आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानचा खोडसाळपणा ( अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय राष्‍ट्रीय कॉँग्रेसने नरेंद्र मोदींच्या मुद्यावर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना फटकारून आंतरराष्‍ट्रीय पातळीवर आपली राजकीय प्रगल्भता दाखवून देण्याची नामी संधी साधली आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी ‘मोदी भारताचे पंतप्रधान झाले तर प्रादेशिक शांतता धोक्यात येईल’ असे विधान करून खोडसाळपणा केला होता. त्यावर ‘कोणाला पंतप्रधान म्हणून निवडून द्यायचे हा भारतीयांचा अधिकार आहे आणि त्यासंदर्भात पाकिस्तानच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही’ अशी प्रतिक्रिया कॉँग्रेस पक्षातर्फे देण्यात आली आहे. आम्ही राजकीय विरोधक म्हणून एकमेकांशी भांडत असलो तरी भारतीय म्हणून एक आहोत, हाच संदेश यातून आंतरराष्‍ट्रीय पातळीवर गेला आहे. समस्त भारतीयांसाठी राजकीय प्रगल्भतेचा तो एक सुखद धक्काच म्हटला पाहिजे. अशीच राजकीय प्रगल्भता नरेंद्र मोदी यांनीही सप्टेंबर 2013मध्ये जगाला दाखवली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतीय पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा उल्लेख ‘खेडूत बाई’ असा केला होता. त्या वेळी मोदी यांनी शरीफ यांच्यावर जोरदार टीका करीत ‘भारतीय पंतप्रधानांचा अपमान खपवून घेणार नाही’ असा इशारा त्यांना जाहीरपणे दिला होता. त्यामुळे मोदींच्या त्या वेळच्या भूमिकेची परतफेड कॉँग्रेसने आता केली, असंही कोणी म्हणतील.
अर्थात, कॉँग्रेसचं हे विधान केवळ मोदींच्या विधानाची परतफेड करण्यासाठी नक्कीच नसणार. अशी परतफेड करण्याची कॉँग्रेसला गरज भासण्याचे काही कारणही नाही; अन्यथा लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात मोदींविरोधात कठोर टीकेची झोड उठवण्यात कॉँग्रेस पक्ष इतका अग्रेसर मुळीच राहिला नसता. भाजप आणि कॉँग्रेस या दोन्ही पक्षांनी या निवडणुकीत ज्या टोकाला जाऊन एकमेकांचे वस्त्रहरण केले आहे, त्याला तोड नाही. असे असूनही देशाच्या अस्मितेचा विषय येताच दोघांनीही वेगवेगळ्या वेळी दाखवलेली देशभक्ती आणि अस्मितेची जाणीव देशवासीयांना दिलासा देणारी आहे. भारतीय लोकशाहीच्या प्रगल्भतेचेही ते एक प्रमुख लक्षण मानायला हवे. ही प्रगल्भता देशवासीयांसमोर नव्हे, तर जगासमोर येण्यासाठी निमित्त झाल्याबद्दल पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांना खरे तर भारतीयांनी धन्यवादच दिले पाहिजेत. तथापि, खान यांचे हे विधान नुसतेच वादग्रस्त नसून, वाद अंगावर ओढवून घेणारेही आहे. नरेंद्र मोदी जे बोललेच नाही, अशी विधाने त्यांनी त्यांच्या तोंडी टाकली आहेत.
वास्तविक, मोदींनी केवळ भारताचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या दाऊदला ओढून आणण्याच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. दाऊदला भारतात आणण्याची केवळ भाषा करण्यापेक्षा तशी कृती प्रत्यक्षात करा, असे मोदी म्हणाले होते. त्यात कुठेही पाकिस्तानचा उल्लेख नव्हता. तरीही पाकिस्तानी गृहमंत्र्यांना ती युद्धाची धमकी वाटली आणि अशा धमक्यांना पाकिस्तान घाबरणार नाही, असे विधान त्यांनी केले. आपल्याच देशात आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी किंवा देशवासीयांचे लक्ष आपल्या अपयशाकडून दुसरीकडे वळवण्यासाठी भारताचा बागुलबुवा उभा करायचा, ही पाकिस्तानी नेत्यांची जुनीच खोड आहे. त्यात निसार खान यांची आता भर पडली आहे. पाकिस्तानमधली अंतर्गत सुरक्षाव्यवस्था सांभाळण्यात निसार खान यांना अपयश आलं आहे. मागच्याच महिन्यात 19 तारखेला तिथल्या एका दूरचित्रवाणीचे वरिष्ठ पत्रकार हमीद मीर यांना गोळ्या घालण्यात आल्या. त्यामुळे तिथली माध्यमं गृहमंत्र्यांवर टीकेची झोड उठवत होती. त्यांना वेगळा विषय देण्यासाठी खान यांनी ओढूनताणून मोदींवर टीका केली आहे. कारण मोदी भारताचे पंतप्रधान झाले तरी पाकिस्तानवर त्याचा काही विपरीत परिणाम होणार नाही, असे पाकिस्तानातील सत्ताधारी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीगचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे संरक्षण सल्लागार आणि परराष्टÑ व्यवहारमंत्री सरताझ अजीज यांनीच एका ब्रिटिश माध्यमाच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले आहे.
मोदी भारताचे पंतप्रधान झाले तरी आम्ही त्यांच्याशी वाटाघाटी करू, असे अजीज यांचे म्हणणे आहे. त्यांच्याच सत्तेतले वाटेकरी असलेले निसार खान हे मात्र भारताकडून असलेल्या कथित धोक्याचे भूत आपल्याच देशवासीयांच्या मानगुटीवर बसवू पाहताहेत आणि त्यातून आपले कथित शौर्यही दाखवून देण्याची त्यांची धडपड सुरू आहे. त्यांची ती धडपड किती यशस्वी होईल, हे माहिती नाही. कारण पाकिस्तानी सुशिक्षित नागरिक वस्तुस्थिती आता पुरती ओळखून आहेत. सन 1999मध्ये भाजप केंद्रात सत्तेत असताना त्याच पक्षाचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे शांततेचा संदेश घेऊन स्वत: पाकिस्तानात गेले होते. कोणत्याही देशात निवडणुकीचे राजकारण आणि नंतर सत्ताधारी पक्ष म्हणून असलेली भूमिका यात फरक पडतोच, हे पाकिस्तानी परराष्टÑमंत्र्यांचं म्हणणं तंतोतंत खरं आहे आणि ते या दोन्ही शेजारी राष्‍ट्रांनी अनुभवलेलं आहेच. या सगळ्या वादाच्या निमित्ताने मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील फरार आरोपी दाऊद इब्राहिमचा विषय चर्चेत आला आहे. तो मात्र आता दुर्लक्षित होता कामा नये. दाऊदला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे विधान नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे प्रत्यक्षात कृतीत येईल का? हा खरा प्रश्न आहे. अर्थात, मोदी पंतप्रधान झाले तर त्यांच्यासमोरही ते आव्हान आहेच. निवडणुकीतली भाषणे आणि सत्ताधारी म्हणून करावी लागणारी वर्तणूक यात फरक असतो, हेच नरेंद्र मोदींनीही दाखवून दिले तर मात्र, सारे राजकारणी एकसारखेच असतात, हा देशातील सर्वसामान्य नागरिकांचा परंपरागत विश्वास अधिक दृढ झाल्याशिवाय राहणार नाही.