आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशाेधन उपयुक्त हवे! (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छद्मविज्ञानाचा उदो उदो... देशातील बहुतेक प्रतिष्ठित विज्ञान संस्थांमधील संशोधन निधीला लावलेल्या कात्रीविरोधात ९ मार्चला देशातील प्रमुख शहरांत निघालेला ‘मार्च फॉर सायन्स’ ही महत्त्वाची घटना आहे. मुंबईत मराठा मोर्चाच्या उच्चांकी गर्दीमुळे ही घटना तशी झाकोळून गेली; पण विज्ञानवादी कार्यकर्ते, प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या मांडत असल्याची घटना पहिल्यांदा घडत होती. केंद्रातील भाजपचे सरकार व त्यांचा धार्मिक अजेंडा हे या मोर्चामागील एक प्रमुख कारण आहे. समाजात आजही विज्ञानवादी भूमिका रुजू शकलेली नाही ही चिंतासुद्धा या मोर्चामागचे कारण आहे. एक कबूल करायला पाहिजे की, २१ व्या शतकात आपण प्रवेश करूनही या खंडप्राय देशात, धर्मभोळ्या-देवभोळ्या, अनिष्ट रूढी-परंपरा-समजुतींचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असलेल्या श्रद्धाळू समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन सहजासहजी रुजणे ही कठीणप्राय बाब आहे. आपल्या घटनेने आधुनिकता, विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला असला तरी प्रत्यक्ष समाजात तो रुजावा, अशी व्यापक यंत्रणा, व्यवस्था दुर्दैवाने आपण गेल्या सात दशकांत उभी करू शकलो नाही. 

भारताची विज्ञानामधील झेप फारशी कौतुकास्पद नाही, पण आपला देश तंत्रज्ञान आत्मसात करणारा देश आहे. (काही लोक जुगाडांचा देशही म्हणतात.) एकूणात आसपासचे वातावरण पाहिल्यास आपला समाज मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाची फळे चाखण्यासाठी आसुसलेला आहे. त्याने गेल्या २०-२५ वर्षांतील माध्यम क्रांती थोपवलेली नाही. पण हे करत असताना त्याला विज्ञानात फारशी रुची नाही. ही अनास्था का निर्माण झाली आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याचे उत्तर विज्ञानवादी मंडळींनी अधिक शोधण्याची गरज आहे. सरकार विज्ञानाच्या प्रसारावर फारसे सकारात्मक नसते, या मुद्द्यावर या मंडळींनी जरूर टीका करावी, ती चुकीची नाही. पण भांडवलशाहीचा मार्ग स्वीकारलेल्या देशात विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कॉर्पोरेट हाउसेस, बडे कारखानदार, श्रीमंत सेवाभावी संस्था यांचाही सहभाग अत्यावश्यक असतो, त्यांचीही जबाबदारीही या मंडळींनी प्रश्नांकित करावी. अमेरिका किंवा युरोप विज्ञान–तंत्रज्ञानात अग्रेसर आहेत, कारण तेथे बिगर सरकारी संस्था विज्ञान संशोधनावर बारीक लक्ष ठेवून असतात व त्यावर लाखो डॉलर खर्च करत असतात. प्रश्न आर्थिक निधीचा आहे.  

भारतामध्ये बदलणारी सरकारे व त्यांच्या विज्ञानविषयक भूमिका नेहमीच वादाचा विषय ठरल्या आहेत. पण त्याचबरोबर आयआयटी, आयआयएससी, आयआयएससीआर, सीएसआयआर यांसारख्या संस्थांमधून चालणारे वैज्ञानिक संशोधनही वादाचे विषय ठरले आहे. समाजाला आपले दैनंदिन प्रश्न साेडवणारे, उपयुक्त संशोधन हवे असते. त्यात या संस्था िकती मदत करतात हा प्रश्न आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात, पण हा प्रश्न कायमचा संपवण्यासाठी कोणतीही विज्ञान-तंत्रज्ञान संशोधन संस्था सरकारकडे हा प्रश्न आम्ही संपवतो म्हणून जात नाही. हा संवाद केव्हा प्रस्थापित होणार? मान्य आहे की, नोकरशाही ही विकासाच्या कामात नेहमीच अडथळे निर्माण करत असते आणि त्यात आपल्याकडे दैनंदिन समस्यांचे राजकारण करण्यात नेते अग्रेसर असतात, पण हे असे किती काळ चालणार? ही कोंडी फोडण्यासाठी विज्ञान संस्थांनी, संशोधकांनी पुढे आले पाहिजे. त्याचबरोबर समाजामध्ये विज्ञानाची गोडी आणण्यासाठी सरकारने झटले पाहिजे, हा विचार आता जुनाट झाला आहे. कारण सरकारकडे आता माहितीची मक्तेदारी राहिलेली नाही. 

सरकार पाठ्यपुस्तकांमध्ये विज्ञानाऐवजी इतिहासावर भर देत असेल तर त्याचा तोटा समाजाला निश्चितच होईल; पण हे समाज अधिक काळ सहन करेल असे वाटत नाही. सध्याच्या केंद्रातील भाजप सरकारला दिशा देणारे बौद्धिक नेतृत्व नाही. ते सत्ता मिळाली आहे म्हणून संघ परिवाराच्या जुनाट परंपरांना पुढे रेटत आहेत. त्यामुळे समाजाच्या सर्व अंगांवर बिंबणारा धार्मिक अजेंडा ते निश्चितच राबवणार, पण त्यांनासुद्धा मर्यादा आहे. विज्ञानप्रसाराबद्दल अशी मर्यादा नाही. तिचे मार्ग सध्या मर्यादित वाटत असतील, पण विज्ञानाचा प्रवाह सुरूच राहणार आहे. तो शतकानुशतके सुरूच राहत आला आहे. विज्ञानवाद्यांनी समाजाशी संबंध, सुसंवाद ठेवणे पहिले आवश्यक आहे. तो नसल्यामुळे छद्मविज्ञानवाद्यांचे फावते. छद्मविज्ञानवाद्यांना धर्मभोळ्या समाजातील दुबळेपणा माहिती असतो तसा तो विज्ञानवादी मंडळींनाही असतो. तरीही छद्मविज्ञानवादी शिरजोर होतात, त्याचे कारण असे की, छद्मविज्ञानवादी आम्ही सांगतो ते सत्य अशी भूमिका घेतात हेच लोकांना पटते. अशा वेळी विज्ञानाने अंतिम असे सत्य नसते, हे समाजावर बिंबवले पाहिजे. छोटासा विज्ञान प्रयोग यशस्वी झाला तरी तो समाजापुढे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सरकारने या मोर्चाकडे दुर्लक्ष केले, कारण सरकारला विज्ञानाविषयी कोणतीच ठाम भूमिका घ्यायची नाही. विज्ञानवाद्यांनी मात्र हे वास्तव स्वीकारले पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...