आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तस्करी रोखण्यास महिलांची मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारगिल युद्धानंतर देशाच्या चार संवेदनशील सीमांवर लष्कराव्यतिरिक्त त्यांना साहाय्य करण्यासाठी चार निमलष्करी दले नियुक्त करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार भारत-पाक सीमेवर सीमा सुरक्षा दल, नेपाळ-भूतान सीमेवर सशस्त्र सीमा दल, तिबेट सीमेवर भारत-तिबेट सेना दल आणि म्यानमार सीमेवर आसाम रायफल ही निमलष्करी दले तैनात करण्यात आली होती. तसेच देशातील सर्वच विमानतळांचे संरक्षण करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण औद्योगिक कंपन्यांच्या रक्षणासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल कार्यरत करण्यात आले होते. आता पुढचे पाऊल म्हणून संरक्षण विभागाने नेपाळ, भूतान सीमेवर असलेल्या सीमा सुरक्षा दलात महिला अधिकारी नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नेपाळ सीमेवर मोठ्या प्रमाणावर मानवी तस्करी चालते.

या तस्करीतून बांगलादेशातील गरीब महिलांना नेपाळमार्गे वेश्याव्यवसायासाठी भारतात आणले जाते. गेल्या काही वर्षांत या तस्करीचे प्रमाण वाढले असून मानवी तस्करीच्या माध्यमातून अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात ने-आण होत असते. नेपाळ सीमेवर हे प्रमाण अधिक असून या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी महिला अधिकार्‍यांची साथ घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मते महिला अधिकार्‍यांना तैनात केल्यामुळे मानवी तस्करीला बर्‍याच प्रमाणात आळा बसेल. सरकारने हा निर्णय घेताना महिला अधिकार्‍यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास तर दाखवला आहेच, शिवाय दुर्गम प्रदेशात, प्रतिकूल हवामानात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही देशसेवा करू शकतात, असा सकारात्मक संदेश संरक्षण खात्याने दिला आहे.

वास्तविक हा क्रांतिकारक निर्णय घेण्यास सरकारने खूप वर्षे घेतली. 2007 मध्ये निमलष्करी दलांमध्ये महिलांना कनिष्ठ कॉन्स्टेबल पदासाठी प्रवेश देण्यात आले होते. सध्या सशस्त्र सीमा दलांमध्ये 1400 महिला कार्यरत आहेत. महिलांच्या नेमणुकीमुळे नेपाळ, भूतान सीमेलगतच्या गावात संपर्क वाढवण्यास मदत होईल. चीनकडून सीमेवर राहणार्‍या लोकांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवण्यात येतात. त्यालाही या महिला अधिकारी पायबंद घालू शकतील, असे सरकारचे म्हणणे आहे.