आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेचे (गैर) व्यवस्थापन (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरात आणि गोवा ही दोन्ही भाजपशासित राज्ये सध्या चर्चेत आहेत ती तेथील राजकीय अस्वास्थ्यामुळे. गुजरातमध्ये पाटीदार आंदोलकांनी उधळलेली पक्षाध्यक्ष अमित शहा यांची सभा आणि गोव्याचे संघ प्रांतप्रमुख सुभाष वेलिंगकरांनी संघाशी थेट सवतासुभा निर्माण करत गोवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मांडलेली वेगळी चूल या घटना संपूर्ण देशाचे राजकारण ढवळून काढणाऱ्या ठरल्या आहेत. केंद्रासह बहुतेक प्रमुख राज्यांत सत्तास्थानी असलेल्या आणि अन्य महत्त्वाची राज्येही आपल्या अधिपत्याखाली आणण्याची मनीषा बाळगणाऱ्या भाजपवर अशा प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे, ती सत्तेचे व्यवस्थापन ठीक नसल्यामुळे. गैरव्यवस्थापनातून अस्वस्थता आणि अस्वस्थतेतून बंडाची वा फुटीची लागण हे सूत्र राजकारणात अन्य क्षेत्रांच्या तुलनेत काहीसे जलद लागू पडत असल्याने भाजप व संघाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने वेळीच गंभीरपणे दखल घेणे गरजेचे आहे.
गोवा आणि गुजरातमधील घटनांतून राजकीय अस्वस्थता प्रकर्षाने पुढे आली असली तरी त्याची कारणे वेगवेगळी आहेत. गोव्यातील मतभेद हे प्रामुख्याने तत्त्व, नीती याच्या अंगाने जाणारे आहेत तर गुजरातमध्ये त्याला सरळसरळ राजकीय परिमाणे आहेत. गोव्यात भाजप ज्या परिवाराचा सदस्य गणला जातो त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या मातृसंस्थेला फुटीची लागण झाली आहे. संघाचे गोवा राज्य प्रमुख असलेले सुभाष वेलिंगकर हे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे अनुदान बंद करून केवळ स्थानिक भाषेतील शाळांना राज्य सरकारने प्रोत्साहन द्यावे, अशा आग्रही मताचे होते. स्वदेशी, स्वभाषा अशा मतांना चिकटून राहणाऱ्या संघ विचारप्रणालीशीही ते मिळतेजुळते होते. मात्र, प्रत्यक्षात सत्ता राबवताना असे निव्वळ तार्किकतेचे निकष लावून चालत नाही. गोव्यातील भाजपच्या मंडळींना त्याची जाण असल्याने सत्ताधाऱ्यांनी वेलिंगकरांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यातून मनोहर पर्रीकर यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचे मतभेद वाढत गेले. वेलिंगकरांनी या नेत्यांवर जाहीर टीका सुरू केली. हे संघशिस्तीला बाधा पोहाेचविणारे असल्याने त्यांची उचलबांगडी झाली. संघात यापूर्वी अत्यल्प प्रमाणात का होईना पण तीव्र मतभेदांच्या घटना घडल्या आहेत. त्या त्या वेळी ती मंडळी संघप्रवाहापासून कायमची वा ठरावीक कालावधीसाठी दूर राहिली आहेत. परंतु वेलिंगकरांनी थेट गोव्यात प्रतिसंघ स्थापून उभा दावा मांडला आहे. लवकरच तेथे निवडणुका होऊ घातल्या असल्याने त्यांच्या या कृतीला अनेक अर्थ प्राप्त होतात. त्यानुसार शिवसेनेने भाजपला शह देण्याच्या इराद्याने वेलिंगकरांची पाठराखण करायला सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर पक्ष प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नुकतीच वेलिंगकरांशी प्रदीर्घ चर्चा केल्याने हा विषय पुन्हा तापला आहे. इंग्रजी माध्यमातून स्वत:च्या मुलांना शिक्षण देणाऱ्या सेना नेतृत्वाला महाराष्ट्रात असा निर्णय मानवेल का, असा प्रश्न केला तर अवघड जाईल. तेव्हा मिळेल तेथे भाजपला अपशकुन करण्यात आनंद मानण्यापेक्षा शिवसेनेने राज्यात तसेच महापालिकांत जेथे सत्ता आहे तेथील सुशासनावर भर दिल्यास सर्वांसाठीच बरे होईल. असो. गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच पटेल समाज भाजपपासून दूर जाताना दिसत आहे. हे पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत या समाजाच्या नाराजीचा फटका पक्षाला बसू नये, या हेतूने पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पटेल समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पण पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल सध्या गुजरातबाहेर असतानाही त्याच्या समर्थकांनी चक्क तो उधळण्याचा प्रयत्न केला. एका मोठ्या समाजघटकाने अशा रीतीने जाहीरपणे रोष व्यक्त करणे कुठल्याच सत्ताधाऱ्यांच्या हिताचे नसते. संघ आणि भाजपचे धोरण बहुतेकदा विरोधकांकडे तसेच बंडखोरांकडे दुर्लक्ष करण्याचे वा त्यांना अनुल्लेखाने मारण्याचे असते. आजवर अनेकदा त्याचा त्यांना लाभही झाला आहे. पण आता परिस्थिती वेगळी आहे. भाजप सत्तेत असल्याने असे दुर्लक्ष परवडण्याजोगे नाही. महाराष्ट्रातदेखील मराठा समाजाच्या मोर्चांची सरकार पातळीवरून अद्याप म्हणावी तशी दखल घेतली जात असल्याचे दिसत नाही. खडसेंसारखा ज्येष्ठ नेता आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करत असताना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उघडपणे त्यांच्यासोबत दिसतात. दुसऱ्या बाजूला पोलिसांवरील वाढते हल्ले थांबण्याची चिन्हे नाहीत आणि प्रशासनावरही पाहिजे तसा अंकुश नाही. अशात विविध समाज घटक दुरावले जात असताना भाजपच्या गृहकलहांत होणारी वाढ त्या पक्षाची चिंता वाढविणारी आहे. कारण सत्ता आली की अपेक्षा वाढतात. पण त्यांची पूर्तता होत नसेल तर लोकप्रियतेचा आलेख झपाट्याने घसरायला लागतो. मोदींची लोकप्रियता आणि नाकर्त्या काँग्रेस सरकारबद्दलचा राग यामुळे निर्माण झालेल्या लाटेत सत्तेचा लाभ झालेल्या भाजपने हे विसरता कामा नये.