आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैदिकांचे प्रताप( अग्रलेख )

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगगुरू रामदेवबाबा व संघ परिवाराशी जवळीक असणारे पत्रकार वेदप्रताप वैदिक यांनी मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याची लाहोरमध्ये घेतलेली कथित भेट अंगाशी आल्याने भाजपची चांगलीच पंचाईत झाली आहे. सरकारच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सरकारचा या भेटीशी अर्थाअर्थी संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले असले तरी या प्रकरणातला विरोधकांचा संशय फिटलेला नाही. या घटनेच्या निमित्ताने मोदी व त्यांचे सल्लागार एकाच वेळी आपल्या मंत्रिमंडळातील सहका-यांना तसेच संघ परिवाराला अंधारात ठेवून पाकिस्तानसोबत ‘बॅक डोअर’ शिष्टाई करत असल्याचे गृहीतक मांडले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी ब्राझीलला गेले असताना सरकारला अडचणीत आणणारी 13 दिवसांपूर्वीची ही घटना, एकाएकी बाहेर कशी आली हाही एक प्रश्न आहे. वेदप्रताप वैदिक हे पेशाने पत्रकार असले तरी त्यांनी यूपीए सरकारविरोधातल्या रामदेवबाबा, अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचाराविरोधातील ‘अराजकीय’ आंदोलनात ‘थिंक टँक’ म्हणून महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली होती. संघ परिवाराशी निगडित असलेल्या विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचे सदस्य असलेल्या वैदिक यांनी जाहीर स्तरावर योगगुरू रामदेवबाबा यांच्या चरणी आपली निष्ठाही अर्पण केली होती. अशी पार्श्वभूमी असलेले वैदिक, भारत आणि अमेरिकेला हवा असलेल्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची लाहोरमध्ये सहजपणे भेट घेऊ शकतात व त्याचबरोबर ते पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचीही सदिच्छा भेट घेतात, त्यामागची व्यूहरचना काय असू शकते? गेल्या जून महिन्यात भारतातील काही पत्रकार व काँग्रेसचे मणिशंकर अय्यर व सलमान खुर्शीद हे माजी मंत्री पाकिस्तानच्या दौ-यावर गेले होते. ही मंडळी मायदेशी परतली, पण वैदिक मात्र पाकिस्तानात हाफिज सईदची भेट घेण्यास थांबले होते. पण हाफिज सईद याला आपली भूमिका मांडायची असेल, तर त्याने अधिकृतपणे शिष्टमंडळाशी चर्चा केली असती. त्याने फक्त वैदिकांशीच चर्चा का केली, अन्य भारतीय पत्रकारांना भेट का दिली नाही, हा एक प्रश्न आहे.
हाफिज सईद याचा पाकिस्तानातील राजकारणात दबाव वाढत चालला होता. त्याने अमेरिकेचा लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेमागील ससेमिरा कमी व्हावा म्हणून जमात-उद-दवा या संघटनेला जन्म दिला होता. ही संघटना सामाजिक कार्य करणारी संस्था असा त्याचा दावा आजही आहे. हाफिज सईदचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतावर मोठ्या प्रमाणात प्रभाव असल्याने नवाझ शरीफ सरकारला विजय मिळवणे शक्य झाले होते. असो. सईद भेटीसंदर्भात खुद्द वैदिक यांनी प्रसारमाध्यमांना समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. मोदींची ख्यालीखुशाली पोहोचवण्यापलीकडे त्यांनी सईदला कोणते प्रश्न विचारले आणि सईदने काय उत्तरे दिली, याचाही तपशील त्यांनी जाहीर केलेला नाही.
वस्तुत: पत्रकार म्हणून ते एखाद्या देशाच्या अध्यक्षापासून नामचिन गुंड-माफिया अशी कुणाचीही भेट घेऊ शकतात. त्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्यांनी याअगोदर पत्रकार म्हणून एलटीटीई या दहशतवादी संघटनेचा नेता प्रभाकरन याचीही मुलाखत घेतली होती. पण सध्या ते मुक्त पत्रकार आहेत व मोदी यांचे सरकार सत्तेवर येऊन केवळ 45 दिवस झाले असताना हाफिज सईदसारख्या दहशतवाद्याची सहजगत्या भेट घेऊन ते भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये कोणता क्रांतिकारक बदल आणू इच्छितात हे मात्र स्पष्ट होत नाही. महत्त्वाचे म्हणजे, पाकिस्तानशी ट्रॅक टू डिप्लोमसीचा हा एक प्रयत्न असेल तर अशा प्रयत्नांना पहिल्यापासून कडाडून विरोध करणा-या खुद्द भाजपचे या संदर्भातले म्हणणे दिशाभूल करणारे आहे. हा अगदी ताजा इतिहास आहे की, डॉ. मनमोहनसिंग यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात भाजपने पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवण्यास कडाडून विरोध केला होता.
2008 मध्ये शर्म-अल-शेखमध्ये डॉ. मनमोहनसिंग यांनी बलुचिस्तानबाबत मवाळ विधान केल्यानंतर भाजपने देशभर गहजब माजवला होता. 2014च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानविरोधात सातत्याने कडवी भूमिका घेतली होती. पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आपल्या शपथविधीला शिवसेनेच्या विरोधाची पर्वा न करता थेट नवाझ शरीफ यांनाच निमंत्रण देऊन सर्वांनाच धक्का दिला होता. या पार्श्वभूमीवर वैदिक हे सरकारचे प्रतिनिधी नव्हते व त्यांची हाफिज सईदबरोबर झालेली भेट वैयक्तिक स्वरूपाची होती, हा जेटली व सुषमा स्वराज यांचा दावा सहजी मान्य होणारा नाही. यात महत्त्वाचा मुद्दा हा की, कुख्यात दहशतवाद्याला वैदिक भेटतात याची कानोकानी खबर गुप्तचर खात्याला, पाकिस्तानातील भारतीय दूतावासालाही लागत नाही. त्या अर्थाने वैदिकांचे सीमेपलीकडचे हे प्रताप दुर्लक्षिण्यासारखे नक्कीच नाहीत.