध्यक्ष हे सूत्र काँग्रेसमध्ये नवे नाही. विलासरावांनाही तो त्रास सोसावा लागला. त्याला प्रादेशिक मतभेदांपासून पक्षातील गटा-तटांपर्यंत अनेक कंगोरे होते. परंतु दिल्लीतील श्रेष्ठींशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणाचीही डाळ फारशी शिजली नाही.
  विलासराव दुस-यांदा मुख्यमंत्रीपदी असतानाच मुंबईवर नोव्हेंबर 2011मध्ये दहशतवादी हल्ला झाला. तीच संधी साधून पक्षांतर्गत विरोधकांनी उचल खाल्ली. या स्फोटांची नैतिक जबाबदारी स्वीकारून विलासरावांनी पद सोडले; पण त्यांनी पक्षाला दिलेल्या योगदानामुळे, त्यांच्यामागे असलेल्या पाठबळाची दखल घेऊन श्रेष्ठींनी त्यांना केंद्रीय मंत्रीपदी बढती दिली. त्यांनी अवजड उद्योग, ग्रामविकास आणि विज्ञान व तंत्रज्ञानासारखी महत्त्वाची खाती केंद्रात सांभाळली. महाराष्ट्राशी संबंधित कोणताही निर्णय त्यांना विचारल्याशिवाय दिल्लीत घेतला जात नव्हता. अण्णा हजारे यांनी उपोषण सुरू केल्यामुळे अडचणीत आलेल्या केंद्र सरकारने मध्यस्थीसाठी त्यांनाच पाठवले होते.
  पुण्याला शिक्षण घेत बी. एस्सी., बी. ए., एल. एल. बी. पूर्ण करणा-या विलासरावांची नाळ कायम मराठवाड्याशी जोडलेली होती. त्यांनी लातूर जिल्ह्यात अनेक प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले. लातूर, मुंबईत शिक्षण संस्था उघडल्या आणि दुष्काळग्रस्त भागातील सिंचन सुविधा वाढवण्याचेही प्रयत्न केले. सरकारच्या सांस्कृतिक विभागाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जसे प्रयत्नशील राहिले, तसेच ग्रामीण भागात शिक्षण सुविधा पुरवण्यासाठीही ते आग्रही होते. देशभरात कार्यकर्त्यांचे जाळे विणणा-या एका मितभाषी, सुसंस्कृत, अनुभवी, चाणाक्ष नेत्याचे निधन ही मराठवाडा किंवा महाराष्ट्र किंवा काँग्रेसच नव्हे, तर देशासाठी धक्कादायक घटना आहे. जनमानसावर घट्ट पकड असलेला नेता त्यांच्या रूपाने हरपला आहे.

Trending