आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial Article About Tata Consultancy Services TMC

‘टीसीएस’ची भरारी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)चे बाजारमूल्य पाच लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून हा पल्ला गाठणारी ती देशातील पहिली कंपनी ठरली आहे, तर जागतिक स्तरावर आयटी क्षेत्रात अत्युच्च बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांमध्ये टीसीएसने आता दुसरे स्थान पटकावले आहे. या भारतीय आयटी कंपन्यांनी अन्य देशांतून आऊटसोर्सिंगच्या रूपाने येणारे काम स्वीकारतानाच भारतातूनही सॉफ्टवेअरशी संबंधित अनेक कामांचे अन्य देशांत आऊटसोर्सिंग करायला सुरुवात केली. यात टीसीएसचाही समावेश होता. या उलाढालीतूनच देश-विदेशात टीसीएसच्याही कामाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. बुधवारी टीसीएस कंपनीचे बाजारमूल्य 5,06,703.34 कोटींवर पोहोचल्याचे जाहीर झाले त्या वेळी भारतीय आयटी क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले. जागतिक स्तरावर प्रतिस्पर्धी असलेल्या अ‍ॅसेंचर (बाजारमूल्य - 51 अब्ज डॉलर) या आयटी कंपनीला टीसीएसने मागे टाकले आहे. मात्र, अधिक बाजारमूल्य असलेल्या आयबीएम (193.7 अब्ज डॉलर) कंपनीला मागे टाकण्यासाठी टीसीएसला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. इन्फोसिस, एचसीएल, विप्रो, टेक महिंद्रा या प्रमुख स्पर्धक कंपन्यांपेक्षा टीसीएसच्या बाजारमूल्याचे प्रमाण कितीतरी जास्त आहे. 1980 नंतर जगात आयटी क्षेत्रामध्ये देश-विदेशात रोजगाराच्या खूप मोठ्या संधी निर्माण झाल्या. आयटीचा हा फुगा कालांतराने फुटेल असे वाटण्याचा काळ 2008च्या आर्थिक मंदीदरम्यान आला होता, पण त्यातून भारतातील आयटी कंपन्या सावरल्या. भारतीय आयटी कंपन्यांच्या उलाढालीतून मिळणार्‍या महसुलाचा राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नातील वाटा साडेसात टक्के इतका आहे. देशातील पाच सर्वोच्च आयटी कंपन्यांचे जगभरात सात लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. टीसीएसच्या मागोमाग सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या भारतातील अन्य क्षेत्रांतील कंपन्यांत ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, आयटीसी, कोल इंडिया यांचा क्रमांक लागतो. टीसीएसने घेतलेली ही भरारी हा भारतीयांसाठी अभिमानाचा विषय ठरला आहे.