आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धीच्या ऊर्मीची गुढी( अग्रलेख )

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्र शुद्ध प्रतिपदेला साज-या होणा-या गुढीपाडव्याचा गोडवा आपल्या संस्कृतीत अवीट असाच आहे. प्राचीन आणि समृद्ध परंपरेने नटलेल्या भारतात उत्सवप्रियता ओतप्रोत भरलेली असल्याने कुठलाही सण म्हटले की सर्वत्र उत्साहाला उधाण आलेले असते. गुढीपाडव्यासारखा वर्षारंभाचा सण तर मांगल्याचे लेणेच घेऊन येत असतो. शिवाय हा सण साजरा करण्यामागे अनेक कारणे असल्याने त्याची गंमत अजूनच न्यारी आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतात या दिवसापासून नूतन वर्षाची सुरुवात होते म्हणूनच त्याला ‘शालिवाहन शकारंभ’ असेही म्हणतात.

मराठी विश्वकोशात नमूद केल्यानुसार शालिवाहन हा सातवाहनाचा अपभ्रंश असावा. सातवाहनांपैकी कुणी व कोणत्या प्रसंगी हा शक सुरू केला ते निश्चित सांगता येत नाही, मात्र परकीय असलेल्या शकांवर सातवाहनांनी मिळवलेल्या एखाद्या महत्त्वाच्या विजयदिनापासून या शकाची सुरुवात झाली असावी, असा एक मतप्रवाह आहे. त्याचप्रमाणे आपला चौदा वर्षांचा वनवास संपवून लंकाविजयानंतर प्रभू श्रीरामचंद्रांनी याच दिवशी अयोध्येत प्रवेश केल्याने या दिवसाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी सर्वत्र गुढ्या-तोरणे उभारली जातात. वसंत ऋतूचा आरंभदेखील याच दिवशी होत असल्याने प्राकृतिकदृष्ट्याही हा दिवस लक्षवेधी ठरतो. पाडव्याला भल्या सकाळी मंगलस्नान करून कडुलिंबाची पाने, मिरे, हिंग, लवंग, जिरे, ओवा यांचे मिश्रण सेवन करण्याची आरोग्यकारक प्रथादेखील आपल्या पूर्वजांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन अधोरेखित करून जाते. याच दिवशी ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केल्याची एक कथा पुराणात आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मपूजेला महत्त्व दिले जाते. अशा अनेकविध कारणांमुळे हिंदू संस्कृतीमध्ये हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असल्याचे समजले जाते. साहजिकच कोणत्याही नव्या कार्यारंभासाठी गुढीपाडव्याचा दिवस उत्तम मानला जातो. किंबहुना या दिवशी नव्या पर्वाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले जात असते.


यंदा तर पाडवा ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत साजरा होत असल्याने लोकशाहीच्या या नव्या पर्वाची जणू मुहूर्तमेढच त्यानिमित्ताने रोवली जाणार आहे. पूर्वी आपल्याकडे सत्तेची सारी सूत्रे राजेलोकांच्या हाती एकवटलेली असत. त्यामुळे सामान्यजनांना त्यांच्या मर्जीवर डोलावे लागत असे. आता मात्र तशी स्थिती नाही. सत्तेची सूत्रे ब-याच अंशी लोकांच्या हाती आली आहेत. व्यवस्थेचा एक भाग म्हणून निवडून गेलेले सत्ताधीश सत्ता राबवत असले तरी अप्रत्यक्षपणे का होईना, अंकुश लोकांच्या हाती आहे. सध्याचे राजकारण भलेही गढुळलेले असो, असा अंकुश लावून त्याच्या स्वच्छतेची मोहीम खरे तर आजच्या दिवसापासूनच आपापल्या परीने हाती घ्यायला हवी. त्यासाठी अन्य कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता अथवा जातपात, धर्म, पैसा अशा मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन सारासार विवेकबुद्धीने आणि डोळसपणे मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडायलाच हवे. त्यातूनच राजकारणाचा सध्याचा बाज बदलण्याचे नवे पर्व सुरू होईल आणि मंदीचे मळभ दाटलेल्या अर्थकारणावरसुद्धा त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागतील. कारण राजकारण व अर्थकारण हे नेहमीच हातात हात घालून चालत असतात. या वेळी त्याची अधिक तीव्रतेने जाणीव होण्याचे कारण म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस अर्थात 31 मार्च रोजीच आलेल्या पाडव्याचा योगायोग. दोन वर्षांपासून आपल्या अर्थकारणावर मंदीचे सावट असल्याने जवळपास प्रत्येक क्षेत्रातील उलाढाल मंदावत आहे. गेल्या वर्षभरात ‘न भूतो’ एवढी रुपयाची घसरण झाल्याचे पाहावयास मिळाले. उद्योग, व्यवसाय, नोक-यांच्या संधी या सगळ्यालाच मंदीची झळ बसत आहे. शेतीचे तर विचारायलाच नको. गेल्या वेळच्या भीषण दुष्काळातून जरा कुठे सावरत नाही तोवर यंदा बेमोसमी पाऊस आणि तुफान गारपिटीने उभे पीक आडवे झाल्याचे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ शेतक-यावर आली. अशा पार्श्वभूमीवर यंदाचा पाडवा येत असल्याने त्याकडून खूप सा-या आशा आणि अपेक्षाही आहेत.

आर्थिक वर्ष संपता संपता रुपयाची तुलनेने सावरलेली पत आणि शेअर बाजाराने घेतलेली उसळी यामुळे सकारात्मकतेची झलक पाहायला मिळाली आहे. गृहनिर्माण क्षेत्रातसुद्धा आशादायक स्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईसह राज्यातील इतर मोठ्या शहरांमध्ये बांधून तयार असलेल्या घरांना म्हणावी तशी मागणी नसल्याने या क्षेत्रातले व्यवहार ब-याच प्रमाणात थंडावले होते. ते आता हळूहळू का होईना, पण गती घेऊ लागले आहेत. या सुचिन्हांमुळे आजच्या मंगल दिनापासून ही स्थिती येत्या काळात उत्तरोत्तर सुधारत जाईल, अशी आशा बाळगायला नक्कीच वाव आहे. परिणामी गुढीपाडव्याच्या दिवशी खास मराठमोळ्या पद्धतीने काढण्यात येणा-या नववर्ष स्वागत यात्रा वगैरे उपक्रमांत इच्छुकांनी नि:शंक मनाने सहभागी होण्यास हरकत नाही. कारण मनावरचे नैराश्याचे ढग दूर लोटण्यास असे उपक्रम निश्चितच हातभार लावत असतात. त्याद्वारे संचारणा-या उत्साहातून सर्जनशीलतेची, निर्मितीची नवचेतना जागृत होत जाते आणि त्यातूनच समृद्धीची शिखरेही खुणावू लागतात. ही शिखरे पादाक्रांत करण्याची ऊर्मी तमाम भारतवासीयांच्या अंगी भरून राहो आणि आपल्या कार्यकर्तृत्वाची गुढी जगभरात उभारली जावो, हीच आजच्या पाडव्यानिमित्त मनोकामना!