आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लज्जास्पद पराभव ( अग्रलेख )

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचे क्रिकेट हे मान्सूनइतके बेभरवशाचे आहे, असा इशारा लॉर्डसवरील विजयानंतर आम्ही दिला होता. तो खरा ठरला. मात्र दु:ख तो खरा ठरल्याचे नाही. इंग्लंडमध्ये पराभव झाला याचेही नाही. दु:ख पराभव ज्या पद्धतीने झाला त्याचे आहे. महेंद्रसिंग धोनीच्या संघाकडून इतका लाजिरवाणा पराभव अपेक्षित नव्हता. झुंज देत पराभव झाला असता तर इतके दु:ख झाले नसते. लॉर्ड्सवरील विजयानंतर पुढील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ आटोकाट प्रयत्न करील अशी अपेक्षा होती.
संघाचा लॉर्ड्सवरील खेळच तसा होता. नवे खेळाडू दमदारपणे खेळले होते. धोनीचे नेतृत्व कौशल्यपूर्ण होते. उसळत्या मा-याचे भेदक अस्त्र भारताच्या पोतडीतही असल्याची सुखद जाणीव ईशांत शर्माने करून दिली होती. पुढील वर्षी येऊ घातलेल्या विश्वचषकासाठी नवा संघ तयार होत असल्याचे शुभशकुन लॉर्ड्सवरील खेळात दिसले होते. इंग्लंडचा संघ लॉर्ड्सवर अगदी गलितगात्र झाला होता. कप्तान अ‍ॅलिएस्टर कुकला घरी पाठवा असा धोशा इंग्लंडमधील वृत्तपत्रांनी लावला. परंतु तिस-या कसोटीत रवींद्र जडेजाने 15 धावांवर कुकचा झेल सोडला आणि त्या क्षणापासून जणू इंग्लंडचे नशीब फळफळले. गमावलेला आत्मविश्वास, 95 धावा करीत कुकने कमावला आणि हा आत्मविश्वास इंग्लंडच्या संघामध्येही पाझरला. त्यानंतर इंग्लंडची आक्रमकता भारताला थोपवता आली नाही. इंग्लंड संघातील प्रत्येक खेळाडूला सूर सापडला. याउलट भारताची स्थिती होत गेली. विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांचा खेळ ढासळला.
ईशान जखमी झाला आणि जलदगती गोलंदाज म्हणून संघात आलेले 60-65च्या वेगाने गोलंदाजी टाकू लागले. धोनीच्या नेतृत्वात कल्पकतेची जागा हटवादीपणाने घेतली. तिस-या कसोटीपासून सुरू झालेली घसरण पाचव्या कसोटीत 95 सारख्या लाजिरवाण्या धावसंख्येवर थांबली.
भारताच्या घसरणीसाठी धोनीला जबाबदार ठरवून त्याचे कर्णधारपद काढून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याच आहेत. पराभवाचे लज्जास्पद स्वरूप पाहता अशा निर्णयाचे समर्थनही होऊ शकते. तथापि, धोनीला बाजूला करून पराभवामागची मुख्य कारणे दूर होतील का, हा कळीचा मुद्दा आहे. मैदानावरील पराभवाला धोनी जबाबदार असेल; पण मैदानावर खेळाडूंनी मान टाकण्यामागे मैदानाबाहेरील कारणे होती व या महत्त्वाच्या कारणांसाठी बीसीसीआयला कोण जबाबदार धरणार, हा मुख्य प्रश्न आहे. विजयामध्ये सातत्य न राखणे ही भारतीय संस्कृतीची विशेषता आहे. लढाई जिंकण्यातही भारतीय राजांनी कधी सातत्य दाखवलेले नाही. एखाद्या संग्रामात साहस, धैर्य, कल्पकता, मेहनत अशा गुणांचे विलक्षण प्रदर्शन करून लोकांचे डोळे दिपवायचे आणि नंतर सुस्त होऊन पराभवांची मालिका रचायची हा आपला इतिहास आहे. क्रिकेटमध्ये एकेकाळी असेच होत होते. पण गेल्या काही वर्षांत विजयाची जिद्द भारतीय संघात डोकावत होती. मधल्या काळात ती फारच उंचावली होती. धोनीच्या नेतृत्वाखालील नव्या संघात ती आणखी वर जाईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे न होण्याला धोनीच्या मर्यादा, खेळाडूंचा स्वभाव याबरोबरच बीसीसीआयचा कारभारही कारणीभूत आहे. बक्कळ पैसा मिळवून देणारी यंत्रे यापलीकडे खेळाडूंना बीसीसीआय किंमत देत नाही.
आयपीएलसारख्या सामन्यांतून, लोकरंजनासाठी, खेळाची रचनाच अशी केली आहे की फलंदाजांना वेगळ्या पद्धतीच्या क्रिकेटची सवय होऊ नये. कसोटी क्रिकेटकडे तुच्छतेने पाहण्यास आयपीएलच्या पैशाने शिकवले. भरघोस धावा निघणा-या खेळपट्टीवर खेळण्याची सवय फलंदाजांना लागली. वेगळ्या वातावरणात, बदलत्या खेळपट्टीवर खेळण्याची संधीच फलंदाजांना मिळाली नाही. धोनीच्या संघातील अनेक खेळाडूंचा हा इंग्लंडमधील पहिलाच कसोटी दौरा होता. तेथील हवामान, खेळपट्ट्या यांची ओळख होण्यासाठी, चुका दुरुस्त करण्यासाठी, अनेक लहान सामन्यांची योजना करण्याची गरज होती. अशा सामन्यांतून खेळाडूंना उत्तम सराव झाला असता. पण पैशाकडे लक्ष असलेल्या बीसीसीआयला असे करण्याची गरज वाटली नाही.
आज भारतीय संघ एखाद्या यंत्रमानवासारखा एकदिवसीय क्रिकेटसाठी खेळणारा संघ झाला आहे. खेळाचे स्वरूप थोडे जरी बदलले तरी खेळाडू सैरभैर होतात. बदलाशी जुळवून घेताना त्यांची तारांबळ उडते. एकदिवसीय सामने, आयपीएल यांच्या चरकात सापडून त्यांचा खेळ साचेबद्ध होऊ लागला आहे. खेळाडूंच्या गुणांमध्ये विविधता येईल, त्या गुणांचे संवर्धन होईल, त्यामध्ये सातत्य राहील अशी व्यवस्था करण्याकडे लक्ष दिले न गेल्याने असले लाजिरवाणे पराभव वाट्याला येतात. धोनीचे चमत्कारिक नेतृत्व, खेळाडूंची पराभूत मानसिकता, खेळापेक्षा आर्थिक व्यवहारांकडे अधिक लक्ष देण्याची वृत्ती अशा गोष्टींबरोबरच बीसीसीआयचा आपमतलबी व्यवहार हेही पराभवाचे महत्त्वाचे कारण आहे. हे दोष दूर झाले नाहीत तर पुढील वर्षी विश्वचषक राखणे कठीण आहे, यात शंका नाही.