आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होता शिवा म्हणून....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंहगड, विशाळगड, रायगड व पन्हाळा हे महाराष्ट्रातील अभेद्य गड. पन्हाळगडाच्या संदर्भात विचार करता शिवचरित्रातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांचा हा गड साक्षीदार ठरला आहे. त्यात सिद्दी जोहरच्या वेढ्याचा प्रसंग तर मोठा रोमांचकारी आहे. कारण महाराष्ट्रात पन्हाळा ताब्यात असणे म्हणजे कोकणात गोव्यापर्यंत व देशावर बेळगाव, धारवाडपर्यंतचा प्रदेश जरबेत असणे असे त्या काळचे लष्करी व राजकीय गणित होते. प्रतापगडावर अफझल खान मारला गेला. रुस्तुम झमान सपाटून मार खाऊन माघारी आला आणि लगेच रुस्तुम झमान, अफझलपुत्र फाजल खान, सिद्दी मसूद अशा नामांकित सेनानींना आदिलशहाने मोठ्या उमेदीने पन्हाळ्यावर मोहिमेस धाडले. 20 हजार घोडदळ, 35 हजार पायदळ अशी 55 हजारांची फौज घेऊन जोहर पन्हाळगडावर चालून आला. शिवाजी महाराज वेढ्यात सापडले. महाराजांनी शिवा काशीद यांची कामगिरीसाठी निवड केली आणि ती काशीद (न्हावी) यांनी इमाने-इतबारे निभावली. मरणालाही न घाबरता त्यांनी महाराजांच्या सुटकेसाठी हसत-हसत बलिदान दिले.
पन्हाळगडाच्या पायथ्याशी, पूर्व बाजूवर नेबापूर गाव आहे. शिवा काशीद हा त्या गावचा न्हावी (नाभिक). तो चतुर व बातम्या काढण्यात तरबेज आणि कलेत चिवट होता. महाराजांनी पहिल्यांदा पन्हाळा जिंकून घेतला आणि त्याच वेळी शिवा न्हावी त्यांच्या नजरेत आला. महाराजांनी त्यांची हेर खात्यात नेमणूक केली. त्यानंतर पन्हाळगडास सिद्दी जोहरचा वेढा पडला. गड चारही बाजूंनी वेढला गेला. महाराज मोठ्या संकटात सापडले. जोहरला कसा चकवा द्यावा, या विचारात ते गढून गेले. त्यांना एक कल्पना सुचली. जोहरशी शरणागतीच्या वाटाघाटी सुरू करून शत्रूस गाफील करायचे आणि रात्रीच्या अंधारात पन्हाळगडावरून निसटून विशाळगडाकडे जायचे. त्याच वेळी शिवाजीराजांचे सोंग घेऊन कोणास तरी पालखीत बसवून नेहमीच्या वाटेने पाठवायचे. शिवाजीराजे निसटून जाताना शत्रू सावध होऊन पाठलागास आला तर नेहमीच्या वाटेने जाणारी पालखी त्याच्या नजरेस पडेल आणि तीच पालखी अडकेल. काही काळ तरी शिवाजीराजांना पकडल्याच्या भ्रमात राहणार होता. यादरम्यान शिवाजीराजे विशाळगडाकडे निघून जाणार होते. ही कल्पनाच भयंकर होती. ती फत्ते करण्यासाठी हवा होता धाडसी, हुशार, अभिनयकलेत तरबेज, विशेष म्हणजे महाराजांच्या रूपाचा व त्यांच्या अंगकाठीचा सेवक! शोध सुरू झाला आणि लगेच त्यांच्या सेवेतच असलेल्या शिवा काशीदवर नजर थांबली. चोहोबाजूंनी शिवाजी महाराजांसारखा दिसणारा हा शिवा काशीद. लगेच शिवा काशीद यांना सर्व हकीकत सांगितली. सर्व धोके समोर मांडले. वेळ आली तर मृत्यूला कवटाळावे लागेल! शिवा काशीद यांनी हे सर्व मान्य केले आणि योजना आखली गेली.
आषाढाचे दिवस. पन्हाळ्याचा मुसळधार पाऊस. काळाकुट्ट अंधार आणि अवघड, निसरड्या डोंगरवाटा. अशा परिस्थितीत रात्रीचा एक प्रहर उलटून गेल्यावर पन्हाळ्यावर दिंडी दरवाजातून दोन पालख्या बाहेर पडल्या. दोन पालख्यांमध्ये दोन शिवाजीराजे. एकीत खरा, तर दुसरीत सोंग घेतलेला. खºया राजांची पालखी आडवाटेस लागली, तर खोट्या राजांची पालखी नेहमीच्या रस्त्याने पुढे जाऊ लागली. सर्वत्र गडद अंधार. त्यातच धुवाधार पाऊस कोसळत होता, पण त्याही परिस्थितीत गडाच्या बाहेर पडणाºया वाटांवरील चौक्या जाग्या होत्या. वाटांवर लक्ष ठेवून होत्या. एक पालखी दिसताच चौकीतील शत्रू सैनिकांनी पालखीला घेरा टाकला. शत्रूच्या हातावर तुरी देऊन निसटणाºया ‘शिवाजीराजां’ना त्यांनी पकडले होते! आनंदाच्या बेहोशीतच त्यांनी राजास त्यांच्या पालखीसह जोहरच्या गोटात आणले व त्याच्यासमोर उभे केले.
जोहरच्या छावणीत आनंदीआनंद पसरला. शिवा काशीदने हुबेहूब सोंग वठवले होते, पण काही वेळानंतर जोहरच्या गोटातील चाणाक्ष माणसे सावध झाली. महाराजांच्या डोळ्याच्या वरच्या बाजूस वार झाल्याची निशाणी होती. ती जिरेटोप असल्यामुळे दिसत नसे. जोहरने टोप मागे सरकवला तेव्हा शिवा काशीदांचे सोंग उघडे पडले.
क्षणार्धात जोहरच्या छावणीतील वातावरण बदलून गेले. शिवाजींचा ठावठिकाणा लावण्यासाठी शिवा काशीदला मारहाण सुरू झाली, पण तो शत्रूस काहीच माहिती द्यायला तयार नव्हता. शेवटी शिवास एका खांबाला बांधण्यात आले. भालाईत सैनिकांचे कडे सभोवताली तयार केले गेले. जोहरने शिवास निर्वाणीचा इशारा देऊन पाहिला, पण शिवा काशीद शिवाजी महाराजांविषयी ब्र शब्दही काढण्यास तयार नव्हता. अखेर जोहरने हुकूम दिला. शिवा काशीदचा शेवट करण्याचा हुकूम दिला. त्यासरशी जोहरच्या सैनिकाने पुढे येऊन शिवाच्या छातीत भाला मारला. खांबाशी बांधलेला शिवा प्राणांतिक जखमी होऊन खाली बसला आणि जीव जाण्यापूर्वी उद्गारला, ‘मी शिवाजीराजांचे सोंग घेतले. पण हा सोंग घेतलेला शिवाजीराजासुद्धा मरताना शत्रूला पाठ दाखवणार नाही, मग खºया शिवाजीराजाची गोष्टच सोडा’. शिवा काशीद यांनी 13 जुलै 1660 रोजी स्वराज्यासाठी देह ठेवला.