आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आहे मनोहर तरीही! (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व भारतीयांच्या आशावादाला फुंकर घालणाऱ्या बातम्या अधूनमधूनच प्रसिद्ध होत असतात. त्या बातम्या सोडल्या तर हा देश आणि देशातील नागरिक किती वाईट आहेत, हे सांगण्याची जणू स्पर्धा लागली आहे, अशी सध्या परिस्थिती आहे. बरे, आपल्या देशातील कोणी काही चांगले बोलले तर त्यावर आपल्या समाजाचा अजिबात विश्वास नाही. त्यामुळेच भारतातील अर्थकारण असो की समाजकारण, त्याचा अभ्यास परदेशी तज्ज्ञ करतात, ते त्यावर ते प्रबंध लिहितात, त्यांना मोठमोठे पुरस्कार दिले जातात, मग कोठे आपला समाज त्यावर चर्चा करतो. एकेकाळी खरी बातमी जाणून घेण्यासाठी बीबीसी ऐकले पाहिजे किंवा पाहिले पाहिजे, असे म्हटले जायचे. बीबीसीही निरपेक्ष नाही अशा काही घटना पुढे आल्यानंतर हे खूळ कमी झाले. अर्थात आपल्याकडे तोपर्यंत खासगीकरणाने वेग घेतला होता. इंग्रजांनी भारतीय समाजाला आत्मवंचनेच्या इंजेक्शनचा इतका दांडगा डोस ठेवून दिला आहे की त्याचा असर अजूनही कमी व्हायला तयार नाही. तर, गेल्या पंधरा दिवसांत अशा चांगल्या बातम्या जगातून येऊ लागल्या आहेत आणि त्या प्रत्येक भारतीय माणसाने विचार कराव्यात अशा आहेत. पहिली बातमी आहे ती जानेवारी ते जून १५ या सहा महिन्यांत झालेल्या विदेशी गुंतवणुकीची. भारतात या काळात जगात सर्वाधिक म्हणजे ३१ अब्ज डॉलरची गुंतवणूक आली. अमेरिका (२८ अब्ज डॉलर) आणि चीन (२७ अब्ज डॉलर) लाही भारताने मागे टाकले. नंतर आला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा जागतिक स्पर्धा इंडेक्स. त्यात भारताने ७१ वरून ५५ अंकांवर झेप घेतली. जगात सर्वाधिक म्हणजे सात किंवा त्यापेक्षा अधिक विकासदर भारताचा असेल, असे भाकीत जागतिक बँकेने आधीच करून ठेवले आहे. देशातील संपत्ती आज काही श्रीमंतांच्या ताब्यात असली तरी ती अंतिमत: त्या देशाची असते, असे मान्य केले तर ग्लोबल वेल्थच्या दोन दिवसांपूर्वीच्या अहवालाने आपल्याला गुदगुल्या व्हायला हरकत नाही. त्या अहवालानुसार भारतात अतिश्रीमंतांची संख्या दोन हजार ८० वर गेली आहे, ज्यांचे प्रत्येकी उत्पन्न पाच कोटी डॉलर म्हणजे किमान ३२५ कोटी रुपये आहे. त्यातील १०० भारतीयांकडे १० कोटी डॉलर म्हणजे ६५० कोटी रुपयांची वैयक्तिक संपत्ती आहे!
पण खरोखरच आनंद व्हावा अशी बातमी बुधवारी आली. ती अशी की गुंतवणुकीसाठी सर्वात आकर्षक देश म्हणून जगातील गुंतवणूकदारांनी भारताला पहिली पसंती दिली. अर्नेस्ट अँड यंग या जागतिक संस्थेने केलेल्या पाहणीनुसार ५०५ गुंतवणूकदारांत ३२ टक्के भारतात व्यवसाय करू किंवा वाढवू इच्छितात. ज्या चीनसोबत आता भारताचे नाव घेतले जाऊ लागले आहे, त्या चीनला त्याखालोखाल फक्त १५ टक्के पसंती मिळाली आहे. रेड टेप, गुंतवणुकीचे गुंतागुंतीचे नियम आणि वाईट पायाभूत सुविधा, हे सर्व असूनही भारताचे ‘मार्केट’ जगाला हवे आहे, याचे गुपित सर्वच जाणून आहेत. घेशील किती हातांनी असा हा १२६ कोटी जनतेचा महादेश आहे. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे हा समाज आता भौतिक सुखांसाठी आसुसलेला आहे, म्हटले तर मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढली आहे. हे सर्व मार्केट जगाला खुणावते आहे. पण दुसरीकडे मार्केट तर वर्षानुवर्षे आहे. आता त्यात स्थिर सरकारची भर पडली आहे आणि ते आर्थिक सुधारणांना वेग देण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. त्या कराव्याच लागतील. कारण व्यवसाय करण्यास अनुकूल देश असा जो इंडेक्स जागतिक बँक करते, त्यात १८९ देशांच्या यादीत आपण १४२ वर म्हणजे खूपच मागे आहोत.
भारताने २५ वर्षांपूर्वी जागतिकीकरण स्वीकारले तेव्हा भारताची बाजारपेठ अशीच विदेशी कंपन्यांनी ताब्यात घेतली आणि भारतातील पैसा बाहेर गेला, असे म्हणणारे कमी नाहीत. त्यातूनच स्वदेशी चळवळ उभी राहिली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आता तर आमच्या शहरांतील प्रमुख रस्त्यांवर सर्व मोक्याच्या जागा बहुराष्ट्रीय कंपन्यानी ताब्यात घेतल्या आहेत. म्हणजे आम्हीच त्यांना विकल्या. आमच्या जमिनीचे भाव वाढले. शेअर बाजार वाढला, आमची मुले परदेशी गेली. हे सर्व एकीकडे स्वीकारत असताना या नव्या वाऱ्याला विरोध करण्याचे काही कारणच राहिले नाही. आता पुन्हा जग ‘मार्केट’ च्या शोधात आहे आणि म्हणून ते भारताला ‘ब्राइट स्पॉट’ म्हणू लागले आहे. ते असे म्हणतात तेव्हा आम्हाला पटते; पण आमच्यातल्या कोणावर आमचा विश्वास नाही! पण अशीच एक आकडेवारी आहे, जी किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, किती लोक दारिद्र्य रेषेखाली फेकले गेले, किती काळा पैसा नव्याने तयार झाला, किती विक्रमी सोने खरेदी केले गेले, किती गैरव्यवहार झाले... या आणि अशा पाहण्या झाल्या की त्याचे निष्कर्ष लाजवणारे असतात. म्हणूनच असे हे सगळे असले तरी अशा सर्व परिस्थितीत आशावादच पुढे घेऊन जातो, असे म्हणतात. तो आशावाद या अलीकडील बातम्यांनी निश्चितच दिला आहे!