आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवाच्या फेर्‍यात अफगाणिस्तान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतत संकटांच्या म्हणजे पर्यायाने दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकलेल्या व्यक्तींना शापित वगैरे म्हणण्याची प्रथा आहे. अशाच अर्थाने जगातील शापित देशांचा शोध घ्यायचा ठरविला तर त्यात अफगाणिस्तानचा अग्रक्रम लागेल. अफगाणिस्तानातील बादकशान प्रांतामध्ये एके ठिकाणी गेल्या गुरुवारी उत्तररात्री अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून त्याच्या ढिगार्‍याखाली दबून सुमारे 500 हून अधिक लोक मरण पावले व सुमारे दोन हजार लोक बेपत्ता आहेत. या दुर्घटनेमुळे काही जणांना उत्तराखंडमधील केदारनाथ येथे ढगफुटीने घडविलेल्या हाहाकाराची आठवण झाली. केदारनाथमध्ये दुर्घटना घडल्यानंतर मदतकार्य थोडे विलंबाने का होईना, प्रभावीपणे सुरू झाले. अफगाणिस्तानमध्ये कोसळलेल्या नैसर्गिक संकटात सापडलेल्यांची सुटका करण्यासाठी सुरू असलेल्या मदतकार्यात खूपच विस्कळीतपणा आहे. दरडी कोसळणे, भूकंप, महापूर यांचा फटका अफगाणिस्तानला नेहमीच बसत असतो. 1998 मध्ये अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपामध्ये सुमारे 6500 लोक ठार झाले होते. नैसर्गिक आपत्तींच्या तडाख्याच्या सावटामध्ये अफगाणिस्तानमधील एकूणपैकी निम्मी लोकसंख्या जगत असते. सोव्हिएत युनियनने केलेल्या आक्रमणानंतर अफगाणिस्तान सातत्याने कोणत्या ना कोणत्या युद्धामध्ये भरडून निघाला आहे. तालिबानी राजवट असो की अमेरिकेने तालिबानींवर केलेली कारवाई असो, त्यामध्ये पिळून निघाला अफगाणिस्तानमधील सामान्य माणूसच. त्यातच नैसर्गिक आपत्तींच्या थैमानामुळे या सामान्य नागरिकांचे जीणे आणखीनच दुष्कर होत आहे. अफगाणिस्तानातून येत्या डिसेंबर महिन्यात अमेरिका व दोस्त राष्ट्रे आपले तैनात सैन्य पूर्णपणे माघारी बोलावणार आहेत. अफगाणिस्तानात नुकतीच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली. ती बर्‍यापैकी शांततेत पार पडली. त्यात कोण जिंकतो, कोण हरतो यापेक्षा जो नवा राष्ट्राध्यक्ष होईल त्याने अफगाणिस्तानला संकटांच्या खाईतून बाहेर काढणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर राजकीय अस्थैर्य व नैसर्गिक आपत्तींच्या कात्रीत सापडलेल्या अफगाणिस्तानची अवस्था अधिकच बिकट होणार हे नक्की.