आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगफुटीचे ढग! (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वातावरणात ढगफुटी झाली की पूर येतात, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानीही होते. ढगफुटी ही नैसर्गिक आपत्ती असली तरी जागतिक क्षितिजावर जे क्रिमियासारखे फुटीचे ढग जमा झाले आहेत, ते पूर्णतया मानवनिर्मित संकट आहे. त्यातून निर्माण होणा-या संघर्षातून जग दुस-या शीतयुद्धाच्या खाईत लोटले जाणार की तिसरे महायुद्ध उंबरठ्यावर येऊन ठेपणार, असे जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ते सहजी दुर्लक्षित करण्यासारखे नक्कीच नाहीत. गेल्या रविवारी पार पडलेल्या सार्वमतादरम्यान क्रिमियातील 97 टक्के जनतेने रशियात सामील होण्याच्या बाजूने कौल दिला. दांडगाई हेच ज्यांच्या राजकारणाचे सूत्र आहे, ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी क्रिमियाच्या सत्ताधीशांशी लगेचच करार करून हा प्रांत रशियात सामील करून घेतला.

क्रिमियामधील सार्वमत हे त्या प्रांतात पुतीन यांनी धाडलेल्या रशियन लष्कराच्या दबावाखाली घेण्यात आले, असा आक्षेप अमेरिका व युरोपीय देशांनी घेतला. युक्रेन व क्रिमियामध्ये असलेल्या तेलसाठ्यांवर डोळा ठेवून पाश्चिमात्य देश क्रिमियाबद्दल कळवळा व्यक्त करीत आहेत, हे जसे लपून राहिलेले नाही; तसेच या तेलसाठ्यांवर आपला कब्जा राहावा, म्हणून रशियाची सारी धडपड सुरू आहे, हेही सर्वांना दिसते आहे. पूर्वी युक्रेनमध्ये राहून क्रिमियामधील सत्ताधारी कधी अमेरिका, युरोपच्या, तर कधी रशियाच्या पदरात दान टाकत होते. सोव्हिएत संघराज्याचा अस्त झाल्यानंतर स्वतंत्र झालेल्या देशांची आजची आर्थिक परिस्थिती पाहिली तर ती फारशी सुदृढ नाही. 2008 मध्ये अमेरिकेत आलेल्या या मंदीने युरोपीय समुदायाप्रमाणेच या देशांचीही अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. युक्रेनही याच अवस्थेतून गेली काही वर्षे चाललेला आहे. क्रिमियामध्ये 58 टक्के लोक रशियन आहेत. त्यांना रशियात सामील झाल्याने आपला विकास उत्तमरीत्या होऊ शकेल, असे वाटल्यामुळेच क्रिमियातील बहुतांश जनता रशियाकडे वळली आहे की काय, हे तपासणेही गरजेचे आहे. 1980 च्या दशकात रशियाची अर्थव्यवस्थाही कुंठित झालेली होती. सोव्हिएत रशियातील विविध प्रांतांतही अपु-या विकासामुळे असंतोष धगधगत होता.

