आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारे आणि नगारे! ( अग्रलेख )

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भांडवलदारी व्यवस्थेचे सारे गुण-अवगुण कोळून प्यायलेली अमेरिका हे तद्दन व्यापारी राष्ट्र आहे. आपला आर्थिक, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अमेरिकेने गेल्या शंभर वर्षांत जागतिक स्तरावर अनेक देशांत जितक्या उलथापालथी घडवून आणल्या असतील तेवढे श्रम शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियननेही घेतले नव्हते. शीतयुद्ध समाप्तीनंतर अमेरिका हा एकमेव बलाढ्य देश उरला असला तरी संभाव्य महाशक्ती म्हणून भारत व चीन हे देश पुढे येत आहेत. या दोन देशांच्या प्रचंड बाजारपेठा भांडवलशाहीच्या कट्टर पुरस्कर्त्या अमेरिकेला खुणावत आहेत. अमेरिका हा दुस-या बाजूने प्रचंड कर्जबाजारी झालेला देश आहे. त्यामुळे आपले जागतिक प्राबल्य व आर्थिक संतुलन कायम राखण्यासाठी अमेरिका जगाच्या प्रत्येक खंडात अनेक उलथापालथी घडवीत असते. अमेरिकेत रिपब्लिकन वा डेमोक्रॅटिक यापैकी कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष असो त्याला ही सारी कर्मे पार पाडावी लागतात. त्यातून बराक ओबामा यांचा अपवाद करण्याचे कारण नाही! प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून बराक ओबामा यांचे येत्या २६ जानेवारी रोजी भारतात आगमन होत आहे. ओबामांच्या दौ-याच्या कालावधीत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतात हिंसक कारवाया केल्या तर पाकिस्तानला धडा शिकवू, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, ओबामांच्या भारतभेटीला व त्यानिमित्त अमेरिकेच्या होत असलेल्या वर्तणुकीला अनेक पदर आहेत. भारतात १९९१ पासून आर्थिक उदारीकरणाचे युग सुरू झाले. येथील प्रचंड विस्तारित बाजारपेठ पाहता भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात अमेरिकी भांडवलदारांना विलक्षण रस आहे. या विदेशी गुंतवणुकीच्या मार्गाचे महामार्गात कसे रूपांतर करता येईल यावर ओबामा मोदी सरकारशी सखोल चर्चा करण्याची शक्यता आहे. भारत व अमेरिकेत गेल्या पंधरा वर्षांत जवळीक निर्माण होऊन व्यापारी देवाणघेवाणीबरोबरच संरक्षण सामग्रीविषयक क्षेत्रात या दोन्ही देशांच्या सहकार्यात वाढ झाली. भारत व अमेरिकेदरम्यान झालेला अणुऊर्जा करार हे त्याचेच द्योतक आहे. हे सारे सौहार्दाचे चित्र दिसत असले तरी अमेरिकेचे अंतस्थ हेतू वेगळे आहेत. शेजारी राष्ट्रे तसेच चीनशी भारताचे विविध मुद्द्यांवर मतभेद आहेत. पाकिस्तान ही तर भारताची कायमची डोकेदुखी आहे. अमेरिकेने ज्याप्रमाणे इराक, अफगाणिस्तानवर लष्करी कारवाई केली तशीच पावले जागतिक दहशतवादाचे केंद्र बनलेल्या पाकविरुद्ध कधी केल्याचे आढळले नाही. अमेरिकेवर अल कायदाच्या दहशतवाद्यांनी हल्ले चढवल्यानंतर त्या संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी काही वर्षांनी अमेरिकी लष्कराने पाकच्या हद्दीत घुसखोरी करून त्याला ठार केले; पण तेवढा कार्यभाग आटोपल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा चुचकारणे सुरूच ठेवले. पाकिस्तानला आपला हस्तक बनवून आशियाई देशांवर प्रभुत्व राखण्याचा डाव अमेरिका अजूनही खेळत असते. मात्र, चीनने आता या खंडात अमेरिकेला तीव्र स्पर्धा निर्माण केल्याने अमेरिकेला भारत जवळचा वाटू लागला. २००८ मध्ये मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला होता त्यानंतर अमेरिकेकडून भारताला संरक्षण व तंत्रज्ञानासंदर्भात मिळणा-या मदतीत वाढ झाली होती. नुकतेच सागरी मार्गाने भारतात घुसखोरी करू पाहणा-या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हालचालींची माहितीही अमेरिकेनेच भारताला पुरवली होती. १९९९ मध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध छेडलेले कारगिलचे युद्ध ताबडतोब थांबवा, अशी तंबीही तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना बोलावून दिली होती. मात्र, अजून गतकाळात गेले तर बांगलादेश युद्धाच्या वेळेस मात्र अमेरिकेने भारताविरोधात पक्षपाती भूमिका घेतली होती. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी नुकत्याच पाकिस्तानच्या केलेल्या दौ-यानंतर जमात उद दवासह बारा दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची घोषणा पाकिस्तानने केली, मात्र दुस-या बाजूला मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेला हाफीज सईद हा पाकिस्तानात मोकाट फिरतो आहे. दहशतवाद्यांवर कारवाई केल्याच्या घोषणा करून अमेरिकेकडून जास्तीत जास्त मदत उकळण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असतो. अफगाणिस्तान असो वा आखाती देशांमध्ये अमेरिकेच्या सीआयएने पाकिस्तानला हाताशी धरून त्या देशांत दहशतवाद्यांचे मोठे जाळे उभारले. या उपकारांची परतफेड म्हणून अमेरिका पाकिस्तानला वेळोवेळी मदत करीत असते. मात्र, बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे अमेरिकेला भारताशी घनिष्ठ संबंध ठेवावे लागत असून हे पाकिस्तानसाठी पोटदुखीचे कारण आहे. याचा परिणाम असा झाला की, पाकिस्तान व चीनमधील आर्थिक व संरक्षणविषयक सहकार्य वाढीला लागले. हे सारे पाहता ओबामांच्या भारत दौ-यानिमित्ताने अमेरिका वाजवत असलेले नगारे व पाकिस्तानला देत असलेले इशारे हे त्या देशाच्या स्वार्थी वृत्तीतून आलेले आहेत हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे!