आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial Columns On Environment Friendly Development

पर्यावरण: समतोल विकासाचा आग्रह हवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या केंद्रीय सांख्यिकीय कार्यालयाद्वारे "कम्पोडियम ऑफ एन्व्हाॅयर्नमेंट स्टॅटिस्टिक्स इंडिया' हे पर्यावरण विषयाशी संबंधित सांख्यिकीय माहिती उपलब्ध करून देणाऱ्या नियमित प्रकाशनामध्ये जैवविविधता, वातावरण, भूमी/जमीन, पाणी, मानवी वसाहत अशा प्रमुख पाच क्षेत्रांशी संबंधित सविस्तर सांख्यिकीय माहिती प्रकाशित केली जाते. ११ फेब्रुवारी २०१४ रोजी "कम्पोडियम ऑफ एन्व्हाॅयर्नमेंट स्टॅटिस्टिक्स इंडिया-२०१३'चे प्रकाशन झाले. या अहवालामध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रमुख पाच क्षेत्रांशी संबंधित सविस्तर सांख्यिकीय माहिती दिली आहे.
या अहवालात विकासाची परंपरागत संकल्पना आणि पर्यावरणाचा ऱ्हास या संदर्भात विश्लेषण करताना रूढ संकल्पनेनुसार एका बाजूने विकास होत आहे असे दिसत असले, तरी या विकास प्रक्रियेद्वारे पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निदर्शनास येते. परंपरागत विकास संकल्पनेत देशाच्या राष्ट्रीय उत्पादनातील वृद्धीच्या साहाय्याने विकासाचे मापन केले जाते. विशिष्ट कालावधीत देशातील वस्तू व सेवांच्या उत्पादनात वाढ झाली म्हणजे विकास झाला असे गृहीत धरले जाते. परंतु आर्थिक कामगिरी आणि मानवी कल्याण निर्मितीला पर्यावरणसंबंधित क्रिया प्रभावित करतात हे ध्यानात घेणे गरजेचे आहे. उदा. उत्पादन आणि उपभोगासाठी नैसर्गिक साधने उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, पर्यावरणाद्वारे टाकाऊ पदार्थांचे शोषण किंवा विलय, मानव समाजाच्या जीवन निर्वहनासाठी आवश्यक पर्यावरणीय सेवा आणि सुविधांची उपलब्धी या सर्व बाबी परंपरागत विकास संकल्पनेत गृहीत धरल्या जात नाहीत. अलीकडे या घटकांचा विकास प्रक्रियेत काही अंशी समावेश होताना दिसून येतो. नैसर्गिक साधनांच्या दुर्मिळतेचा अर्थव्यवस्थेच्या शाश्वत उत्पादकता आणि उत्पादन व उपभोग प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दिसत आहे. अर्थव्यवस्थेतील उत्पादन व उपभोगाच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ, दूषित पाणी व अन्य प्रदूषकांची विल्हेवाट नद्यांची पात्रे, समुद्र किंवा त्यालगतची मोकळी जागा अशा नैसर्गिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पर्यावरणीय गुणवत्तेचा वेगाने ऱ्हास होत आहे.
एका बाजूने विकास प्रक्रियेच्या माध्यमातून लोकांचे उत्पन्न वाढल्याने व्यक्ती व समाजाच्या लाभात भर पडत असली तरी दुसऱ्या बाजूने विकास प्रक्रियेमुळे पर्यावरणाची होत असलेली हानी, यात समतोल साधणारे विकासाचे प्रतिमान विकसित करणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाचा व्यक्तीचे आरोग्य, सरासरी आयुर्मान, जीवन गुणवत्ता यावर प्रत्यक्ष परिणाम होतो. विशेष म्हणजे उत्पादन क्रियेच्या प्रतिकूल परिणामामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल तर त्याने भविष्यातील उत्पादकता आणि मिळणारे यश कमी होत जाते. याचा अर्थ नैसर्गिक साधनांच्या वापरातून होत असलेला वैयक्तिक आणि सामाजिक व्यय आणि पर्यावरणाचा ऱ्हास या बाबी परंपरागत विकासाच्या मोजदादीबरोबर विचारात घेणे हे शाश्वत विकास संकल्पनेला अर्थपूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे. सोबतचा तक्ता पाहिल्यास विकास प्रक्रियेचे पर्यावरणावर होत असलेले गंभीर परिणाम लक्षात येतात.
