आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ट्रम्प'चे बिघडलेले सूर (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिसवरचा दहशतवादी हल्ला व त्यानंतर कॅलिफोर्नियात झालेला गोळीबार याचे पडसाद अमेरिकेच्या राजकारणावर पडणे अपरिहार्य होते. कारण तसे ते पडले नसते तर अमेरिकेतल्या रिपब्लिकनवाद्यांना धुव्रीकरणाची संधी मिळाली नसती. पॅरिसच्या हल्ल्यामागे इसिस संघटना असल्याचे सिद्ध झाल्यानंतर अरब जगतातून युरोपमध्ये येणाऱ्या निर्वासितांच्या लोंढ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. पॅरिससारखा हल्ला आपल्यावरही होऊ शकतो, अशी बेल्जियमने भीती व्यक्त केली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव करून इसिसच्या तळांवर हल्ले करण्याबाबत सर्व सदस्यांची सहमती तयार केली होती. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तर इसिसशी चाललेले युद्ध हे मुस्लिमांच्या विरोधात नसून तो जगाने दहशतवादाशी पुकारलेला व्यापक लढा आहे, असे प्रतिपादन केले होते. एकंदरीत जग मुस्लिम जगत नव्हे, तर इसिसच्या विरोधात एकत्रित येत असताना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे एक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत मुस्लिमांना येण्यास बंदी घालावी व अमेरिकेतल्या मशिदींवर लक्ष ठेवावे, असे वादग्रस्त विधान करून अमेरिकेतल्या राजकारणाला पुरती कलाटणी दिली आहे. ट्रम्प यांच्या या विधानावर सर्वत्र टीका झाली. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने तत्परतेने या विधानाचा समाचार घेत मुस्लिम समाजाच्या मागे आपण उभे आहोत व धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता व सेक्युलर तत्त्व यांना जपण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मात्र, ट्रम्प अशी विधाने का करतात हे समजून घेतले पाहिजे.
अमेरिकेतला रिपब्लिकन पक्ष हा बुरसटलेल्या परंपरा व रूढी, अवैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मांध, कट्टरवादी आणि द्वेषमूलक भावनांचे राजकारण करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. अमेरिकेवर दैवी संकट नेहमीच घोंगावत असते व अमेरिका हा पृथ्वीवरील स्वर्ग आहे, अशा स्वरूपाची भाषणे रिपब्लिकन पक्षाचे नेते निवडणुकांदरम्यान देत असतात. अमेरिकेतल्या अत्यंत उग्र, लोभी भांडवलदारांचा जो वर्ग आहे, तो रिपब्लिकन पक्षाचे समर्थन करणारा आहे. ट्रम्प स्वत: अब्जाधीश आहेत. त्यामुळे आपल्या प्रचारात ते "ट्रम्प – मेक अमेरिका ग्रेट अगेन,' असे घोषवाक्य असलेला व पक्षाचे चिन्ह असलेला हत्ती फिरवत असतात. अमेरिकेचे गतवैभव परत मिळवण्याची वेळ आली आहे, असाही एक प्रचार ट्रम्प समर्थकांकडून सुरू आहे. ट्रम्प यांच्या भाषणांना गर्दी करणारा व त्यांना पाठिंबा देणारा मतदार हा निम्न स्तरातील श्वेतवर्णीय मध्यमवर्ग, पांढरपेशा व नवश्रीमंत मध्यमवर्ग, कुशल कारागीर, सधन कामगारवर्ग आहे. या वर्गामध्ये जगातील राजकारणात अमेरिकेच्या खालावलेल्या स्थानाबद्दल चिंता आहे. अमेरिकेचे गतवैभव परत मिळवलेच पाहिजे. त्यासाठी राष्ट्रवादाची हाक आवश्यक आहे, असेही या वर्गाचे म्हणणे आहे. हा मतदार डोळ्यापुढे ठेवून ट्रम्प अमेरिकेत उन्मादी वातावरण तयार करत आहेत. त्यांच्या वादग्रस्त विधानावरून रिपब्लिकन पक्षातील त्यांचे स्थान दोलायमान होत असल्याचे पाहून त्यांनी पक्षच सोडण्याची धमकी दिली. ही धमकी म्हणजे रिपब्लिकन पक्षातल्या विरोधकांना आव्हान देणे आहे. गेल्या तीन महिन्यांत रिपब्लिकन पक्षामध्ये ट्रम्प यांचे स्थान बळकट होत असल्याने त्यांच्या एकूणच राजकीय शैलीवर पक्षात नाराजीचे सूर आहेत. ट्रम्प हे प्रतिस्पर्ध्यावर आरोप करताना जाहीरपणे अपशब्द बोलतात. ते अमेरिकी जनतेला अव्वाच्या सव्वा आश्वासने देत सुटले आहेत. अमेरिकेची अर्थव्यवस्था व तिच्या लष्करी सामर्थ्याबाबत ट्रम्प लोकांना जी स्वप्ने दाखवत आहेत त्यातून पक्षाला मोठा फटका बसेल, असे मतप्रवाह आहेत. पण दुसरीकडे याच पक्षातील काही कट्टरवादी नेत्यांना इसिसचा दहशतवाद, मेक्सिकन,आशियाई, चिनी लोकांचे स्थलांतर याला थेट विरोध करणाऱ्या नेत्याची गरज आहे आणि ते नेतृत्व ट्रम्प यांच्या रूपाने मिळाले, असे वाटू लागले आहे. काहींना ट्रम्प हे कणखर व धडाडीचे नेते वाटत आहेत. ट्रम्पही आपल्या प्रचारात धाडसी, अविवेकी, चक्रमपणाची विधाने करताना कचरत नाहीत. एका भाषणात त्यांनी सत्तेवर आल्यास इराकमधील सर्व तेलविहिरी ताब्यात घेऊन त्यांची विक्री करून आलेला सर्व पैसा अफगाणिस्तानात मरण पावलेल्या व जखमी झालेल्या अमेरिकी सैनिकांच्या कुटुंबीयांना वाटण्यात येईल, असे वचन देण्यास कमी केले नाही. (आपल्याकडे लोकसभा निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर ६० दिवसांत परदेशात दडलेला काळा पैसा भारतात आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रु. जमा केले जातील, असे विधान केले होते.) पॅरिस हल्ल्यावरही प्रतिक्रिया देताना त्यांनी मरण पावलेल्यांच्या हातात बंदूक दिली असती तर दहशतवाद्यांची हल्ला करण्याची हिंमत झाली नसती, असे गमतीशीर विधान केले होते. त्यांच्या अशा विधानांवर लोकांची करमणूक होत असली तरी कट्टर राष्ट्रवादाचे जे वारे अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकांत दर वेळी उत्पन्न केले जाते ते जागतिक शांततेसाठी फारसे अनुकूल नसल्याचे दिसून आले आहे.