आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial Article About Raj Thackeray In Maharashtra, Divya Marathi

बुद्धिभेदाचे ‘राज’कारण(अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘भाजपने पंतप्रधानपदाची उमेदवारी दिल्यावर मोदींनी त्वरित गुजरातचे मुख्यमंत्रिपद सोडायला हवे होते..’,
‘महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना (मोदींना) शिवाजी महाराजांची आठवण का आली नाही ?’, ‘राज्यातल्या टोलचे बारा
वाजवणार, रस्ते रोखणार, असेल हिंमत तर अटक करा..’, ‘टोलप्रकरणी या दरोडेखोरांशी (सत्ताधारी) काय चर्चा
करणार ?’, ‘टोलबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन तर पत्रकारांसमक्षच’, ‘निवडणुकीबाबत योग्य वेळी बोलेन..’,
‘आम्ही निवडणूक लढवणार आणि निवडून आलो की पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा देणार..’ ही सर्व
उलटसुलट विधाने एकाच व्यक्तीची अर्थात राज ठाकरे यांची आहेत आणि तीदेखील अवघ्या महिनाभराच्या
अवधीतली ! ‘जेव्हा तुम्ही समोरच्याला समजावू शकत नाही, तेव्हा गोंधळून टाका..’ अशा आशयाचे एक प्रसिद्ध
इंग्रजी वचन आहे आणि नेमका तोच सूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे सध्या आळवत आहेत.
रविवारी पक्षाच्या स्थापनादिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना राज यांनी मोदींना एकतर्फी दिलेला जाहीर पाठिंबा
म्हणजे संभ्रमास्त्र असल्याचे म्हणावे लागेल. एरवी राज यांच्या या भूमिकेवर एवढी भवती न् भवती होण्याचे कारण
नव्हते. पण सध्याच्या ज्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले, त्याच्या परिणामी राजकीय वर्तुळात एकच गहजब
उडाला. किंबहुना, असेही म्हणता येईल की, ही पार्श्वभूमी त्यांनी बुद्ध्याच आणि पद्धतशीरपणे निर्माण केली होती.
आगामी लोकसभा निवडणुकीचे हाकारे-पिटारे सुरू झाले असताना सुमारे महिनाभरापूर्वी नाशिक या आपल्या
बालेकिल्ल्यात दौर्‍यावर आले असता राज यांनी, ‘मोदींनी प्रथम मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा होता,’ असे
विधान करून स्वत:कडे लक्ष वेधून घेतले. नंतर पंधरवड्यात पुन्हा नाशकातच भाजपचे माजी अध्यक्ष नितीन
गडकरी यांच्यासोबत जाहीरपणे एका व्यासपीठावर येऊन त्यांनी गडकरींची वाहवा केली. मग आठवडाभरात
गडकरींनी मुंबईत राज यांची भेट घेतली आणि त्यांना भाजपशी सहकार्य करण्याची गळ घातली. त्यामुळे राज
लोकसभा निवडणुकीत कदाचित आपले उमेदवार उतरवणार नाहीत किंवा शिवसेनेचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी
आहेत त्या त्या ठिकाणीच फक्त मनसेचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली. साहजिकच पक्षाच्या वर्धापनदिनी
राज नेमकी काय भूमिका मांडतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. राज हे फर्डे वक्ते आणि तेवढेच वादग्रस्त
व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांचा टीआरपी मोठा आहे. परिणामी त्यांच्याभोवती सतत वृत्तवाहिन्यांचा गराडा असतो. या
सगळ्याचे पुरेपूर भान बाळगत राज यांनी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याची आखणी केली. त्यानुसार आपल्या
छोटेखानी भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी मनसे निवडणूक लढवणार असल्याचे सांगत पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी
जाहीर केली. एवढ्यावरच न थांबता, निवडून आलेले आमचे उमेदवार भविष्यात पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी
यांनाच पाठिंबा देतील, असे जाहीर करून राजकीय वादळ उठवून दिले. ही भूमिका जाहीर करण्यामागे एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा त्यांचा हेतू आहे.

आपला शत्रू क्रमांक एक असलेल्या शिवसेनेच्या गोटात लढाईच्या प्रारंभीच प्रचंड अस्वस्थता पसरवण्यात आणि
मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्याबरोबरच भाजपमध्येसुद्धा राज यांच्या या भूमिकेने
कल्लोळ उडाला आहे. वरकरणी भाजपला राज यांच्या या भूमिकेचे स्वागत करणे भाग असले तरी त्या पक्षातदेखील
यामुळे भिन्न मतप्रवाह निर्माण झाले आहेत. गडकरी समर्थकांनी अपेक्षेप्रमाणे राज यांची भूमिका उचलून धरली
असली तरी सध्या उद्धव ठाकरे यांच्याशी चांगलीच सलगी केलेले मुंडे व पक्षाच्या इतर स्थानिक नेत्यांना हे फारसे
मानवलेले नाही. भाजपमधील अंतर्विरोध गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहे. या निमित्ताने
त्यामध्ये अधिकच भर पडणार, हे निश्चित. विशेष म्हणजे, काँग्रेसविरोधी मानसिकता असलेल्या मतदारांमध्येसुद्धा
राज यांच्या या भूमिकेने मोठा संभ्रम निर्माण झाला असणार. केंद्र आणि राज्यातील काँग्रेस आघाडीच्या
नाकर्तेपणामुळे वैतागलेले बहुतांश सर्वसामान्य मतदार एखाद्या सक्षम पर्यायाच्या शोधात आहेत. गतवेळी राज यांनी
मराठीसह विविध मुद्दे उचलून धरत स्वत:चा एक पर्याय उभा केला होता. मुंबई, पुणे व नाशिक या पट्ट्यात
मतदारांनी त्याचा बर्‍याच प्रमाणावर स्वीकार केल्याचेही निकालानंतर दिसून आले. तथापि, दरम्यानच्या काळात राज
हा आलेख चढता ठेवू शकले नाहीत.

नाशिक महापालिकेत सत्ता येऊनदेखील मनसे तेथे आपला काही खास प्रभावपाडू शकली नाही. परिणामी राज्यातील काँग्रेस आघाडीविरोधातील जनमत पुन्हा एकदा मोदींच्या माध्यमातून महायुतीकडे कलण्याची दाट शक्यता होती. तथापि, राज यांनीच आता मोदींना पाठिंबा जाहीर केल्याने पुन्हा सगळी गुंतागुंत वाढली आहे. ज्या शहरी भागात सेना-भाजप युतीला अधिक सहानुभूती आहे, नेमके तेच राज यांचेही प्रभावक्षेत्र आहे. आता राज यांनी लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केल्याने काँग्रेसविरोधातील मतांची विभागणी अटळ आहे. पण त्याच वेळी भविष्यात मोदींना पाठिंबा देण्याचे परस्परविरोधी वक्तव्य करून राज यांनी महायुतीकडे वळू पाहणार्‍या मतांच्या टक्क्याला छेद देण्याचा डावही टाकला आहे. बुद्धिभेदाचे हे राजकारण यशस्वी झाले तर अंतिमत: त्याचा फटका महायुतीला बसणार हे उघड आहे. महाराष्ट्रातले सध्याचे एकूणच वातावरण महायुतीला पोषक असल्याचे दिसत असताना राज यांच्या या भूमिकेने आता त्याला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात, ही केवळ सुरुवात आहे. येत्या महिनाभरात राज यांच्याकरवी अशा आणखी काही वादग्रस्त विधानांची भर पडल्यास काय होईल, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.