आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial Article About PM Narendra Modi London Visit And Hindu Vote

लंडन आणि हिंदू व्होट (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहाणपणाच्या चार गोष्टी तिखट भाषेत ऐकण्याची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणणारा ब्रिटनचा दौरा हा एकमेव म्हणावा लागेल. गेल्या दीड वर्षात अनेक देशांमध्ये मोदींनी प्रवास केला. सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये तेथील भारतीयांचे मोठे मेळावे भरवून कौतुकाचा वर्षाव करून घेतला.

पण लंडनची मिजास और आहे. तेथे मोदींच्या कौतुकाची डाळ शिजली नाही. तेथील सांस्कृतिक जीवन हे पूर्वीपासून स्वातंत्र्याला महत्त्व देणारे आहे. अन्य राष्ट्रांच्या प्रमुखांना खुश ठेवण्यासाठी निदर्शनांवर बंदी घालण्याचा विचारही तेथील पंतप्रधान करू शकत नाहीत. म्हणूनच एकीकडे पंतप्रधान कॅमरून व ब्रिटनची महाराणी नरेंद्र मोदींचे भरभरून स्वागत करीत असताना बाजूच्या मैदानात ‘शेम शेम मोदी’ अशा घोषणा होत होत्या व मोदींना त्या मुकाट ऐकाव्या लागत होत्या.
बिहारमधील पराजयामुळे हे झाले असे म्हणणे चुकीचे ठरेल. बिहारमध्ये मोदींना विजय मिळाला असता तरीही अशाच घोषणा झाल्या असत्या. याचे कारण ब्रिटनमधील प्रबळ डावी विचारधारा हे आहे. या विचारधारेशी भारतातील बहुसंख्य बुद्धिवाद्यांशी नाळ जुळलेली आहे. सामाजिक व नैतिक मूल्यांसाठी भारतातील हा वर्ग नेहमीच ब्रिटनकडे पाहत आलेला आहे. तेथील ‘गार्डियन’सारखी वृत्तपत्रे ही याच नजरेने भारताकडे पाहणारी आहेत. त्यामुळेच ‘हिंदू तालिबानी’ अशी विशेषणे लावत मोदींवर तिखट प्रहार करणारी वार्तापत्रे ‘गार्डियन’मध्ये प्रसिद्ध झाली. तथापि, ब्रिटनमध्ये व्यापारीवृत्तीही ओतप्रोत भरलेली आहे. हा व्यापारी वर्ग नव्या संधी शोधत असतो. त्याला व्यापार वाढवायचा आहे व त्यासाठी चीन आणि भारत या दोन मोठ्या बाजारपेठा त्याला खुणावतात. भारताला ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले असले तरी दोन देशांमध्ये शत्रुत्व राहिले नाही हे या दोन देशांमधील परस्परसंबंधांचे वैशिष्ट्य. याचे मुख्य कारण म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातील अनेक नेते ब्रिटनमध्ये शिकले होते व तेथूनच त्यांना आधुनिक विचारांची दीक्षा मिळाली होती. यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या चार दशकांत या दोन देशांमध्ये व्यापारी संबंध हे सांस्कृतिक संबंधांमुळे जास्त दृढ होत होते. भारतात उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यावर मात्र चित्र बदलले. यानंतरच्या काळात आधुनिक मूल्यांसाठी अकॅडमिक क्षेत्रातील भारतीय ब्रिटनवर अवलंबून असले तरी तंत्रज्ञान व व्यापारासाठी अमेरिका व अन्य देश भारताच्या जास्त जवळ आले. भारताच्या नवीन पिढीवर तर युरोपपेक्षा अमेरिकेचे गारूड जास्त आहे. याच काळात ब्रिटनची अर्थसत्ता दुबळी होत गेली आणि आता तर व्यापारासाठी भारत व चीन यांच्याकडेच ब्रिटिश डोळे लावून बसले आहेत. त्यात भर पडली आहे ती ब्रिटनमधील भारतीयांच्या वाढत्या संख्येची. ही नवी ‘व्होट बँक’ पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला अतिशय महत्त्वाची वाटते. ‘हिंदू व्होट’ असा याचा उल्लेख कॅमरून यांच्या कार्यालयात करण्यात येतो. ‘गार्डियन’सारखी वृत्तपत्रे आधुनिक विचारसरणीचा आग्रह धरून मोदींना जाब विचारीत असली तरी तेथील बहुसंख्य भारतीय व ब्रिटिश नागरिकही भारताकडे व्यवहाराच्या अपेक्षेने पाहतात. बदलत्या वास्तवाची त्यांना जाण आहे. म्हणून ‘भारताला उगाच चार गोष्टी सुनावत बसू नका, भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही. त्याला बरोबरीच्या नात्याने वागवले पाहिजे,’ असे स्पष्ट मत ‘इंडिपेंडंट’ या दुसऱ्या वृत्तपत्राने संपादकीयात मांडले. ‘गार्डियन’मधील लेखक हे मुख्यत: मध्यम वयाचे व मागील पिढीच्या प्रभावातील आहेत. त्यातील अनेक भारतीय व नेहरूंच्या वारशावर श्रद्धा ठेवणारे आहेत. नवीन पिढी वेगळी आहे. वारशाचे ओझे तिच्यावर नाही. त्यांना व्यापार वाढवायचा आहे. मोदींना याची कल्पना असल्यामुळे तिखट प्रश्नांना ते थंडपणे सामोरे गेले. ‘गार्डियन’मध्ये काय येते यापेक्षा लंडन स्टॉक एक्स्चेंज काय म्हणते हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. ब्रिटनला धंदा बरोबर कळतो, म्हणून मोदींबरोबर संबंध सुधारण्यासाठी सर्वात आधी प्रयत्न ब्रिटिश नेत्यांनीच केले होते. भारतातील बदलते वारे ब्रिटिशांनी २०१२ मध्येच ओळखले व मोदींना भेटण्यासाठी खास शिष्टमंडळ आले. तरीही मोदींनी लंडनला भेट देण्यास दीड वर्ष घेतले. कारण आज लंडनकडून घेण्यासारख्या फक्त दोन गोष्टी आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कौशल्य हे वादातीत आहे व जगावरील त्यांची सत्ता गेली असली तरी लंडन ही अजूनही जगाची आर्थिक राजधानी आहे. जगातील भांडवल हवे असेल तर लंडनमध्ये प्रभाव हवा. मोदींना हे माहीत असल्यामुळे लंडन भेटीपूर्वी त्यांनी देशातील १२ क्षेत्रांमध्ये परकीय गुंतवणूक सुलभ केली. भारतातील गुंतवणूक चीनपेक्षा किफायतशीर आहे हे लंडनमधील गुंतवणूकदारांना कळले तर भारताचा फार मोठा फायदा होईल. हे गुंतवणूकदार ब्रिटिश नाहीत, तर सर्व जगातील आहेत हे इथे लक्षात घ्यावे. डेव्हिड कॅमरून यांचे लक्ष ब्रिटनमधील ‘हिंदू व्होट बँके’कडे आहे, तर मोदींचे लक्ष लंडनमधील भांडवलाकडे. ‘शेम शेम’ या घोषणा व तिखट वार्तापत्रे ही फक्त दिवाणखान्यातील चर्चेसाठी आहेत.