आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला चपराक (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभेच्या तीन आणि विधानसभांच्या ३३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल भारतीय जनता पक्षाला धक्का देणारे तर आहेतच; पण त्याहीपेक्षा भारतीय जनतेला नेमके काय हवे आहे याचे स्पष्ट चित्र मांडणारे आहेत. हे चित्र भारतीय राजकीय पक्षांना आणि त्यांच्या कथित प्रगल्भ नेत्यांना त्यांच्या विशिष्ट चष्म्यातून दिसते की नाही, हा वेगळा मुद्दा आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाला निवडून दिलेले नव्हते तर नरेंद्र मोदी नावाच्या गुजरातमधील "विकासपुरुषा'ला निवडून दिले होते हे आधी लक्षात घेतले पाहिजे. मोदी खरोखर विकासपुरुष आहेत की नाहीत, हा वादाचा मुद्दा असेलही; मोदींनी आपली
ती प्रतिमा तयार करण्यात मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी नक्कीच यश मिळवले होते. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच झालेल्या विधानसभांच्या पोटनिवडणुकीत आणि आता झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही, याचे कारण ही निवडणूक मोदींना निवडून देण्यासाठी झालेलीच नव्हती हे लक्षात घेतले पाहिजे. भाजपच्या नेत्यांना मात्र लोकांची मानसिकता कळलेलीच नाही. गुजरात दंगलीमुळे तयार झालेली मोदी यांची आणि पर्यायाने भाजपची कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमाच लोकसभेत यश देऊन गेली, याच
भ्रमात अजूनही हे नेते वावरत आहेत. तोच धर्मवाद आणखी तीक्ष्ण केला तर यशही अधिक धारदार होईल, या विचारातून धर्मवादाच्या निखाऱ्यांना फुंकर घालण्याचे काम ठरवून केले गेले.
त्यासाठी योगी आदित्यनाथ आणि साक्षी महाराज यांच्यासारख्यांच्या वाचाळ वृत्तीचा खुबीने वापर केला गेला. 'लव्ह जिहाद'चे भूत त्यांच्या माध्यमातून उभे केले गेले. त्यामुळे पुन्हा धार्मिक ध्रुवीकरण होईल आणि गठ्ठ्याने मते भाजपच्या पारड्यात पडतील, अशी खात्रीच भाजपच्या नेत्यांना होती. मात्र मतदारांची मानसिकता वेगळी होती. त्यांनी लोकसभेसाठी
विकासाचा दृष्टिकोन असलेल्या मोदींना मतदान केले होते, दंगलीला खतपाणी घातल्याचा आरोप झालेल्या मोदींना नव्हे. भाजपच्या नेत्यांना मात्र उत्तर प्रदेशात झालेल्या दंगलीमुळे तिथे ८० पैकी ७२ उमेदवार भाजपचे निवडून आले, असा भ्रम झाला होता. विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी पुन्हा दंगल करता येत नव्हती म्हणून लव्ह जिहादचे भूत ठरवून उभे केले गेले. लोकसभेत त्या संदर्भात मुद्दा उपस्थित होऊनही मोदी त्यावर काही बोलले नाहीत, हादेखील वादाचा मुद्दा बनला होता. भाजपला मदत व्हावी म्हणूनच मोदी बोलले नाहीत, असा
अर्थ त्यातून काढला गेला. मात्र, असले मुद्दे उपस्थित करून यश मिळत नाही हे भाजपच्याच काही नेत्यांना दाखवून देण्यासाठीच मोदी संसदेत गप्प राहिले असावेत, असे म्हणायला हवे. त्यासाठीच ते या निवडणुकीत कुठेही प्रचारालादेखील आले नाहीत. जे काही यश मिळते ते भाजपच्या हिंदुत्ववादी धोरणामुळे नाही तर मोदींमुळेच ते मिळू शकते, हे दाखवून देण्याचीच ही मोदी नीती आहे. भाजपमधल्या मोदी महिमा नाकारणाऱ्या नेत्यांनाही त्यातून धडा देण्याची ही राजकीय खेळी ते खेळले आहेत. त्यामुळे पक्षातल्या उरल्यासुरल्या मोदी विरोधकांनाही त्यातून जी काही शिकवण मिळायची ती मिळाली आहे. महाराष्ट्रातले भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातल्या जागावाटपाबाबत दिल्लीत बोलावलेली बैठक पोटनिवडणुकीचे निकाल येताच गुंडाळून घेतली आणि अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर सोपवून ते मोकळे झाले. भाजपची वाटते तितकी हवा आता राहिलेली नाही याची जाणीव होऊन ते भानावर आले असावेत. हे भान राज्यातल्या भाजपच्या अन्य नेत्यांनाही आले असेल, असे वाटते. या निकालांमुळे शिवसेनेला आतून आनंदच झाला असण्याचीही शक्यता आहे. ज्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून खुद्द मोदी विजयी झाले आहेत, त्याच लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभेच्या एका मतदारसंघात आता भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे. त्यामुळे ना मोदींचा करिश्मा चालतो आहे ना भाजपचा, हे दाखवून देणे शि‍वसेनेला आता सोपे होणार आहे. त्या बळावरच शिवसेनेचा युतीतला आवाज पुन्हा वाढला तर आश्चर्य वाटायला नको. तसे घडावे, असेच युतीच्या विरोधकांना, अर्थात दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना वाटते आहे.
युतीतली भांडणेच आपल्याला तारणार आहेत याची त्यांना खात्री आहे. त्यासाठी दोघांमधल्या आगीत तेल ओतण्याचे काम खुद्द शरद पवार यांनीच चालवले आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालांनी तर त्यांच्या हाती तेलाचा मोठा कॅनच दिला आहे. ते त्यांचे
काम करत राहतील आणि युतीचे नेते आपापल्या पदरात अधिक जागा पाडून घेण्यासाठीची धडपड करत राहतील. पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या पक्षांचे नेते आपली पाठ स्वत:च थोपटून घेण्यात काही दिवस मश्गूल राहतील. या गदारोळात मतदारांनी दिलेला विकासवादाचा संदेश मात्र दुर्लक्षित राहण्याचीच शक्यता अधिक आहे.