आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुष उवाच ! (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमर्याद काळ आणि अवकाश याचा अजूनही थांगपत्ता न लागलेल्या या सृष्टीत माणसाने आपला असा काही ठसा उमटवला आहे की काळाला क्षणभर थांबण्याचा मोह व्हावा आणि अवकाशानेही त्याच्या व्यापकतेत भरून राहिलेल्या निरपेक्षतेची क्षमा मागून पृथ्वी ही आपली आवडती, ‘लाडकी मुलगी’ आहे, असे म्हणावे. अशा या पृथ्वीवर स्त्री-पुरुष अशा परस्परपूरक जीवन जगणाऱ्या माणसाचा प्रवास किती हजार वर्षांचा आहे, हे शोधण्याचा खटाटोप तो करतोच आहे. गंमत पाहा, जो जगतो त्यालाच माहीत नाही की आपण नेमके कधी जन्मलो? आपण कसे वाढलो? खरे म्हणजे त्याला पृथ्वीवर जगण्याचा सोहळा साजरा करण्यासाठी एवढे सवंगडी दिले आहेत की त्याने अवकाशाच्या पोटात ‘अजून आहे का कोणी’ याचा शोध घेण्याच्या फंदात पडू नये.
पण ऐकेल तर तो माणूस कसला? कोणी म्हणतात, त्याला एकटेपणा नकोसा झालाय म्हणून तो शोध घेतो आहे. अरे, पण पृथ्वीवर अजून किती गोष्टी समजून घ्यायच्या राहिल्या आहेत! या प्रवासात तू वास्तव्यास राहणाऱ्या तुकड्यालाच जग आणि एकट्याच्या कर्तृत्वालाच जगणे समजू लागला होतास. स्वत:भोवतीच कुंपण आखून घेतले तेव्हाच लक्षात आले की तुला नको ते मोह झाले आहेत. म्हणजे तुझ्यात मालकीभाव आला आणि तू त्याला इतके पोसले की जगण्याचा सोहळा बाजूलाच राहिला. सोहळा आणि व्यवहारात जमीन-अस्मानाचा फरक आहे. जन्मदाती आई - जिने जन्म दिला आणि तुला हा रोमांचित करणारा अद्वितीय सोहळा अनुभवण्यास मिळाला, त्या अत्युच्च नात्याला जोडली आहे ती व्यवहाराच्या कोणत्याही व्याख्येत न बसणारी माया. व्यवहाराच्या कितीही टिमक्या वाजवल्या तरी न मिळणारे प्रेम. सबल की दुर्बल, हे या सोहळ्यात न शोभणारे शब्द आहेत; पण तेच वापरून तू आपला मोठेपणा आणि आपलाच कोतेपणा सिद्ध करतो आहेस! सहअस्तित्वाचे भान सोडून काळाला आणि अवकाशाला गवसणी घालण्याचा हा केवढा आटापिटा!
माणूस आज जागतिक महिला दिन साजरा करतो आहे. याचा अर्थ त्या व्यवहाराच्या प्रवासात हरवलेला सोहळा शोधतो आहे. निसर्गाने दिलेले हे परस्परपूरकतेचे वरदान आपण हातात हात घालून हा सोहळा किती आनंददायी करू शकतो याला पुरून उरणारे आहे. पण त्या जन्मदातीच्या वेदना, तिची माया, तिचे प्रेम यावर उभे राहिलेले हे आयुष्य आपण आपल्याच कर्तृत्वाने उभे केल्याचा दर्प त्याला झाला आहे. तिच्या सहअस्तिवाशिवायच्या एकेरी कोरड्या प्रवासाची त्याने नुसती कल्पना करून पाहावी! तथाकथित आधुनिकतेत काळाच्या रेघा ओढून सर्वच जगण्याच्या नोंदी करण्याची वाईट सवय त्याला लागली आहे. पण माया आणि मायेची अशी नोंद करता येत नाही. ज्याला तो मूर्तस्वरूप म्हणतो किंवा त्याला सर्व काही मोजायला आवडू लागले आहे, तशी मायेची आणि प्रेमाची मोजणी करता येत नाही राजा! ज्याची मोजणी करता येत नाही त्याचे मोल नाही, असे समजण्याची घोडचूक करून तो चांगले जगण्याचा प्रयत्न करतो आहे! अशा अनेक घोडचुका सुधारण्याचा प्रयत्न म्हणून तो अशात काही हरवलेली नाती शोधतो आहे. त्या नात्यांतील निखळता शोधतो आहे. व्यवहाराच्या तराजूत न मावणारी ही नाती, ती समरसून जगणे, त्याचा आदर करणे, त्याची सर्व प्रहरात आठवण ठेवणे हे त्याला आज फार अवघड वाटू लागले आहे. असे वाटत असेल तर मग आधुनिक आणि पुरोगामी शब्दांचे अर्थ बदलून टाकूयात. अरे, ते तर जगणे आहे. तेच तो विसरला की काय? त्याची आठवण करून देण्यासाठीच असेल कदाचित, पण तो एका शतकापासून महिला दिन साजरा करू लागला.

बरेच झाले म्हणा. सबल-दुर्बलतेची चर्चा करणे याचा अर्थ अपरिहार्य सहअस्तित्व अमान्य करणे आहे, हे त्याला आता पुन्हा पटू लागले आहे. ज्याला तो मानवी प्रतिष्ठा म्हणतो, तो मानव म्हणजे केवळ पुरुष नव्हे, याचा त्याला उलगडा होतो आहे. हातापायात बळ येईतो आणि जगण्याचे आकलन होईतो आपण किती परावलंबी होतो याची त्याला जाणीव होते आहे आणि पुरुषी शक्तीचे पोषण मुळात आईच्या दुधातून झाले आहे याची त्याला पुनःपुन्हा आठवण होते आहे. अपेक्षेविना झिजण्याचा आणि आतून येणारा मायेचा उमाळा हा जो आनंद आहे तो सर्वांनी सारखा वाटून घेतला पाहिजे. पण त्यात आपण कमी पडतो आहोत हेही त्याला कळू लागले आहे! महिलांना सबल करणारे पुरुष कोण? त्या तर पुरुषांपेक्षा सबल आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणाले. ही पुरुषांच्या वतीने दिलेली निखळ कबुलीच होय.