आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चानंतरची आव्हाने (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत बुधवारी निघालेला मराठा मोर्चा यशस्वी झाला. मुंबईतील मोर्चा हा वर्षातील ५८ वा मोर्चा. अत्यंत शिस्तबद्ध आयोजन, शक्तिप्रदर्शनाला संयमाची जोड, तरुण-तरुणींचा अफाट सहभाग, राजकीय नेत्यांना दूर ठेवण्याची हुशारी आणि समाजात दुही माजेल अशी भाषा वा कृती होणार नाही याची आयोजकांनी घेतलेली विशेष दक्षता ही वेगळी परंपरा या मोर्चांतून पुढे आली. महाराष्ट्राच्या संस्कृतीला अभिमानास्पद वाटावी अशी ही परंपरा मुंबईतील मोर्चातही कटाक्षाने जपली गेली. शक्तिप्रदर्शन किती शिस्तीत करता येते हे मराठा मोर्चाच्या आयोजकांनी देशाला दाखवून दिले आहे. लाखा-लाखाची गर्दी जमल्यावर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते हे देशाच्या विविध भागांत दिसून आले आहे. 

आरक्षणाचे आंदोलन किती हिंसक होते ते हरियाणात दिसले आहे. मुंबईतही काही मोठ्या मोर्चांनी हिंसक प्रदर्शन केले. या पार्श्वभूमीवर बुधवारचा मोर्चा हा त्यातील संयम व शिस्तीमुळे उठून दिसतो. मराठा समाज हा राज्यकर्ता समाज म्हटला जातो. मराठा समाजाला याचा रास्त अभिमानही आहे. राज्यकर्त्या समाजाने आपल्यावरील अन्याय राज्यव्यवस्थेचे भान ठेवून मांडायचा असतो. मराठा समाजाने ते भान राखले याबद्दल मोर्चातील सहभागी लोकांचे व आयोजकांचे विशेष अभिनंदन केले पाहिजे. उग्र भाषा व उग्र कृती टाळली गेली व यामुळे या मोर्चावर नकारात्मक प्रतिक्रिया उठली नाही. मुंबईतील जनजीवन काही तास विस्कळीत झाले तरीही मुंबईकरांनी त्याबद्दल तक्रार केली नाही याचे कारण मोर्चेकऱ्यांच्या संयमीत वागणुकीत आहे.  

मोर्चानंतर हाती काय लागले, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. भव्य मोर्चा निघूनही सरकारने फारसे काही दिले नाही अशी तक्रार विरोधी पक्षनेत्यांनी केली. सरकार झोपले काय, असा सवाल अजित पवार यांनी केला. हा प्रश्न खरे तर त्यांनाच करायला हवा. १५ वर्षे त्यांचे सरकार झोपल्यामुळे असे मोर्चे काढण्याची पाळी मराठा समाजावर आली. या वास्तवाकडे अजित पवार लक्ष देत नसले तरी मराठा समाजातील तरुण-तरुणींना ते बरोबर समजले आहे. हे वास्तव पक्के कळल्यामुळेच राजकीय नेत्यांना मिरवण्यास मोर्चेकऱ्यांनी बंदी केली. मोर्चेकऱ्यांच्या काही मागण्या या सरकारकडून पूर्ण होणे शक्य आहे, तर काही मागण्या पूर्ण करण्यास सरकारच्या मर्यादा पडतात. अन्य समाजगटांच्या आरक्षणाला हात न लावता अधिक आरक्षण तातडीने देणे राज्य सरकारला शक्य नाही. 

मराठा समाज मागास असल्याचा मोठा पुरावा त्यासाठी गोळा करावा लागेल व तो सर्वोच्च न्यायालयात टिकला पाहिजे. तामिळनाडूमधील सरकारने तसे करून आरक्षण ६० टक्क्यांच्या पुढे नेले. हे काम काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने केले असते तर आरक्षण मिळविणे सोपे गेले असते. या कामाला आता सुरुवात झाली आहे. पण त्यासाठी मराठा समाजातील बुद्धिमंतांनी भरपूर पुरावे गोळा करणे आवश्यक आहे. अन्य जातींना दोष देणारे लिखाण करीत बसण्याऐवजी त्यांनी या मुख्य गोष्टीकडे लक्ष दिले तर मराठा तरुणांचे हित होईल. राष्ट्रवादीतील तथाकथित जाणत्या नेत्यांनी या महत्त्वाच्या कामाकडे अधिक लक्ष द्यावे. अॅट्राॅसिटी कायद्यातील बदलही देशपातळीवरून करावा लागेल. मात्र हे कलम लावण्यापूर्वी त्याची छाननी करण्यासाठी समिती नेमण्याचा योग्य निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. ही छाननी व्यवस्थित झाली तर या कायद्याचा गैरवापर बराच टळेल. कोपर्डी प्रकरणातही न्यायालयाच्या पद्धतीला डावलून जलदगतीने काम केले तर त्याचा उलटा फायदा आरोपींनाच होऊ शकतो याचे भान ठेवणे आवश्यक आहे. या तीन महत्त्वाच्या प्रश्नांवरून निर्माण झालेल्या भावना तीव्र असल्या तरी त्यावरील उपाययोजना ही शांतपणे व संविधानाच्या चौकटीत राहूनच करावी लागेल. जो संयम व जी शिस्त मोर्चात सामील झालेल्या लाखो मराठा बांधवांनी दाखविली तीच येथेही दाखवावी लागेल. चिकाटीने काम करण्याची जोड त्याला द्यावी लागेल.

मराठा तरुण पिढीसमोरील सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा नोकरीतील आरक्षणापेक्षा शिक्षणातील संधी हा आहे. शिक्षणातील सवलती जाहीर करण्यात आल्या तेव्हा आझाद मैदानातील तरुणाईने त्याचे जल्लोषात स्वागत केले. कारण शेतीतील घटते उत्पन्न व व्यावसायिक शिक्षणाच्या अपुऱ्या संधी या कात्रीत मराठा तरुण सापडले असल्यामुळे त्यांच्यात वैफल्य येते. व्यावसायिक शिक्षण सुलभ झाले तर ही विफलता कमी होईल. राजकारणापेक्षा व्यवसायातील नेतृत्व त्यांना खुणावते आहे. हा बदल मराठा नेत्यांनी ओळखून त्याला उत्तेजन दिले पाहिजे. म्हणून उद्योगधंद्यांची भरपूर वाढ हे या समस्यांवरचे खरे उत्तर आहे. उद्योगधंद्यांची पुरेशी वाढ करण्यात मागील सरकारांना अपयश आले. हे अपयश झाकण्यासाठी व सत्ता पुन्हा हडप करण्यासाठी मोर्चाच्या आडून राजकारण साधण्याची धडपड काही नेते करतात. तरुण पिढी ते चालू देत नाही हे महाराष्ट्राचे सुदैव. 
बातम्या आणखी आहेत...