आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्णायक वळणावर राहुल (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी अधिकृतपणे काँग्रेसची धुरा खांद्यावर घेणार यावर अखेरीस शिक्कामोर्तब होते आहे. यात आश्चर्याची किंवा नावीन्याची कोणतीच बात नाही. कधी ना कधी हे घडणार होतेच, पण त्यालाही एवढा उशीर का, हाच काय तो प्रश्न. अर्थात हा काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा असल्याने भारतीय जनता पक्षासह इतर कोण्या पक्षाने त्यावर मतप्रदर्शन करण्याची गरज नव्हती. तरीही भाजपकडून तिरकस प्रतिक्रिया उमटलीच. ही प्रतिक्रिया बऱ्यापैकी सार्वत्रिक असल्याने तिचा समाचार घ्यायला हवा. ‘काल सोनिया होत्या, आज राहुल, उद्या राहुल यांचा मुलगा काँग्रेसच्या अध्यक्षपदी येईल,’ अशी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करणारी ही प्रतिक्रिया आहे. 

पक्षांतर्गत निर्णय काहीही होत असले तरी गांधी कुटुंबातील व्यक्तींनी आजवर लोकशाही मार्गाने जनतेचा कौल मागितल्याचे वास्तव आहे. तर मग लोकांनी लोकशाही मार्गाने स्वीकारलेल्या घराणेशाहीबद्दल नाके मुरडता येणार नाहीत. त्यामुळे या चावून चोथा झालेल्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करावे लागते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया यांनी अलीकडे पक्षाच्या दैनंदिन कामकाजातून अंग काढून घेतले आहे. त्यामुळे आताही अप्रत्यक्षपणे ‘राहुलजीं’च्याच शब्दानुसार काँग्रेस डुलते. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना पंतप्रधानांचा आदेश भर पत्रकार परिषदेत टरकावणाऱ्या राहुल यांनी तेव्हाही त्यांचे स्थानमाहात्म्य सिद्ध केले होते. 


काँग्रेसला देशभर एकसंध ठेवणारा पर्याय निर्माण होईस्तोवर ‘गांधी नेतृत्व’ ही काँग्रेसची अपरिहार्यता आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी राहुल यांनी निवडलेली वेळ महत्त्वाची आहे. गुजरात निवडणुकीआधी राहुल यांचा राज्याभिषेक होण्याची चिन्हे आहेत. गुजरातची निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाला सक्षम, बलवान विरोधी पक्षाची आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे विरोधी नेत्याची नितांत आवश्यकता आहे. राज्यांच्या मर्यादा ओलांडू न शकणाऱ्या नवीन पटनाईक, ममता बॅनर्जी, मायावती, एम. करुणानिधी या मंडळींच्या राजकीय मर्यादा एव्हाना स्पष्ट झाल्या आहेत. डाव्यांची राष्ट्रीय पातळीवरची स्वीकारार्हता केव्हाच संपली आहे. लालू, मुलायम, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या कौटुंबिक पक्षांचा जीव थोडका आहे. या निर्नायकी स्थितीत काँग्रेससारख्या देशव्यापी पक्षाचे महत्त्व असाधारण आहे. 


उत्तर प्रदेशातल्या दारुण पराभवानंतर विश्वासार्हता, सातत्य, गांभीर्य, परिपक्वता, राजकीय समज या सर्वच मुद्द्यांवर राहुल यांना लक्ष्य केले गेले. याच राहुल यांना गेल्या दोन-तीन महिन्यांत मिळणारा प्रतिसाद सकारात्मक आहे. नरेंद्र मोदी यांच्या ‘लार्जर दॅन इमेज’ नेतृत्वाकडून झालेला भ्रमनिरास याला कारणीभूत आहेच, शिवाय राहुल यांची बदललेली देहबोली आणि भाषा याचाही परिणाम मोठा आहे. राहुल यांना लोक गांभीर्याने ऐकू लागले आहेत. गुजरात निवडणुकीचा निकाल काहीही लागो, पण काँग्रेसच्या जागा पाचाने जरी वाढल्या तरी ते राहुल यांच्यासाठी सुचिन्ह ठरेल. 


हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या हातून निसटण्याची शक्यता जास्त आहे. पण त्यानंतरच्या कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने सत्ता टिकवली, लगोलग मध्य प्रदेशात जनाधार वाढवला किंवा नंतर राजस्थानात थेट बाजीच मारली तर २०१९ चे चित्र वेगाने पालटेल. ‘नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी’ हा सामना विषम उरणार नाही. राहुल यांची खिल्ली उडवणाऱ्या शरद पवारांसारख्या अनेकांना त्यांचे नेतृत्त्व गपगुपान स्वीकारावे लागेल. महत्त्वाचा प्रश्न पुढे असेल. गुजरातेत काँग्रेसच्या जागांमध्ये काहीच वाढ न होता भाजपची घोडदौड कायम राहिली तर राहुल यांचा पवित्रा काय असेल? उत्तर प्रदेशातल्या पराभवानंतर राहुल विजनवासात गेले. याची पुनरावृत्ती झाली तर मात्र राहुल आणि काँग्रेसचे भवितव्य गर्तेत जाईल. उत्तर प्रदेशची निवडणूक काँग्रेसने नोटबंदी आणि गोमांसाच्या मुद्द्यावर लढवली. हे दोन्ही मुद्दे त्या निवडणुकीने संपवले. गुजरातेत काँग्रेस जीएसटीचा मुद्दा तापवत आहे. 

भाजपने गुजरात जिंकला तर जीएसटीचा मुद्दा निकाली निघेल. परिणामी २०१९ मध्ये आर्थिक विकास (शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारीसह) हा मुद्दा काँग्रेसपुढे उरेल. व्यवसायानुकूल वातावरणाबद्दलचा सकारात्मक अहवाल आणि ‘मुडी’च्या मानांकनानंतर आर्थिक गाडे रुळांवर येत चालल्याची भावना सध्या वाढीस लागली आहे. हे पाहता निवडणूक निकालांचा परिणाम न होऊ देता राजकीय सातत्य आणि आक्रमकता टिकवण्याचे आव्हान राहुल यांच्यापुढे असेल. काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष म्हणूनच नव्हे, तर देशातले सक्षम विरोधी नेतृत्व या नात्याने राहुल यांच्यावर ही ऐतिहासिक जबाबदारी आहे. ‘विकास’ वेडा असो किंवा नसो, ‘पप्पू’ची वेगाने पुसली जाणारी प्रतिमा राहुल यांनी पुन्हा गडद होऊ देता कामा नये.

बातम्या आणखी आहेत...