आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मंगळ’ सुखकर होवो! ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०१२च्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी भारताच्या मंगळ मोहिमेची घोषणा केली होती. त्यानंतर केवळ सव्वा वर्षाच्या काळात इस्रोने अहोरात्र मेहनत घेऊन आपली मंगळ मोहीम उड्डाणासाठी सज्ज केली होती. गेल्या वर्षी पाच नोव्हेंबरला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून इस्रोचे यान मंगळ ग्रहाकडे रवाना झाले होते व आज ते मंगळ ग्रहाच्या कक्षेत येत आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वच जण साक्षीदार असू. कारण इस्रोचा हा पहिलाच असा उपग्रह आहे की जो सुमारे पाच कोटी ६० लाख किमी अंतर पार करत ३०० दिवसांत मंगळाच्या कक्षेत स्थिरावण्यासाठी सज्ज झाला आहे. हे यान मंगळ ग्रहाकडे कूच करत असताना त्याला पृथ्वीची कक्षा, हेलिओसेंट्रिक ट्रॅजेक्टरी व मंगळ ग्रहाची कक्षा अशा तीन टप्प्यांतून जावे लागले. ‘चांद्रयान-१’च्या निमित्ताने इस्रोने पृथ्वीच्या कक्षेचे आव्हान पेलले होते. पण सध्याचे यान हेलिओसेंट्रिक ट्रॅजेक्टरीमध्ये गेल्यानंतर त्याला सुमारे १० महिन्यांचा काळ सूर्यासोबत काढावा लागला होता. ही कठीण परीक्षा होती.
मंगळयानाचा हा सगळा वर्षभराचा प्रवास पृथ्वीवरून नियंत्रित करावा लागला. या प्रवासादरम्यान यानाला लागणारे इंधन, या यानाचा इस्रोशी राहणारा दैनंदिन संपर्क, आपत्कालीन परिस्थितीत या यानावर केले जाणारे नियंत्रण ही सर्व आव्हाने इस्रोने पेलली व आता हे यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत आल्यास भारत हा मंगळ ग्रहावर आजपर्यंत यान पाठवलेल्या तीन देशांच्या पंक्तीत बसेल. महत्त्वाचे म्हणजे अंतराळ मोहिमांवरील अब्जावधी रुपयांचा खर्च पाहता इस्रोने केवळ ४५० कोटी रुपये खर्च करून स्वदेशी बनावटीचे हे यान तयार केले होते. योगायोग असा की, सोमवारीच अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचे मावेन हे यानही मंगळाच्या कक्षेत पोहोचले आहे. मावेन मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागानजीकच्या वातावरणातील रेणूंचा अभ्यास करणार आहे. मंगळ ग्रहावर कार्बन डायऑक्साइडचे वातावरण असून हा थर अत्यंत पातळ आहे. त्यामुळे या ग्रहावर कोणे एकेकाळी पाणी असल्याचे शास्त्रज्ञांचे गृहीतक आहे. या गृहीतकावर संशोधन करण्यासाठी मावेन सज्ज झाले आहे. मंगळ ग्रहावर सौर वादळांचा, सूर्याचा परिणाम कसा होतो याचाही अभ्यास मावेन करणार आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळाचे वातावरण उबदार व द्रवीभूत होते, पण आता ते तसे राहिलेले नाही. हे स्थित्यंतर नेमके कसे झाले याचा अभ्यास मावेन करणार आहे.
गैरसमज असा पसरला आहे की, भारताचे मंगळयान मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. पण तसे होणार नाही. हे यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत फरिणार आहे. मंगळावर मिथेन वायूचे प्रमाण अधिक असल्याने या वायूचा अभ्यास आणि हा वायू मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागात किंवा जैविक प्रक्रियेतून नरि्माण झाला आहे का, याचा शोध इस्रोकडून घेतला जाणार आहे. मंगळ ग्रहाला ‘दिमोस’ आणि ‘फोबोस’ असे दोन चंद्र असून इस्रोचे मंगळयान ‘फोबोस’ या चंद्राच्या जवळ असणार आहे. या वास्तव्यात ते ‘फोबोस’चा अभ्यास करणार आहे. इस्रोच्या मंगळयानाला अवकाश संशोधनाची आणखी एक संधी या निमित्ताने मिळाली आहे. पुढील महिन्यात मंगळ ग्रहापासून सुमारे ५० हजार किमी अंतरावरून एक धूमकेतू मार्गक्रमण करणार आहे. या प्रवासात हा धूमकेतू मंगळ ग्रहाच्या वरच्या वातावरणात प्रचंड प्रमाणात धूलिकण सोडेल. या कणांमुळे तापमान वाढणार असून त्याचे पृथक्करण करण्याची संधी मंगळयानाला मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या एकंदरीत घडामोडींवर देखरेख ठेवण्यापासून माहितीचे आदानप्रदान करण्यापर्यंत इस्रो आणि नासामध्ये पहिल्यांदाच असा समन्वय होत आहे. नासाचे अवकाश संशोधनातील सामर्थ्य वादातीत आहे. काही वर्षांपूर्वी ‘क्युरिऑसिटी’ या नासाच्या बग्गीने मंगळावर पोहोचल्यानंतर या ग्रहाच्या पृष्ठभागाचे पृथक्करण करण्यास सुरुवात केली होती.
क्युरिऑसिटीने मंगळाच्या मातीत पाण्याचे अंश असल्याचे म्हटल्यानंतर या ग्रहाविषयी उत्सुकता वाढली होती. ‘क्युरिऑसिटी’ने मंगळावर कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन व सल्फर डायऑक्साइड हे वायूही असल्याची माहिती पाठवली होती. १९८४ मध्ये शास्त्रज्ञांना अंटार्क्टिका खंडावरील अ‍ॅलन हिल्स येथे एक उल्का सापडली होती. ही उल्का मंगळावरून आल्याचा व त्यामध्ये सूक्ष्मजीव असल्याचा दावा १९९६ मध्ये करण्यात आला होता. या दाव्याला अजून सबळ पुरावे मिळाले नसले तरी आता ते मिळवण्यासाठी नासा अधिक परिश्रम घेत आहे. नासाच्या या संशोधनाला इस्रोची जोड मिळाली आहे. या निमित्ताने इस्रोला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची क्षमताही सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या ६० वर्षांच्या इस्रोच्या आव्हानात्मक प्रवासातील हा एक मैलाचा दगड आहे. या शास्त्रज्ञांचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे.