आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुन्न करणारी घटना (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाचा स्वातंत्र्यदिन एका दिवसावर येऊन ठेपला असतानाच उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरातील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात सुमारे ७० नवजात अर्भकांच्या मृत्यूच्या घटनेने संपूर्ण देश अस्वस्थ झाला, हळहळला. मनाला अत्यंत वेदना व सुन्न करणारी ही घटना आहे. घटना ज्या गोरखपूर शहरात घडली ते शहर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजकारणाचा बालेकिल्ला आहे. गेली २०-२५ वर्षे आदित्यनाथ यांची या शहरावर व आसपासच्या परिसरावर राजकीय-आर्थिक पकड आहे तरीही येथे अशी दुर्दैवी घटना घडली. महत्त्वाचे म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी याच महिन्यात रुग्णालयाला भेट दिली होती, शिवाय आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी ९ जुलै व ९ ऑगस्ट रोजी भेट दिली होती.

या दौऱ्यात रुग्णालयाच्या प्रशासनाने ऑक्सिजन सिलिंडरच्या खरेदीसाठी पैशाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे का केली नाही, असा सवाल आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. सरकारनेच ५ ऑगस्ट रोजी ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करण्यासाठी पैसे रुग्णालय प्रशासनाकडे सोपवले होते, पण प्रशासनाने कोणतीच हालचाल केली नाही असा त्यांचा दावा आहे. या ७० नवजात अर्भकांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी नव्हे तर साथीचे रोग, किडनी रोग, मेंदूज्वर, न्यूमोनिया, श्वसनरोग व अन्य कारणांमुळे झाला, असेही सरकार आता सांगत आहे. ही कारणे चौकशीनंतर पुढे येतील, पण या घटनेमुळे बाबा राघवदास या रुग्णालयाचा बेजबाबदारपणाही उघडकीस आला. गेल्या दोन वर्षांत या रुग्णालयात रोज १७ ते १८ नवजात अर्भकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती बाहेर आली आहे.

१२ वर्षांपूर्वी याच रुग्णालयात दरवर्षी १२०० मुलांचा मृत्यू विविध आजारांनी उपचारादरम्यान होत असल्याचे प्रकरण बाहेर आले होते. तेव्हा केंद्रात यूपीए सरकार होते. त्या वेळी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. आरोग्यमंत्र्यांच्या गोरखपूर फेऱ्या वाढल्या होत्या तरीही एक तपानंतर परिस्थितीत काहीच सुधारणा दिसून आलेली नाही हे दुर्दैवी व संतापजनक आहे. बाबा राघवदास रुग्णालयाचा ढिसाळ कारभार हा राजकीय पक्षांसाठी नेहमीच निवडणुकांवेळी राजकीय मुद्दा असतो. नुकत्याच झालेल्या उ. प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यात गोरखपूरनजीकच्या मनबेला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत सभा घेतली होती. या सभेत मोदींनी या रुग्णालयातील अर्भकांच्या होत असलेल्या मृत्यूबद्दल त्यावेळच्या राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते व आपले सरकार सत्तेवर आल्यावर परिस्थिती बदलेल, असे आश्वासन दिले होते. आज त्या आश्वासनाची आठवण मरण पावलेल्या अर्भकांचे आईवडील सरकारला करून देताना दिसत आहेत. म्हणून केंद्राने तातडीने अहवाल मागितला आहे.
 
आर्थिक चणचण व अपुऱ्या सोयीमुळे बाबा राघवदास रुग्णालयातील गैरकारभार हा केव्हाच हाताबाहेर गेला आहे. या रुग्णालयात दरवर्षी केवळ मेंदूज्वरावर उपचार करून घेण्यासाठी अडीच हजार ते तीन हजार केसेस येतात. बहुसंख्य रुग्ण गोरखपूरच्या नजीक असलेल्या बस्ती, आझमगड, बिहार, नेपाळ अशा भागातून येतात. त्यात दरवर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात साथीच्या रोगामुळे रोज ४०० ते ७०० रुग्ण दाखल होत असतात. १९७८ पासून आजपर्यंत सहा हजार मुलांच्या मृत्यूला केवळ मेंदूज्वर कारणीभूत ठरल्याचे दिसून आले आहे. या आजारावर आवर घालण्यात सरकारी पातळीवरील प्रयत्न फक्त या रोगाच्या उच्चाटनावर केंद्रित आहेत. वास्तविक मेंदूज्वर रोगात होत असलेले बदल आणि हे बदल रोखणारी वैद्यकीय यंत्रणा आजपर्यंत या प्रदेशात प्रशासनाला आणता आलेली नाही. त्यामुळे डॉक्टरही मुलांच्या आजाराचे निदान करताना गोंधळून जातात. या रुग्णालयात रुग्णांना दिलेली निम्न दर्जाची औषधे हा विषय किंवा ऑक्सिजन सिलिंडरचा होणारा अपुरा पुरवठा हे प्रश्न आजच निर्माण झालेले नाहीत, तर ते वर्षानुवर्षे सुरू आहेत.

रुग्णालयात अर्भकांसाठी आयसीयूचे केवळ ५० बेड आहेत व महिन्याला सुमारे ४०० केसेस येतात. अनेकदा एका वॉर्मरमध्ये चार अर्भकांना ठेवण्यात येते. रुग्णालयाचे प्रशासन अर्भक दगावल्यास त्याची जबाबदारी रुग्णालयाची नाही असेही अर्भकाच्या आईवडिलांकडून लिहून घेतात. इतका बेधुंद व मनमानी कारभार या रुग्णालयाचा आहे. अशा रुग्णालयाच्या चौकशीतून सरकारला नवे काय साध्य होईल हा प्रश्नच आहे. मात्र चौकशीच्या निमित्ताने दोषारोपाचे राजकारण सुरू होईल. योगी आदित्यनाथ यांनी मागील अखिलेश यादव सरकारच्या कारभाराकडे बोट दाखवलेच आहे. केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असताना इतरांवर दोष ढकलण्याचा कृतघ्नपणा जनतेला दोघांकडूनही नको आहे. योगी आदित्यनाथ यांना ही घटना राजकीयदृष्ट्या अधिक जड जाऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...