आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारसूर्याचा अस्त ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी भागात स्वत:च्या कर्तृत्वावर सहकार आणि शिक्षणाचे एक अधिराज्य निर्माण करणारा पी. के. अण्णा पाटील नावाचा सहकारसूर्य गुरुवारी अस्ताला गेला. त्यांचे निधन अनपेक्षित नसले तरी मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. ही पोकळी केवळ राजकारणातली किंवा सहकार क्षेत्रातली नाही. ती सर्वच क्षेत्रांतील भविष्याचा वेध घेणा-या दूरदृष्टीची आहे.
कोणतीही अनुकूलता नसताना विकासाचा मेरू उभा करू शकणा-या कर्तृत्वाची आहे आणि कोणत्याही संकटात न डळमळणा-या खंबीरपणाची आहे. समाजकारणासाठी राजकारणाची भाषा करणा-यांचे हेतू उघडे पडायला वेळ लागत नाही. पी. के. अण्णांच्या राजकीय सहभागाच्या हेतूवर मात्र त्यांनी कधीच दावा न करताही कोणाला शंकादेखील घेता आली नाही, हे या नेत्याचे वैशिष्ट्य होते. सत्ता मिळवण्यामागचा हेतू काहीही असो, ती मिळायला मात्र नशीबच लागते, हे या माणसाच्या राजकीय कारकीर्दीचे साक्षीदार असणा-यांना वेगळे सांगावे लागत नाही.
सातपुड्यातल्या आदिवासी वसाहतींमध्ये सहकाराच्या माध्यमातून उद्योगांचे मळे पिकवताना आणि शिक्षणाचे नंदनवन निर्माण करताना त्यांना अपार संघर्ष करावा लागला. त्या संघर्षाची घनता कमी व्हावी आणि कामाची गती आणि व्याप्ती वाढावी यासाठी राजकीय सत्तेची अपेक्षा त्यांनी नक्कीच केली; पण कधी राजाने, तर कधी प्रजेने त्यांना हुलकावणी देत सत्तेपासून दूर ठेवले. जनता पक्ष, जनता दल आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तीन वेळा ते शहाद्याचे आमदार झाले. दोन वेळा लोकसभेची निवडणूकही लढले. मात्र, दिल्लीत जाण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. अर्थात, त्याची त्यांना कधी फारशी खंत वाटलीही नाही. सत्ता किंवा पदे मिळायला हवीत म्हणून कधी त्यांनी लांगूलचालनही केले नाही. उलट आपल्या स्पष्ट आणि परखड बोलण्यामुळेच त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले. सत्ता मिळत नाही म्हणून ते कधी बसून राहिले नाहीत.
सातपुड्याच्या कुशीत सहकारी तत्त्वावर साखर कारखाना सुरू करून त्यांनी त्या भागाच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. या कारखान्याची उत्पादन क्षमता तर वाढवत नेलीच; पण पार्टिकल बोर्डापासून विजेपर्यंत अनेक उपउत्पादने त्यांनी या साखर कारखान्यातून निर्माण करायला सुरुवात केली. सहकारी साखर उद्योगाला ‘सस्टेनेबल’ बनवण्याचे श्रेय त्यामुळे या सहकारमहर्षीलाच जाते. त्यांनीच उभी केलेली सहकारी तत्त्वावरची सूतगिरणी आजही अनेक पुरस्कारांची धनी ठरते आहे. सातपुड्याच्या कुशीत आदिवासी भागात असलेली ही सूतगिरणी सर्वाधिक निर्यातक्षम सुताचे उत्पादन करण्यासाठी ओळखली जाते.
ऊस आणि कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करतानाच त्यांनी या पिकांच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सिंचनाची सोय व्हावी म्हणून तापी आणि अन्य नद्यांवर सहकारी तत्त्वावरच उपसा जलसिंचन योजना आखल्या आणि त्या यशस्वीही केल्या. या उपसा सिंचन योजनांचेच नंतर इतरत्र पीक यायला लागले. ते अनुकरण पैसा कमावण्याच्या हेतूने करून सहकारी उपसा सिंचन हा अनेक राजकारण्यांनी बदनामीचा विषय करून ठेवला. शहादा परिसरातल्या सहकारी उपसा सिंचन योजना मात्र आजही सिंचनाचे काम प्रभावीपणे करत आहेत.
आदिवासी भागात वीज मिळावी म्हणून सहकारी तत्त्वावरच पी. के. अण्णांनी वीज वितरण संस्था उभी केली आणि अनेक खेडे आणि पाडे प्रकाशमान केले. तापी खो-याचा एकात्मिक पद्धतीने विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी अनेक तज्ज्ञांना बोलावून चर्चा घडवून आणल्या, परिषदा घेतल्या. त्यातूनच तापी नदीवर तीन बॅरेजेस उभे राहिले आणि तापी काठ सुजलाम सुफलाम होऊ शकला. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी ते खर्च करावे आणि त्या पैशातून गरिबांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी त्यांनी लग्न समारंभांना उपस्थित राहण्यासाठी देणगी घ्यायचा उपक्रम राबवला. त्यामुळेच त्या आदिवासी भागात उच्च शिक्षणाच्या उत्तम सुविधा उभ्या राहिल्या.
सावकारांच्या पाशातून गरीब आणि आदिवासींना मुक्त करण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी करत बसण्याऐवजी त्यांनी सहकारी तत्त्वावर पतसंस्था आणि बँक सुरू केली. प्रामाणिक आणि पारदर्शकपणे व्यवहार केला तर कोणतीही संस्था तोट्यात जात नाही, हे त्यांनी अनेक संस्थांमधून सिद्ध करून दिले. राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या काळात ते मंडळ पहिल्यांदाच नफ्यात आणण्याचे श्रेयही याच माणसाला जाते. सलग ११ वर्षे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्या काळात त्यांच्यावर राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून आरोपही झाले. पण पुराव्याचे गठ्ठेच पत्रकारांसमोर ठेवून त्यांनी त्यांना निष्प्रभ केले. कधी कारखान्यात झालेल्या संपामुळे, तर कधी ज्यांच्या विकासासाठीच सतत काम केले त्यांनी केलेल्या निवडणुकीतील पराभवामुळे त्यांना व्यथित केलेही; पण त्यातूनही ते नव्या जोमाने उभे राहिले होते. त्यांचा तो जोम आणि ते कर्तृत्व पुढच्या अनेक पिढ्यांना नक्कीच प्रेरणा देत राहील. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.