आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोदवीराची हातघाई (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनोद करणाऱ्या वीराला लोक नेहमीच डोक्यावर घेतात, पण त्याच विनोदवीराचे पाय जर जमिनीवर राहिले नसतील तर मग त्याच्या कृतीचे रूपांतर कारुण्यमय विनोदात होते. कपिल शर्मा या टीव्हीवरील विनोदवीराचीही नेमकी हीच अवस्था झालेली आहे. आपण टीव्हीतील कार्यक्रमात जे काही करतो त्याला लोक भरभरून प्रतिसाद देतात तसेच वास्तव जीवनातही केले तरी त्याची वाहव्वा होणार, अशी त्याला खात्री होती. आपल्या कार्यालयाचे केलेले बांधकाम वाचविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली असल्याचे टि्वट कपिल शर्माने केले. त्याने हे ट्विट थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून ‘हेच का तुमचे अच्छे दिन’ असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला लगेच राजकीय वळण मिळाले. कपिल शर्मा हा सेलिब्रिटी असल्याने त्याच्या तक्रारीची सरकारी दरबारी वायुवेगाने दखल घेण्यात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या चौकशीतून जे सत्य उजेडात यायचे ते येईलच, परंतु कपिल शर्माबाबत जितके राज्य सरकार संवेदनशील दिसले तेवढे ते तळागाळातील माणसे, शेतकरी यांच्याबाबतही असायला हवे आहे. ते तसे नसल्यामुळे फडणवीस सरकार कधी कधी हतबल भासते.

कपिल शर्मा हा भारताचा इंडियन स्टँड अप कॉमेडियन. त्याचा “कपिल शर्मा शो’ प्रचंड गाजतो आहे. “फोर्ब्ज’ या मासिकाने २०१५ साली जगभरातील १०० नामवंतांची जी यादी प्रसिद्ध केली होती त्यात कपिलला २७ व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले होते. असे इतरही अनेक बहुमान त्याला मिळालेले आहेत. हे जरी खरे असले तरी कपिल शर्मा असो वा अन्य कोणी नामवंत तो भारतीय राज्यघटनेतील कायद्यापेक्षा मोठा नाही हे सर्वांनीच नीट लक्षात घेतले पाहिजे. मुंबई महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी कपिल शर्माकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली, त्या अधिकाऱ्यांची नावे उघड करणे हे कपिलचे कर्तव्य आहे. मुंबई महानगरपालिकेने तातडीने कपिलला तसे पत्रही लिहिले आहे, पण त्याने अद्याप उत्तरही दिलेले नाही. कपिलचे कार्यालय मुंबईतील अंधेरी भागातील एसव्हीपी नगरामध्ये आहे. तेथे म्हाडाची रो हाऊसेस तळमजला व पहिला मजला अशा स्वरूपात आहेत. आजूबाजूला तिवर असून सीआरझेड कायदा या क्षेत्राला लागू होतो, पण तरीही हे कायदे डावलून कपिल शर्माने कार्यालयाच्या नावाखाली तिथे दोन मजली बेकायदा बांधकाम केले आहे, असा मुंबई महानगरपालिकेचा दावा आहे. कपिलने जर बेकायदा बांधकाम केले असेल तर त्याला कायद्यानुसार कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जी पाच लाख रुपयांची लाच मागितली त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलिस हे रस्त्यावरील फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करतात हे दृश्य सरेआम दिसते. या यंत्रणांच्या अशा बेमुर्वत वर्तनाने मुंबई शहराची पार दैना उडाली आहे. पदपथ हे मुंबईकरांना चालण्यासाठी नसून फेरीवाल्यांसाठी ते बांधलेले आहेत, असे दृश्य पाहायला मिळते. त्याचबरोबर शहरात जी प्रचंड अनधिकृत बांधकामे झाली आहेत त्यांना स्थानिक राजकारण्यांप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनही अप्रत्यक्षही संरक्षण मिळते याचे तर शेकडो दाखले आहेत. ही केवळ मुंबईचीच व्यथा नाही तर नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, अकोला अशा अनेक शहरांमध्ये आज ही समस्या उग्र स्वरूप धारण करते आहे. कपिल शर्माचे पाय जमिनीवर असते तर आधी हाती सर्व पुरावे ठेवून मग त्याने आरोपांची बत्ती लावली असती, परंतु आपल्या लोकप्रियतेच्या नशेत तो उतावीळपणे वागला. त्याचप्रमाणे कपिलकडे पुरावे नाहीत म्हणून मुंबई महानगरपालिकेला आनंदाच्या उकळ्या फुटायचे कारण नाही. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता असून आगामी निवडणुकीत पुन्हा सत्ता संपादन करण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते स्वबळावर स्वतंत्रपणे लढतीलही. कपिल शर्माचा आरोप पुढे आल्यानंतर शिवसेना, मनसे यांनी तत्काळ त्याच्या विरोधात भूमिका घेतली. भाजपने तर कपिल शर्माच्या घराबाहेरच उपोषण केले. महापालिका निवडणुकीतील मराठी व अमराठी मतांवर डोळा ठेवून हे राजकारण चाललेले आहे. मात्र मुंबई व महाराष्ट्रात कोणीही यायचे, कायदे न पाळता मन मानेल तसे राहायचे हे यापुढे चालू देता कामा नये. हे प्रकार रोखण्यासाठी निवडणुकीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वच राजकीय पक्षांनी निर्धार केला पाहिजे. नाहीतर कपिल शर्माच्या कार्यक्रमातील विनोदापेक्षा अतिशय वाईट दर्जाचे विनोदी वर्तन महापालिकेपासून संबंधित घटकांचे होईल आणि त्या स्टँड अप नव्हे तर स्टुपिड कॉमेडीवर मग सारे जग हसेल...