आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखलखीत यश (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताच्या सर्वात मोठ्या चमूने अपेक्षांचा भंग केला असतानाच भारताच्या साक्षी मलिक आणि पी.व्ही. सिंधू या नारीशक्तीने देशाची लाज राखली. त्याच रिओमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भारताच्या मरिअप्पन, देवेंद्र, दीपा मलिक यांनी शारीरिक अपंगत्वावर मात करून आपल्या जिद्दीचा आदर्श तमाम भारतीयांपुढे पेश केला. ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या की भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची, त्यांच्या अस्तित्वाची दखल घेतली जाते. पॅरालिम्पिक स्पर्धांमधील सहभागी भारतीयांना कुणीही विचारत नाही. या वेळी रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय चमूच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर पॅरालिम्पिक स्पर्धा भारतीयांसाठी लक्ष वेधणाऱ्या ठरल्या. मरिअप्पनने उंच उडीचे तर देवेंद्रने भालाफेकीचे सुवर्णपदक पटकावून नवा इतिहास नोंदविला. दीपा मलिकने गोळाफेकीचे रौप्यपदक पटकाविले. या खेळाडूंच्या पदकाप्रमाणेच सहभागाचे कौतुक व्हायला हवे. १६ पुरुष व ३ महिला खेळाडूंनी रिओ पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. भारतीय पॅरालिम्पिक असोसिएशन या खेळाडूंना थोडी फार मदत करते. मात्र त्यांना ती मदतही सर्वांपुढे हात पसरून घ्यावी लागते. सराव आणि स्पर्धांमधील प्रत्येक सहभागासाठी संघटना आणि खेळाडूंना सर्वांपुढे हात पसरावे लागतात. जी मदत मिळते त्यामध्ये स्वत:च्या खिशातील पैसे टाकून ही मंडळी दर ऑलिम्पिकला जात असतात. त्यांची जिद्द ही निसर्गाने त्यांच्यावर अन्याय केल्यापासून किंवा अपघातानंतर आलेल्या अपंगत्वानंतर सुरू होते. वयाच्या ५व्या वर्षी पायावरून ट्रक गेल्यामुळे अपंग झालेला मरिअप्पन गप्प बसला नाही. आयुष्यभर सतत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत, शिकत राहिला. एमबीएची पदवी मिळविली. ज्या शाळेने त्याला अॅथलेटिक्स या खेळासाठी सरावाची संधी दिली त्या शाळेला त्याने बक्षिसाच्या रक्कमेपैकी तब्बल तीस लाख रुपये दान देण्याची ‘दानत’ दाखविली. सालेम (तामिळनाडू) येथील मरिअप्पन आधी व्हॉलीबॉल खेळायचा. पण त्याच्या शिक्षकांनी व मित्रांनी उंच उडीत भाग घेण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले. त्यामुळे गेल्या ४ वर्षांत त्याची कामगिरी उंचावत गेली. रिओसाठी पात्र ठरताना त्याने ट्युनिशिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १.७८ मीटर उंच उडी मारली. रिओ पॅरालिम्पिकमध्ये त्याने आपल्या उंच उडीचा ‘बार’ १.८७ मीटरपर्यंत उंचावला. भारताच्या या पहिल्यावहिल्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला तामिळनाडू सरकारने दोन कोटी रु.चे बक्षीस दिले तर केंद्र सरकारने ७५ लाख रु.चे बक्षीस जाहीर केले. दीपा मलिक ही पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक (रौप्य) मिळवून देणारी महिला ठरली. जलतरणापासून भालाफेक, गोळाफेक आदी मैदानी खेळांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या दीपाने शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या महिलांना मोटारस्पोर्ट््स या खेळात मानाचे स्थान मिळवून दिले. खेळाची प्रतिमा ही स्पर्धेपलीकडे आहे, असे तिचे मत आहे. अपंगत्व आलेल्या महिलांच्या इच्छा आकांक्षांनाही पंख लावून उडता येते हे सिद्ध करण्यासाठी दीपा धडपडत आहे. एरवी पॅरालिम्पिक स्पर्धा उपेक्षितच असतात. रिओ ऑलिम्पिकला गेलेल्या भारतीय चमूचा केवढा डंका पिटला गेला होता. सर्व स्पर्धांचे थेट प्रक्षेपण करण्यात येत होते. पॅरालिम्पिक स्पर्धा आणि खेळाडू मात्र तेवढे सुदैवी नाहीत. ना त्यांच्या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण झाले ना ‘हायलाइट्स’ दाखविले गेले. हीच या खेळाची आणि खेळाडूंची खंत आहे. सरकारदेखील सरावादरम्यान मदत करीत नाही. भारतीय क्रीडा प्राधिकरणाची थोडीफार मदत होते. एरव्ही खासगी संस्था, कंपन्या आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीच्या आधारानेच भारताच्या पॅरालिम्पिक खेळाडूंची वाटचाल सुरू आहे. जेव्हा चांगली कामगिरी करून आम्ही विविध खेळांमध्ये, विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकतो, तेव्हा प्रसिद्धिमाध्यमांपासून सर्वजण आम्ही फार काही मोठे केले नाही असा आविर्भाव आणतात, मात्र जेव्हा एखादी चूक किंवा घटना घडते, तेव्हा हीच मंडळी अपप्रसिद्धीसाठी पुढे येतात. हा या खेळाडूंचा अनुभव आहे. देवेंद्रने २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक पटकावले होते व रिओमध्ये त्याने सुवर्णपदकाची डबल्स केली आहे. मात्र अपंग खेळाडूंच्या या स्पर्धेकडे कुणी फारसे लक्ष देत नसल्याने हे विक्रम कुणाच्या खिजगणतीतही नाहीत. भारताच्या तुलनेत अन्य देशांमध्ये असे होत नाही. तेथे पॅरालिम्पिक खेळाडू आणि अन्य खेळाडू यांना एकाच तराजूत तोलले जाते. एकच न्याय मिळतो. अपंगत्वावर मात करून क्रीडाकौशल्याचे शिखर गाठणे सोपे नाही. एवढेच नव्हे तर यंदा रिओ पॅरालिम्पिकच्या मध्यम पल्ल्याच्या धावपटूंनी नोंदविलेली वेळ ही धडधाकट धावपटूंच्या रिओ ऑलिम्पिकपेक्षा कमी आहे. अपंग धावपटू धडधाकट धावपटूंपेक्षा वेगात धावले हे कटू सत्य आहे. भारतीयांनीदेखील अपंग क्रीडापटूंचा आदर, मानसन्मान करायला हवा. आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.
बातम्या आणखी आहेत...