आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिष्मा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवडाभरातच होत्याचे नव्हते झाले. एक राजबिंडा, हजरजबाबी, अनुभवी, संवेदनशील नेता या जगाचा निरोप घेऊन निघून गेला. किडनी आणि लिव्हरच्या आजाराचे निमित्त झाले आणि ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती, ते घडले. विलासराव देशमुख यांना चाहणार्‍या लोकांसाठी हा एक धक्काच होता, कारण विलासरावांनी आजारपणाचा मागमूसही कधी आपल्या चेहर्‍यावर दिसू दिला नव्हता. हसत-खेळत राहणार्‍या या नेत्याचा आजार एवढा बळावला असेल, हे कोणाला खरेही वाटले नव्हते. म्हणूनच त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जो जनसागर लोटला, त्याच्या भावना दाटून आल्या होत्या. एरवी कोणत्याही राजकीय नेत्याच्या अंत्ययात्रेला होणार्‍या गर्दीत बघ्यांचेच प्रमाण मोठे असते; पण विलासरावांच्या बाबतीत तसे घडले नाही. गर्दीतील प्रत्येक जण त्यांच्याशी या ना त्या नात्याने जोडला गेलेला होता. त्याला विलासराव नावाने, आडनावाने ओळखत होते. अन्यथा अलीकडच्या काळात एखाद्या राजकीय नेत्याचे तासन् तास रांगा लावून अंतिम दर्शन घेण्याचा प्रसंग विरळाच. कुटुंबातील एखादा सदस्य निघून गेल्याची भावना या जनसागरात होती.
प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते आणि मन त्यांच्या आठवणींत हरवून गेले होते. हा तुलना करण्याजोगा प्रसंग नाही; पण बाभळगावात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.आर. रेड्डी (2 सप्टेंबर 2009), वसंतदादा पाटील (1 मार्च 1989) आणि यशवंतराव चव्हाण (25 नोव्हेंबर 1984) यांची आठवण झाली. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी असाच जनसमुदाय लोटला होता आणि त्याच्याही भावना इतक्याच तीव्र होत्या. विलासरावांचे निधन हा नियतीचा भाग असला तरी हे संकट अशा वेळी ओढवले आहे, जेव्हा सर्वच राजकीय पक्ष 2014 च्या निवडणुकांचे डावपेच आखत आहेत. खुद्द विलासरावांनीही तशी सुरुवात केलीच होती. काँग्रेसला गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत अपेक्षेएवढे यश मिळाले नाही, हे शल्य त्यांना बोचत होते आणि ही कसर आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भरून काढण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. दिल्लीत ते उणीपुरी तीनच वर्षे होते; पण तेथून देशाचे राजकीय चित्र त्यांनी न्याहाळले होते. एकेका निवडणुकीत तब्बल दोन-दोनशे सभा घेऊन वातावरण ढवळून काढणार्‍या विलासरावांचा काँग्रेसला मोठा आधार होता.
मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक मतदारसंघांचा त्यांना तेथील कार्यकर्त्यांसह अभ्यास होता. त्यामुळे ते राज्यातील निवडणुकीच्या निकालाचे भाकीत अचूकपणे पक्षश्रेष्ठींपुढे मांडत. शिवाय, प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचालींवर, डावपेचांवरही त्यांची नजर होती. अर्थात आदर्श, सानंदा, फिल्मसिटी अशा काही प्रकरणांत त्यांना पक्षाची नाराजी ओढवून घ्यावी लागली; पण जनमानसातील त्यांची प्रतिमा कायम राहिली. मराठवाड्यात तर त्यांच्या नेतृत्वगुणांची किती तरी उदाहरणे देता येतील. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा ते नांदेडला व्हावे की लातूरला, असा वाद सुरू झाला. साहजिकच विलासरावांनी लातूरचा पक्ष मांडला; पण जेव्हा नांदेडमधून या मागणीचा रेटा वाढला, तेव्हा त्यांनी फार ताणून धरले नाही. यातून त्यांच्या समंजसपणाचे दर्शन घडले.
मुख्यमंत्री म्हणून राज्यात या पक्षासोबत राज्यकारभार करताना त्यांनी तुटेल एवढे कधीच ताणले नाही की कधी दिल्लीत काँग्रेसची तक्रार करण्याची संधी राष्ट्रवादीला दिली नाही. त्यामुळे असे चतुरस्र नेतृत्व निवडणुकीपूर्वी पुन्हा उभे करण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे आहे. कोणाच्याही निधनाने जगरहाटी कधी थांबत नसते. कालांतराने पोकळी भरून निघतच असते; पण विलासरावांच्या तोलामोलाचे नेतृत्व आणायचे कुठून, हा काँग्रेसपुढे उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपमध्ये वैयक्तिक पातळीवर जिव्हाळ्याचे संबंध असलेला, जिल्ह्या-जिल्ह्यात निष्ठावान कार्यकर्ते जपणारा काँग्रेसचा नेता कोण, याचे उत्तर तर विलासरावांच्या पश्चात देताच येत नाही. त्यांनी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात उभे केलेले कार्यकर्त्यांचे मोहोळ किती व्यापक होते, हे परवा बाभळगावात दिसून आले. त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत आणि पक्षबाह्य प्रतिस्पध्र्यांच्या पायाखालचीही वाळू सरकली असेल! त्यांना जनमानसातून एवढे पाठबळ असेल, त्यांच्या संपर्काची मुळे एवढी खोलवर रुजली असतील आणि त्यांना मानणारा एवढा मोठा वर्ग असेल अशी कल्पना भल्याभल्यांनी केली नसेल.
देशातील सर्वच उच्चपदस्थांसाठी स्वातंत्र्यदिनासारखा अत्यंत व्यग्र दिवस असताना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अवघी दिल्ली, मुंबई बाभळगावात मिळेल त्या वाहनाने हजर झाली. त्यामुळे विलासरावांचे कर्तृत्व पन्हा एकदा अधोरेखित झाले. जनाधार असलेल्या नेत्यांच्या आयुष्यात राजकीय वादळे येतच असतात; परंतु त्यांची तळमळ, लोकप्रियता, कार्याचा प्रभाव त्यांच्या निधनानंतर प्रदीर्घ काळ प्रकर्षाने जाणवत राहतो. विलासराव हे अशाच नेतृत्वांपैकी एक आहेत, ज्याची उणीव केवळ काँग्रेसच नव्हे, तर इतर पक्षांनाही पुढील कित्येक वर्षे महाराष्ट्र आणि विशेषत: मराठवाड्याला जाणवत राहील.