आर्थिक विकास साध्य करण्यासाठी जे उपक्रम/योजना हाती घेतल्या जातात, त्यापैकी काही उपक्रम/योजनांच्या अंमलबजावणीमुळे नैसर्गिक साधनांचे शोषण, जलप्रदूषण, हवा प्रदूषण, तापमान बदल, संसर्गजन्य आजार, मानवी जीवनाच्या गुणवत्तेचा होत असलेला ऱ्हास असे अनिष्ट परिणाम दिसून येतात, हे सोबतच्या तक्त्यावरून दिसून येते. शिवाय या विकास प्रक्रियेने भावी पिढ्यांच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक नैसर्गिक साधनांचा अभाव निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. अशा परिस्थितीत या परंपरागत विकास प्रक्रियेतून होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास व दुष्परिणाम टाळण्यासाठी पर्यावरणाशी मैत्रीपूर्ण विकासाचे प्रतिमान विकसित करून या प्रतिमानाची आग्रहपूर्वक अंमलबजावणी करणे याला दुसरा पर्याय ठरू शकत नाही. या प्रतिमानाची कास धरल्यासच शाश्वत विकासातून निसर्ग, प्राणी, भौतिक संसाधने व मानवी जीवनाचे योग्य प्रकारे संवर्धन व विकास साध्य होईल, परंतु हे करणे सहज साध्य होणारी बाब नाही. यासाठी आपल्याला आपल्या गरजांवर मर्यादा घालणे, जीवनाकडे पाहण्याच्या भोगवादी दृष्टिकोनाचा त्याग करणे, आपल्या जीवनशैलीत शाश्वत विकासास अनुकूल बदल घडवणे गरजेचे आहे. तसेच शासकीय पातळीवरून यासाठी आवश्यक धोरण, नियोजन यावर आधारित कृती आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्याची आणि यामध्ये प्रबोधनाद्वारे जनतेचा सक्रिय सहभाग घेण्याची गरज आहे, अन्यथा आपल्या पिढीच्या निष्काळजीपणाची व विवेकशून्य कृतीची किंमत भावी पिढ्यांना मोजावी लागेल.
विकास प्रक्रियेचे पर्यावरणावरील परिणाम
क्र. विकास प्रक्रिया पर्यावरणावरील प्रमुख परिणाम
१ कृषी उद्योग साखर कारखान्यांमध्ये इंधन म्हणून चिपाडे जाळल्याने हवेतील प्रदूषण वाढत आहे. प्रदूषणास कारणीभूत सेंद्रीय टाकाऊ
पदार्थांच्या प्रमाणात वाढ झाल्याने पृष्ठभागावरील पाण्याचे होणारे प्रदूषण ही गंभीर बाब बनली आहे.
२ कीटकनाशकांचा वापर कृषी क्षेत्रात वापरात येणारी कीटकनाशके अन्नधान्य व पाण्यातून प्रवाहित हाेऊन मनुष्य व प्राण्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहे.
३ नागरीकरण आणि शहर केंद्रित लोकसंख्येकडून औद्योगिकीकरण वस्तू उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रावरील या ताणाचा परिणाम भूमी, हवा आणि प्रदूषण वाढण्यात होतो.
४ जलसंसाधन प्रकल्प लोकसंख्येचे पुनर्वसन, पाणी प्रदूषणामुळे
(धरणे, सिंचन प्रकल्प) निर्माण होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव, मत्स्योद्योगाचा ऱ्हास, गाळ संचय, प्राकृतिक बदल. उदा ः तापमान, आर्द्रता, दमट हवामान