आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial Article About Shiv Sena And Bjp Issue In Maharashtra

काही तुझे, काही माझे (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चहापान आणि पंचतारांकित हॉटेलमधील गाठीभेटी हा तसा आपल्या राजकीय संस्कृतीत नेहमीचाच विषय असतो. मात्र निवडणुकांच्या तोंडावर भूतकाळ वा वर्तमानातील अशा घटनांचे भांडवल केले जात असते. दोन वर्षांपूर्वी अगदी सहज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मंत्रालयाजवळ असलेल्या भाजपच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यासोबत चहापान घेतले. या चहापानाने पुढे भाजप-शिवसेनेच्या संबंधात पेल्यातले वादळ निर्माण केले. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या तर राजसोबत गुप्त भेटीही झाल्या. राजने भाजप-शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्यासाठी केलेल्या अव्वाच्या सव्वा मागण्यांनी तेव्हा भाजपची दातखिळी बसली होती. अर्थात, हे सारे होत असताना तेव्हाही शिवसेनेतर्फे जाहीर नाराजी व्यक्त केली जात होती. बाळासाहेब ठाकरे हयात असताना आणि त्यानंतरही स्वत: शिवसेनेतर्फेही राजला जवळ आणण्याचे प्रयत्न केले गेले. ‘टाळी एका हाताने वाजत नाही. त्यांनी एक हात पुढे केला तर आम्हीही एक हात पुढे करायला तयार आहोत,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनीही एकदा राज यांना युतीत येण्याचे निमंत्रण देऊन पाहिले होते. मात्र जाहीर निमंत्रणे, खाणाखुणा अशा कशालाच राज दाद देत नाही, हे बघून चवताळलेल्या शिवसेनेला नंतर आपली अब्रू वाचवण्यासाठी पुन्हा राज-विरोधाची जुनीच भूमिका घ्यावी लागली. गोपीनाथ मुंडे हेसुद्धा जाहीर सभांमधून राजला साद घालून थकले. मनसे वर्धापन दिनाच्या तोंडावर बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या राजसोबत गाठीभेटी झाल्या आणि चक्रे फिरली. भाजपविरोधात डमी उमेदवार आणि शिवसेने विरोधात तगडे उमेदवार देण्याची ‘राज-नीती’ आखून ‘स्वर’राज ठाकरे यांनी ‘नमो-नमो’चा राग आळवला. या सार्‍या राजकीय घडामोडींमुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस आघाडी आणि प्रत्यक्ष मनसे यांच्याबद्दल काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. देशात नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचे भाजपतर्फे वारंवार सांगितले जात आहे. एनडीए स्वबळावर सत्तेत येईल, असेही ते सांगतात. मोदी लाट असेल तर मग त्यांना महाराष्ट्रात रामदास आठवले, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांची मदत का लागते? शिवसेना व इतर पक्ष सोबत असतानाही भाजपला पुन्हा राज ठाकरे सोबत का लागतात?2 महाराष्ट्रात आठवलेंची जेवढी ताकद तेवढीच बिहारमध्ये ताकद उरलेल्या रामविलास पासवान यांनाही सोबत का घ्यावे लागते? तिकडे कर्नाटकात भ्रष्टाचारामुळे कलंकित झालेले येदियुरप्पा यांना पुन्हा पक्षात आणण्याची घाई का करावी लागते? उत्तरेत, दक्षिणेत आणि महाराष्ट्रात जर भाजपची अशी केविलवाणी अवस्था असेल तर नेमकी मोदींची लाट कुठे आहे? रामनामाचा जप करून उत्तर भारतीयांना साद घालायची आणि महाराष्ट्रात त्याच उत्तर भारतीयांवर हल्ले करणार्‍या मनसेला मिठी मारायची, हा दुतोंडीपणा तत्त्वनिष्ठेच्या बाता झोडणार्‍या भाजपला शोभतो का? असो. विधानसभेत आम्हाला सोयीचे तेथे उमेदवार उभे करा, अशी जाहीर साद मनसेला घालणार्‍या अजित पवारांचे निकटचे साथी अविनाश भोसले यांनी राजची भेट घेणे तसेच शिरूर व कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेच्या मतांना सुरुंग लावू शकेल, असे उमेदवार राज यांनी जाहीर करणे, या घटनांची संगती लावणे कठीण नाही. दुसरीकडे टोलच्या आंदोलनावरून राज यांच्या पारड्यात श्रेय टाकणार्‍या काँग्रेसलाही 2009 प्रमाणे मुंबईत मनसेमुळे होणार्‍या मतविभाजनाचा लाभ पदरात पाडून घ्यायचा आहे. राष्ट्रीय पातळीवर भाषेच्या आधारावर केल्या जाणार्‍या राजकारणावर टीका करायची आणि राज्यपातळीवर भाषिक राजकारण करणार्‍यांना लाल गालिचा अंथरायचा, हा काँग्रेस आघाडीचा ढोंगीपणाही आता जनतेच्या लक्षात आला आहे.

शिवसेना पक्षाचे संचालन एखाद्या कॉर्पोरेट बॉससारखे करणारे उद्धव ठाकरे यांना पक्षातील नेत्यांनी वा कार्यकर्त्यांनी आपल्याला जय महाराष्ट्र करू नये, म्हणून शिवबंधन बांधावे लागले; तेव्हाच त्यांच्या अगतिकतेचा आणि पक्षावर त्यांची किती पकड आहे, याचा परिचय सर्वांनाच झाला. 2009च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 119 तर शिवसेनेने 169 म्हणजे सुमारे 50 जागा भाजपपेक्षा अधिक लढवूनही शिवसेनेचे भाजपपेक्षा कमी आमदार निवडून आलेत. यावरून राज्यात शिवसेनेची ताकद भाजपपेक्षाही कमी झाल्याचे सिद्ध झालेच होते. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच हे घडले असल्याने आता त्यांच्या पश्चात सेनेची स्थिती दारुण होईल, याचा अंदाज कुणालाही बांधता येतो. भाजपसोबत फरफटत जाण्याशिवाय तिला तरणोपाय नाही.

स्वबळावर लढण्याचे पोकळ इशारे देण्यापलीकडे शिवसेना सध्या तरी काही करू शकत नाही. शिवसेनेला बाजूला सारून मनसेला जवळ करण्याचे मनोरथ भाजपने 2009 पासूनच आखले आहे. तावडेंचे चहापान असो की अलीकडेच गडकरींची झालेली भेट; यामागे किमान मनसेने आपल्याला नुकसान पोहोचवू नये, यासाठी मनसेला गोंजारत राहायचे, ही भाजपची रणनीती असल्याचे उघड आहे. मात्र भाजपच्या सोबतीशिवाय आपले अस्तित्व टिकू शकणार नाही, हे पुरते लक्षात आलेली शिवसेनेची अवस्था केवळ डोळे मिटून दूध पिणार्‍या मांजरासारखी झाली आहे. भाजप, उद्धव आणि राज ठाकरे यांनी मिळून रंगवलेल्या या त्रिनाट्यधारेत मतदारांची शुद्ध फसवणूक झाली आहे.