आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वालामुखीच्या तोंडावर! (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनलेला पाकिस्तान हा स्वत:च दहशतवादाच्या ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. ही गोष्ट कराचीमध्ये पोलिसांचा गणवेश घालून आलेल्या दहशतवाद्यांनी बुधवारी केलेल्या गोळीबारात शिया इस्माईली पंथाचे चाळीसहून अधिक लोक ठार झाले, या भीषण घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाली.
जगातील सर्व मुस्लिम राष्ट्रांचे नेतृत्व आपण करावे, अशी जबर महत्त्वाकांक्षा पाकिस्तानच्या ठायी आहे. मात्र, हे स्वप्न सत्यात उतरले नाही, कारण सर्वच धर्मांत असतात तसेच मुस्लिम धर्मातही काही पंथ असून त्यांच्यात विस्तव जात नाही. मुस्लिम राष्ट्रांमध्ये शिया विरुद्ध सुन्नी हा संघर्ष सातत्याने उग्र रूप धारण करून समोर येत असतो. एकाच धर्माची राष्ट्रे असली तरी प्रत्येकाच्या भू-राजकीय आकांक्षा वेगळ्या असतात. त्याला मुस्लिम राष्ट्रेही अपवाद नाहीत. त्यातही पाकिस्तान हे आखाती श्रीमंत देशांच्या तुलनेत अविकसित राष्ट्रच. त्यामुळे पाकिस्तानला हे देश फार किंमत देत नाहीत. या सगळ्याचे वैषम्य पाकिस्तानला वाटणे साहजिकच आहे. भारताला पाकिस्तान आपला पारंपरिक शत्रू मानतो. या दोन्ही देशांतील कळीचा प्रश्न असलेल्या काश्मीरमध्ये दहशतवादी फुटीर चळवळीला पाकिस्तानने नेहमीच खतपाणी घातले. मात्र, भारताचे तुकडे पाडण्याचे पाकिस्तानचे कारस्थान यशस्वी होऊ शकले नाही. अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला एकेकाळी अमेरिका पोसत होती. मात्र, तो डोईजड व्हायला लागल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबानींविरोधात अमेरिकेने कारवाई सुरू केली. अमेरिकेच्या या कृष्णकृत्यांत त्याचा पाकिस्तान हा जिवाभावाचा सखा होता. त्यासाठी अमेरिकेकडून पाकिस्तानला प्रचंड लष्करी व अन्य स्वरूपात आर्थिक मदत मिळत होती. बदलत्या जागतिक राजकारणात चीन व भारत हे संभाव्य महाशक्ती म्हणून पुढे येऊ लागल्यानंतर अमेरिकेने चीनला शह देण्यासाठी भारताशी मैत्री वाढविली व दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला देत असलेल्या मदतीतही वाढ केली. मात्र, पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसण्याची खोड कायमच ठेवली असून ही घातक खेळी त्या देशाच्याच जिवावर उलटू शकते. कराचीमध्ये शिया मुस्लिमांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी तालिबानी दहशतवाद्यांनी स्वीकारली आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अलीकडेच अफगाणिस्तानला दिलेल्या भेटीचा संदर्भ आहे. अफगाणिस्तानचे शत्रू ते पाकिस्तानचे शत्रू, अशी काबूल येथे शरीफ महाशयांनी केलेली गर्जना तालिबानी अतिरेक्यांना विलक्षण झोंबली आहे. त्यातूनच त्यांनी शिया मुस्लिमांतील इस्माईली पंथाच्या लोकांवर कराचीमध्ये हल्ले चढवून आपल्या दंडातील बेटकुळ्या दाखविल्या. इस्माईली हे मवाळपंथी लोक असून ते व्यापारउदीम करणारे व बऱ्यापैकी सधनही आहेत. त्याचेही वैषम्य तालिबानींमधील सुन्नीपंथीय दहशतवाद्यांना वाटू शकते.

मुस्लिमांमधील शिया विरुद्ध सुन्नी संघर्षात दहशतवाद्यांकरवी रक्तपात घडविण्याचे प्रसंग पाकिस्तानसह काही देशांत वारंवार घडत आहेत. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येमध्ये २० टक्के शिया मुस्लिम आहेत. पाकिस्तानमध्ये यंदा शिया पंथीयांच्या मशिदींवर तालिबानींकडून बॉम्बहल्ले होण्याचे काही प्रकार घडले. केवळ शियाच नाही, तर लाहोर येथील ख्रिश्चनांच्या दोन चर्चवरही तीनच महिन्यांपूर्वी हल्ले झाले होते. त्यानंतर कराची येथील बोहरा मशिदीतही दहशतवाद्यांनी रक्तपात घडविला. विशेषत: पवित्र मोहरमच्या महिन्यात शियांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढते. याचे महत्त्वाचे कारण पाकिस्तानात सक्रिय असलेले लष्कर-ए-जंघवीसारखे दहशतवादी गट सुन्नी पंथीयांचे आहेत. पाकिस्तानात मोहरमच्या दहाव्या दिवशी काढल्या जाणाऱ्या अशूराच्या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या शियापंथीयांचे रक्त सांडण्याचे प्रकार गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने घडत आहेत. अशा दहशतवादी हल्ल्यांमध्ये २०१२ मध्ये ८०० शियांचा बळी गेला, २०१३ मध्ये हा आकडा ४०० होता. यंदाही हे सत्र सुरू असून बुधवारी आणखी काही शियापंथीय जिवाला हकनाक मुकले आहेत. अल्पसंख्याकांवरील हे हल्ले रोखण्यासाठी तेथील तपास यंत्रणा कोणतीही प्रभावी कारवाई करत नाहीत. याचा मानवी हक्क संघटनांनी अनेकदा निषेध केलेला असला तरी त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. याचे महत्त्वाचे कारण हे हल्ले चढविणाऱ्या सुन्नीपंथीय तालिबानी गटांचे पाकिस्तानी लष्कर व आयएसआयशी थेट साटेलोटे आहे. मात्र, आता काही तालिबानी गट पाकिस्तानी लष्करालाही जुमानेनासे झाले असून त्यांच्यापैकीच एका गटाने कराचीत रक्तपात घडविला. या कृत्यांनी पाकिस्तानात दुहीची बीजे अजून खोलवर रुजली जाऊन तो देश फुटीच्या उंबरठ्यावर येऊन उभा आहे. पाकिस्तानपासून फुटून बांगलादेश वेगळा झाला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आताचा पाकिस्तान दहशतवाद्यांच्या कह्यात गेला आहे, परिणामी भविष्यात पाकिस्तानचे आणखी तुकडे पडले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही.
बातम्या आणखी आहेत...