आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वांचलमधील धग ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजवर काश्मीर व पूर्वांचल राज्यांमध्ये ज्या फुटीरतावादी चळवळी अस्तित्वात आहेत, त्या वर्षोगणिक अधिकाधिक उग्र स्वरूप धारण करताना दिसत आहेत. दहशतवाद्यांनी आपल्या कारवायांनी ही राज्ये पोखरलेली आहेत. या फुटीरतावादी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा शोधता न येणे हे आजवरची केंद्र सरकारे व संबंधित राज्यांतील सरकारांचे घोर अपयश आहे.
पूर्वांचलातील आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड ही पाच राज्ये फुटीरतावादी आंदोलने व दहशतवादाच्या विळख्याने कायमच ज्वालामुखीच्या तोंडावर उभी आहेत. त्या तुलनेत अरुणाचल प्रदेश व त्रिपुरामधील परिस्थिती फारशी बिघडलेली नाही. पूर्वांचल राज्यांत आदिवासी जमातींमधील काटेरी व टोकेरी संघर्ष, तेथे ख्रिश्चन मिशन-यांच्या सुरू असलेल्या कारवाया, बांगलादेशी घुसखोरांनी माजवलेला उत्पात, पुरेसा न झालेला आर्थिक विकास अशा अनेक कारणांमुळे ही राज्ये फुटीरतावाद्यांच्या कह्यात गेलेली आहेत. त्यामुळे तिथे काट्याचाही नायटा होत असतो. आसाम व नागालँड या दोन राज्यांच्या सीमेवरील गोलघाट परिसरात महिनाभरापासून जो उद्रेक सुरू आहे त्याचे आताचे तत्कालिक कारण करिकोळ आहे.
आसाममधील आदिवासी जमातीतील साल्मन सामा व नागा जमातीतील इकोथुंग लोथा या दोघांमध्ये गेल्या एप्रिल महनि्यापासून एका शेतजमिनिवरून वाद सुरू होता. लोथा याच्या मालकीची ही शेतजमीन त्याने सामाला कसायला दिली व त्यातून मिळणा-या उत्पन्नाचा निम्मा-निम्मा हिस्सा दोघांनी वाटून घ्यायचा, असा करार झालेला होता. मात्र, या शेतजमीनीमध्ये लोथा याने अनधिकृतरीत्या झोपडी उभारली, अशी तक्रार सामाने केल्यामुळे न्यायदंडाधिका-यांनी या प्रकरणी चौकशी करून ही झोपडी तोडण्याचे आदेश दिले, तसेच सामाला जमीन कसण्यास बंदी केली. मात्र, हा आदेश झुगारून सामाने ही शेतजमीन पुन्हा कसण्यास सुरुवात केल्याने अखेर सीआरपीएफच्या जवानांनी त्याला तसे करण्यास आडकाठी केली. याचदरम्यान गोलाघाट परिसरातील दोन आदिवासी मुलेही बेपत्ता झाली. या सर्व वितंडवादात आसाम व नागालँड राज्यांत सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनाही उतरल्या. त्यानंतर या विवादाला दोन जमातींमधील संघर्षाचे तसेच सुरक्षा दलांविरूद्धच्या असंतोषाचे उग्र स्वरूप प्राप्त झाले आहे.
गोलाघाटनजीकच्या रंगाजन भागामध्ये बुधवारी हजार सशस्त्र निदर्शक तेथील पोलिस ठाण्यावर चाल करून गेले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन ठार, तर १५ जण जखमी झाले आहेत. आसामामधील निदर्शकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६ वरील वाहतूक रोखून धरली असल्याने पूर्वांचलातल्या अन्य राज्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा मंदावला आहे. प्रत्येक गंभीर प्रश्नावर राजकारण करून तो प्रश्न नासवण्याची जुनी खोड आपल्या देशात आहे. आसाम व नागालँडच्या सीमेवर तैनात असलेले सीआरपीएफ जवान तटस्थ भूमिका बजावत नसून केंद्र सरकारही पुरेशा गांभीर्याने गोलाघाट हिंसाचार प्रकरणाकडे पाहत नाही, असा आरोप आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केला आहे.
गोगोई यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांचे आसाम काँग्रेसमधील विरो धकच गोलाघाट परिसरात आणखी हिंसाचार उफाळून यावा म्हणून प्रयत्नशील आहेत, असा अहवाल केंद्रीय गृहखात्याने तयार केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गोगोईंना सर्व आवश्यक मदत पुरवण्याचे आश्वासन दिले असले तरी गोलाघाट हिंसाचारावरून भाजप विरूद्ध काँग्रेस असे उफाळून आलेले राजकारण हे अजिबात देशहिताचे नाही. सीमेवर शत्रू राष्ट्रांच्या जवानांशी होणारा संघर्ष अनेकदा अपरिहार्य असतो. मात्र, देशांतर्गत दहशतवादी चळवळी फोफावल्या व त्यातून हिंसाचाराचे रक्तरंजित पर्व सुरू झाले तर ते अतिशय हानिकारक ठरते. आसाम-नागालँड राज्यांमध्ये सीमेबद्दल वाद असून तेथील १ लाख बिघे क्षेत्रफळाची जमीन वादग्रस्त आहे. या भागात आसामी, नागा लोकांमध्ये परिसरातील जमनिीच्या मालकी हक्कावरून अनेक वाद आहेत. १९६३ मध्ये नागालँड राज्य अस्तित्वात आल्यानंतर हा वाद आणखी उग्र झाला. त्यावरून गेल्या काही दविसांत झालेल्या संघर्षात १४ जण ठार झाले आहेत, तर दहा हजार जणांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.
आसाम-नागालँडमध्ये उफाळलेला हा संघर्ष नविळण्यासाठी तातडीने ठोस पावले टाकणे आवश्यक बनले आहे. पूर्वांचलातील मणिपूर या राज्यात लागू केलेला आर्म्ड फोर्सेस स्पेशल अ‍ॅक्ट मागे घेण्यात यावा, यासाठी १४ वर्षांपासून उपोषण करणा-या व यापुढेही ते जारी ठेवणा-या इरोम शर्मिला यांची बुधवारी मुक्तता करण्यात आली. त्यामुळे मणिपूरमध्ये तैनात सुरक्षा दलांविरो धातील प्रचारमोह‍िमेला पुन्हा जोर येईल, अशी भीती तेथील राज्यकर्त्यांना वाटत आहे. अशा विविध प्रश्नांनी पूर्वांचलातील राज्ये धगधगत आहेत व या प्रश्नांवर योग्य तोडगा नजीकच्या काळात नक्कीच निघेल, ही आशा अजूनही कायम आहे.