वांशिक, धार्मिक प्रश्न उग्र स्वरूपाचे बनले होते. सोव्हिएत रशियाचे अस्तित्व कायम राखून या संघराज्याचा उत्तम विकास व्हावा, म्हणून मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ग्लासनोत व पेरिस्त्रोईका ही दोन धोरणे जाहीर केली. मात्र त्यांचा फारसा उपयोग न होता सोव्हिएत संघराज्याचा डोलारा 25 डिसेंबर 1991 रोजी कोसळलाच. इतिहासाच्या या दाखल्याची युक्रेनबाबतही पुनरावृत्ती झाली व क्रिमिया रशियामध्ये सामील झाल्याबद्दल मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी आनंद व्यक्त केला आहे. पण त्याचबरोबर पुतीन यांच्या दांडगाईच्या राजकारणाबद्दल नाराजी व्यक्त करून गोर्बाचेव्ह यांनी आपण अजूनही उदारमतवादी आहोत, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. क्रिमिया रशियामध्ये सामील झाल्यानंतर पुतीन यांच्यावरील अमेरिका व युरोपीय देशांचा रोष दसपटीने वाढला आहे. जी-8 देशांच्या समूहातून रशियाला निलंबित करण्याचा निर्णय ही त्याचीच परिणती आहे. नेदरलँड्समध्ये पुढील आठवड्यात भरणा-या अणुपरिषदेच्या पार्श्वभूमीवर तेथे या सात देशांची एक स्वतंत्र बैठक होणार असून त्यात रशियावर आणखी कोणते कडक निर्बंध लादता येतील, याचा विचार केला जाईल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे क्रिमियाबद्दल रशियाने उचललेल्या पावलांनी कमालीचे चिंताग्रस्त झाले आहेत. क्रिमियाचा घास घेणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन युक्रेनच्या संघराज्याचे आणखी लचके तोडण्यासाठी भविष्यात कोणती पावले उचलणार, याचा घोर आता अमेरिकेला लागला आहे. क्रिमिया रशियामध्ये सामील करण्यासाठी झटलेल्या रशियाच्या अधिका-यांची विदेशातील मालमत्ता युरोपीय समुदायाने गोठवली. जपानने व्हिसा व इतर प्रश्नांवर रशियाशी वाटाघाटी थांबवल्या, तर दुस-या बाजूला शस्त्रखरेदी-विक्रीसंदर्भात रशियाबरोबर केलेल्या कराराला ब्रिटनने स्थगिती दिली आहे. अमेरिका व युरोपीय देशांनी पहिल्या टप्प्यातील आर्थिक निर्बंध लादूनही रशियाने या देशांना जुमानले नव्हते. अमेरिका व युरोपीय देशांच्या हालचालींमुळे रशियाच्या सुरक्षेलाच धोका निर्माण झाल्याने त्याला चोख उत्तर म्हणून आम्ही क्रिमिया प्रांत रशियात सनदशीर मार्गाने सामील करून घेतला, असा टोला पुतीन यांनी लगावला. पाश्चिमात्य देशांनी कितीही कडक आर्थिक निर्बंध लादले तरी आम्ही कोणालाही जुमानणार नाही, अशी गर्जना पुतीन यांनी केल्याने त्यातून दुस-या शीतयुद्धाला प्रारंभ होणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. क्रिमियाच्या सामीलीकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची कल्पना देण्यासाठी व सहकार्याच्या अपेक्षेने पुतीन यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना दूरध्वनी करून सविस्तर चर्चा केली. पुतीन यांनी चीनशीही याच कारणासाठी संपर्क साधला. क्रिमियाच्या प्रश्नावर राजनैतिक पातळीवर चर्चा करून योग्य तोडगा काढावा, असे रशियाला सांगण्याशिवाय भारत सध्याच्या परिस्थितीत फारसे काहीही करू शकणार नाही. कारण क्रिमियामधील सार्वमताचा कौल योग्य आहे, अशी भूमिका भारताने घेतल्यास पाश्चिमात्य देशांच्या दृष्टीने भारताचा वादग्रस्त भाग असलेल्या काश्मीरमध्ये सार्वमत का घेण्यात येत नाही, असा सवाल कोणीही करण्याची शक्यता आहे.

चीनने तिबेट, सिकियांगसारखे प्रांत बळजोरीने आपल्या देशाला जोडून घेतल्याने तेथील नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. चीनमधील कुनमिंग रेल्वेस्थानकात 1 मार्च रोजी जो दहशतवादी हल्ला झाला, त्यामागे सिंकियांगमधील असंतुष्ट वीघर जमातीचा हात होता, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे स्वत:च फाटाफुटीच्या ज्वालामुखीच्या तोंडावर उभा असलेला चीनही मोठ्या तोंडाने रशियाला सल्ले देणार नाही. युक्रेनचा तुकडा पाडणा-या रशियाबद्दल आक्रंदन करणा-या युरोपचेही घर जळते आहे. व्हेनिस व त्याच्या नजीकचा काही परिसर यांचा समावेश असलेला व्हेनेटो प्रांत इटलीपासून वेगळा काढून ‘न्यू रिपब्लिक ऑफ व्हेनेटो’ हा स्वतंत्र देश स्थापन करण्यासाठी तेथील नागरिकांनी चळवळ चालवली असून त्यासाठी तेथे 21 मार्चपासून सार्वमताची प्रक्रिया सुरू होत आहे. आफ्रिकेत सुदानपासून फुटून स्थापन झालेल्या दक्षिण सुदान या नव्या देशामधील हिंसाचार अधिक उग्र झाला आहे. जागतिक क्षितिजावर क्रिमिया प्रश्नासह जमा झालेले जगफुटीचे ढग पाहिले की भविष्यात खूप मोठी संकटे वाढून ठेवली आहेत, हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही!