आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय रेल्वेचे मन्वंतर ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणली ती आपला वसाहतवाद विस्तारण्यासाठी, युरोपमधला आपला कापड व्यापार अधिक फायदेशीर करण्यासाठी. तरीही रेल्वेचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीला अप्रत्यक्ष फायदा झाला. रेल्वेच्या विस्ताराने दळणवळण वाढले, नवी शहरे उदयास आली, नव्या बाजारपेठा निर्माण झाल्या. राजकीय-सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली. ग्रामीण भाग शहरांशी सहजपणे जोडला गेला. आज भारतीय रेल्वेचे देशातील जाळे हे जगातल्या कोणत्याही देशातील रेल्वेजाळ्यांपेक्षा अधिक मानले जाते. केवळ जाळे वाढवून नव्हे तर आधुनिकीकरण व त्याबरोबर येणारे तंत्रज्ञानही भारतीय रेल्वेने नेहमीच स्वीकारले आहे. तरीही भारतीय रेल्वे अपघातांपासून मुक्त झालेली नाही, हे वास्तव आहे. हे वास्तव स्वीकारत उद्या मुंबई-अहमदाबाद अशा देशातील पहिल्या बुलेट ट्रेनची पायाभरणी भारत-जपानच्या पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. हे रेल्वेसाठी एक मन्वंतर आहे. कारण भारतीय रेल्वेचा प्रवास हा नॅरोगेज, मीटरगेज, ब्रॉडगेज, भुयारी मेट्रो रेल, मोनोरेल व आता बुलेट ट्रेनपर्यंत येऊन पोहोचला आहे. निसर्गावर मात करत मानवी श्रमातून भारतीय रेल्वेने कठिणातील कठीण आव्हाने पार करत आपला प्रवास अखंडपणे चालू ठेवला आहे. त्यांच्या परिश्रमाला सलामी देणे महत्त्वाचे आहे. अशा या बुलेट ट्रेनला  समाजातील काही स्तरांतून विरोध होत आहे. 

श्रीमंतांचे लाड असेही बोलले जाते. पण हा एक पहिला टप्पा आहे. राजधानी एक्स्प्रेस सुरू झाली तेव्हाही त्याच्यावर टीका झाली होती. पण मध्यमवर्गाच्या हातात पैसा खुळखुळायला लागल्यानंतर राजधानी एक्स्प्रेसची गरज किती योग्य होती हे लक्षात येऊ लागले. तसेही आधुनिकीकरणाला विरोध होत असतो. ८० च्या दशकात भारतात मारुती कारची निर्मिती करण्यासाठी जपानमधील कंपनी सुझुकीची मदत घेण्यात आली तेव्हाही गदारोळ उडाला होता. त्या वेळी आजच्यासारखी बाजारपेठ खुली नव्हती, तंत्रज्ञानावर काही मोजक्याच देशांची मक्तेदारी होती. त्यात तंत्रज्ञान महाग असे. पण भारताने मारुती उद्योगाच्या माध्यमातून मध्यमवर्गाच्या मनात मोटार असण्याचे स्वप्न साकार केले. त्यानंतर तीन दशकांत देशातील कारची बाजारपेठ कशी विलक्षण बहरत गेली व ग्राहकांची मानसिकताही कशी बदलत गेली हे सांगण्याची गरज नाही. 

भारत-जपान यांच्यात बुलेट ट्रेन करार होण्यामागची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे जपानचे शिंकासेन तंत्रज्ञान आज विश्वासार्हता व सुरक्षिततेच्या दृष्टीने जगात सर्वोत्तम मानले जाते. जगात अनेक देशांत धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे अपघात हे अन्य रेल्वे अपघातांच्या तुलनेत जवळपास शून्याच्या बरोबर आहेत. शिंकासेन तंत्रज्ञानात सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अपघाताची शक्यता सांगण्यापासून तो टाळण्यापर्यंतची सर्व प्रकारची सुरक्षितता या तंत्रज्ञानाचे विशेष आहे.  सुरक्षिततेची मानकेही आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याने अपघातांची शक्यता नाही असे म्हटले तरी चालेल. दुसरी बाब म्हणजे बुलेट ट्रेनचे प्रशिक्षण देण्यासाठी बडोद्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली संस्था उभारण्यात येणार असून तेथे चार हजार नवे प्रशिक्षणार्थी रुजू होतील. हेच प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष बुलेट ट्रेन धावायला सुरू झाल्यानंतर या प्रकल्पाचे आधारस्तंभ राहतील. भारतीय रेल्वेने आपल्या ताफ्यातले ३०० रेल्वे अधिकारी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कामास लावले आहेत व त्यांना जपानमध्ये हायस्पीड ट्रेनच्या तांत्रिक अंगांचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. वेगाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास दोन बुलेट ट्रेन धावणार आहेत. एक रेल्वे मुंबई-अहमदाबाद मार्गावर केवळ सुरत व बडोदा या स्थानकांवर थांबेल.

 हा प्रवास दोन तास सात मिनिटांचा असून दुसरी रेल्वे काही स्थानकांवर थांबून एवढेच अंतर दोन तास ५८ मिनिटांत कापणार आहे. भारतीय रेल्वेने कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ही सेवा तासात तीन वेळा चालवण्याचा विचार केला असून अन्य वेळी तासाला दोन असे वेळापत्रक नियोजित केले आहे. साधारण २०२३ पर्यंत बुलेट ट्रेनमधून दैनंदिन ३६ हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. या रेल्वेचा प्रवाशांना फायदा असा की, विमानसेवेपेक्षा ही सेवा जलद असल्याने वेळही वाचणार आहे. अनेक आर्थिक विश्लेषकांनी बुलेट ट्रेनच्या आगमनानंतर या रेल्वेच्या मार्गावर नवी शहरे विकसित होतील, जमिनींच्या किमती वाढतील, नागरी वस्त्या जन्मास येतील व ग्रामीण भागामधील अर्थकारणाला नवी बाजारपेठ मिळेल असे म्हटले आहे, त्यात तथ्य आहे. कारण रेल्वेचा जन्मच मुळी बाजारपेठेच्या गरजेतून झाला आहे. आज त्याला गतीची जोड मिळालेली आहे व भारत त्यासाठी सज्ज झालेला आहे.
बातम्या आणखी आहेत...