आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कणभर काम, मणभर आभास (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांची गर्दी वाढल्यापासून विधिमंडळावरचा त्याचा प्रभाव आणि दबाव स्पष्टपणे वाढलेला आहे. विधिमंडळात अभ्यास वगैरे करून येण्याची गरज फारशी उरलेलीच नाही. कॅमेऱ्यांसमोरचे काही सेकंदांचे ‘बाइट्स’ आणि काही मिनिटांचे आंदोलन आटोपले की जणू आमदारांची कर्तव्यपूर्तीच होते. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ‘चमकोगिरी’ करण्याची परंपरा दिवसेंदिवस वाढते आहे. कणभर काम प्रत्यक्ष करून दाखवण्याआधीच कॅमेऱ्यासमोर मणभर ‘आभास’ निर्माण करण्यासाठीच सगळे धडपडतात. कोणताही पक्ष या लागणीपासून वाचलेला नाही. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे अधिकार आणि कर्तव्ये यांची आठवण आमदारांना करून द्यायला हवी, असा गैरसमज मात्र कोणी करून घेऊ नये. आमदारांना या सगळ्याची चांगली जाणीव आहे. विरोधी आणि सत्ताधारी अशा दोन्ही बाकांवर अनेक ज्येष्ठ, अनुभवी सदस्य आहेत. तरीही राजकारणाने घेतलेले हे वळण न समजण्यासारखेच आहे. नागपुरात सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात दुर्दैवाने याच वळणावर गेली. शेतकरी आत्महत्या आणि शेती प्रश्नांचा उपयोग राजकारणासाठी करत दोन्ही सभागृहे गुंडाळली गेली. अपवादात्मक तालुक्यांची स्थिती वगळता राज्यात दुष्काळाचे संकट गहिरे होत आहे. गावे-शहरे पाणीटंचाईच्या कोरड्या गर्तेत सापडली आहेत. पहिल्या दिवसापासून या विषयावर विधिमंडळात गंभीर चर्चा सुरू झाली असती तर आमदारांबद्दल लोकांमध्ये चांगला संदेश गेला असता. हिवाळी अधिवेशनाकडे राज्याची जनता डोळे लावून बसली आहे. पश्चिम महाराष्ट्रातले ऊस शेतकरी, खान्देश-मराठवाड्यातील कापूस उत्पादक, विदर्भातली सोयाबीन-संत्रा कास्तकार यातल्या प्रत्येकाची स्थिती बिकट आहे. सलगच्या तीन वर्षांच्या पाणीटंचाईमुळे शेतकरी पिचला आहे. विधायक काम करू इच्छिणाऱ्या राजकीय पक्षांसाठी हा काळ अनुकूल म्हणावा असाच. परंतु, ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या नाकर्त्या आमदारांचे प्राधान्यक्रम वेगळे असल्याने त्यांनी ही संधी घेतली नाही. शिवसेना शेतकऱ्यांप्रती कळवळा दाखवते आहे. भाजप ठोस निर्णय घेताना दिसत नाही. राज्यातल्या ग्रामीण भागाची अवस्था नेमकी आहे तरी काय? नागरी भागातल्या पाणीटंचाईवर सरकारकडे कोणते उत्तर आहे? पावसाळा आणखी किमान सात महिने आहे. तोवर या राज्याची तहान कशी भागणार आहे? या सगळ्या प्रश्नांची गंभीर उकल कोठे होणार?
संसदीय कार्यपद्धतीचा सर्वाधिक अनुभव असलेल्या काँग्रेसनेही हे भान दाखवण्याऐवजी जोरदार मोर्चा काढून राजकीय ताकद दाखवण्याचा अनाठायी प्रयत्न केला. मोर्चांना गर्दी कशी जमवली जाते, हे आता जगजाहीर आहे. तरीही अशा कृत्रिम गर्दीमुळे कोणाला बाळसे येणार असेल तर तो ज्याचा-त्याचा प्रश्न. पण मग अशा मोर्चासाठी विधिमंडळाचे कामकाज बंद पाडण्यात काय हशील होते? नागपुरातले रस्ते काही तासांपुरते तुडुंब करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले का? रस्त्यावरच गर्दी गोळा करायची तर विधिमंडळात आमदार म्हणून जाण्याची गरजच काय, असे प्रश्न काँग्रेस नेत्यांना विचारायला हवेत. विधानसभेत काँग्रेसने शेतकरी आत्महत्या, दुष्काळी स्थिती आणि पाणीटंचाईचा विषय काढला खरा. मात्र, त्यामागे चर्चा करण्यापेक्षाही कामकाज बंद पाडण्याचाच उद्देश होता. विधान परिषदेत याचीच पुनरावृत्ती झाली. वास्तविक नियोजित कामकाज बाजूला ठेवून शेतकरी प्रश्न आणि पाणीटंचाईवर चर्चा करण्याची तयारी सरकारने दाखवली होती. तेव्हा गावोगावच्या स्थिती आणि पाणी उपलब्धतेचा अचूक तपशील विधिमंडळात नेमकेपणाने मांडून सरकारला कोंडीत पकडण्याची नामी संधी विरोधकांपुढे आहे. विरोधकांनी चर्चाच टाळली. हे खेदजनक आणि संतापजनक आहे. ‘राष्ट्रवादी’ मंडळींचे सगळे लक्ष सध्या शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कारातच अडकले की काय, अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे. पवारांचे तीन मोठे सत्कार दिल्ली, मुंबई आणि पुण्यात होऊ घातले आहेत. त्याबद्दल कोणाला आक्षेप असण्याचे कारण नाही. या तिन्ही सत्कारांच्या तारखा अधिवेशन काळातल्याच आहेत. गर्दी जमवण्याचे लक्ष्य दिल्याने ‘राष्ट्रवादी’चे नेते या अमृतमहोत्सवी आयोजनातच गुंग आहेत. जनतेच्या अपेक्षा नेमकेपणाने मांडण्याला विरोधकांचे प्राधान्य नसल्याचे अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांतच स्पष्ट झाले; परंतु त्यामुळे राज्य सरकारची जबाबदारी हलकी होत नाही. राज्य मोठ्या जलसंकटाच्या तोंडावर उभे आहे. हिवाळा संपण्याआधीच पाण्यासाठीची वणवण सुरू झाली आहे. खरिपाने शेतकऱ्याला हात दिलेला आहे. रब्बीही करपून चालला आहे. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ने पंधरा वर्षे काय केले, हे एेकण्यात जनतेला रस उरलेला नाही. दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत, या स्वप्नरंजनाची आशाही या क्षणाला कुचकामी आहे. आज, आता, ताबडतोब काय करणार आहात, हे जनतेला सांगा. अन्यथा सत्ताधाऱ्यांना चारचौघांतून फिरणे मुश्कील झाल्याचे पाहावे लागेल.