आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनदांडग्यांची युती ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळपास सर्व राजकीय पक्षांची, क्रिकेटपटूंची आणि सिने कलावंतांची मैत्री असलेल्या सहारा ग्रुपचे सर्वेसर्वा सुब्रतो राय सध्या कोठडीत आहेत. अशा अब्जाधीशास कोठडीत राहावे लागणे, हे खरोखरच चांगले नाही. त्यांनी भारतीय कायदा आणि सुव्यवस्थेला गंडा घालून जी माया जमवली आहे, ती काही कोठडीची हवा खाण्यासाठी नव्हे. मात्र, राय यांच्यासारख्या धनदांडग्यांना सध्या आपण काय करतो आहोत, याचे भान असूनही ते इतके मुजोर झाले आहेत की, आपल्यावर काहीही वेळ आली तरी पैसा, संपत्तीच्या जोरावर ती निभावून नेऊ, असे त्यांना वाटू लागले आहे. राय यांना न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणात कोठडीत जावे लागणे यासाठी महत्त्वाचे आहे की, न्यायव्यवस्थेसमोर संपत्तीचा माज चालणार नाही, हे या घटनेने भारतीय जनतेसमोर आले.

राय यांना कोठडीत जावे लागल्याने त्यांचे राजकीय मित्र, क्रिकेटपटू आणि सिनेकलावंत यांना वाईट वाटणे अगदीच साहजिक आहे. कारण राय यांनी संपत्ती निर्माणाचे जे मायाजाल तयार केले आहे, त्यात ही सर्वच मंडळी सक्रिय सहभागी आहेत. या सर्वांचे हितसंबंध इतके घट्ट आहेत की, त्यांनी राय यांच्यासाठी अश्रू ढाळले नसते तरच नवल! म्हणूनच त्यांना सहानुभूती दाखवण्यासाठी रविवारी मुंबईत सिने कलावंतांना एकत्र आणण्याचा निर्लज्ज प्रयत्न झाला. अर्थातच तो फसला. कारण ज्या माणसाने न्यायालयाचा अवमान केला आहे, त्याची बाजू तर काय म्हणून घ्यायची, असा पेच त्यांच्यासमोर उभा राहिलेला दिसतो. किमान तेवढी लाज त्यांनी शिल्लक ठेवली, असे म्हणूयात.

माजी क्रिकेटपटू कपिलदेव यांनी राय यांच्याविषयी काही चांगले शब्द खर्च केले आहेत. त्यांनी देशासाठी म्हणजे क्रिकेटसाठी मोठे काम केले, असे त्यांचे म्हणणे आहे. ते त्यांनी केलेही असेल; पण ते करण्यासाठी त्यांनी पैसे छापण्याची जी टाकसाळ काढली, ती काही नैतिक पायावर उभी नाही, एवढे कपिलदेव यांनी समजून घेतले असते तर त्यांनी अशी चूक केली नसती. तिकडे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार आहे. त्या सरकारने तर समाजवादी हा चांगला शब्द कायमचा भ्रष्ट करून टाकला आहे. समाजवादात सर्वांचे आणि विशेषत: दुर्बल घटकांचे हित पाहिले जाते, यावर आता पुढील पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत. राय हे त्यांचेही मित्र. त्यामुळे त्यांना कोठडीत ठेवताना त्यांनाही फार त्रास झाला. मग त्यातल्या त्यात त्यांना कोठडीत काही त्रास होऊ नये, म्हणून एका विश्रामगृहालाच कोठडी असे नाव देण्यात आले, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. कायद्यापुढे सर्व भारतीय समान आहेत, या तत्त्वाचा अंमल करताना धनदांडग्यांना किती त्रास होतो पाहा! रस्त्यावरील लोकांचा जीव घेतल्यामुळे दाखल झालेला, वन्यप्राण्याची हत्या केल्याबद्दलचा, दहशतवाद्यांना अप्रत्यक्ष मदत केल्याचा खटला असो; हे राजकीय नेते, अतिश्रीमंत आणि सिने कलावंतांवरील खटले कसे चालतात आणि शिक्षा होऊनही त्यांना कशा सवलती मिळतात, हे सारा देश उघड्या डोळ्याने पाहतो आहे. एवढेच नव्हे, तर त्यांना कशी प्रतिष्ठा बहाल करण्याचे प्रयत्न केले जातात, हेही आता लपून राहिलेले नाही. असे काही खटले दाखल झाले असते तर सर्वसामान्य माणूस आयुष्यात कोलमडून गेला असता; पण अशी धनदांडगी मंडळी इतकी शेफारून गेली आहे की, त्यांच्या अंगावरील चरबी कमी होण्याचे नाव घेत नाही.

आपली आई आजारी आहे आणि तिच्याजवळ राहण्यासाठी आपल्याला सूट देण्यात यावी, अशी विनंती राय यांनी केली होती. मात्र, राय यांनी सेबी आणि न्यायालयाला अनेकदा हुलकावणी दिल्याने न्यायालयाने ती धुडकावून लावली. खरे तर त्यांची आई आजारी आहे तर त्यांना तिच्याजवळ राहण्याची सवलत मिळाली पाहिजे, यात वावगे काहीच नाही; मात्र हे असे अनेकांचे माणूसपण आपणच संपत्तीच्या जोरावर नाकारले आहे, याची आठवण राय यांना राहिलेली नाही. भारतीय अर्थव्यवस्था, राजकारण आणि प्रशासन यामध्ये अनेक त्रुटी आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. या त्रुटींचा घेता येईल तेवढा गैरफायदा देशातील मोजक्या धनदांडग्यांनी घेतला आहे. सेबीने राय यांच्या उद्योगांवर केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असून त्यावर न्यायालयांनीही शिक्कामोर्तब केले आहे. असे असताना तो खटला सुरळीत चालणे तर दूरच; पण न्यायालयात हजर राहण्याची कर्तव्यबुद्धी ज्यांच्याकडे नाही, त्यांना सहानुभूती दाखवण्याचे काहीच कारण नाही. मात्र, ज्यांच्या पैशांवर आपण राजकारण करत आहोत, ज्यांच्या संपत्तीवर आपल्या खेळाचा झगमगाट उभा आहे आणि ज्यांच्या व्यासपीठांवर आपण नाचतो, याची जाणीव असूनही नेते, क्रिकेटर आणि सिने कलावंत यांना स्वार्थाने आंधळे करून सोडले आहे. भारतातही आता एक नवा वर्ग उदयाला येतो आहे आणि तो सर्व आर्थिक व्यवहारांत पारदर्शकतेचा आग्रह धरतो आहे. त्या वर्गाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा मिंधेपणात धन्यता मानणा-या धनदांडग्यांची युती आता जागरूक समाजाच्या लक्षात यायला लागली आहे.