आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा जनतेचा अपमान( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्यात जागावाटपावरून चाललेला घोळ हा मित्रपक्षांचा अपमान असल्याचे राजू शेट्टी व जानकर यांनी म्हटले असले तरी वस्तुत: तो महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान आहे. राज्यात सत्तांतर करण्याची अपेक्षा जनतेच्या मनात असताना राजकीय स्वार्थासाठी दोन्ही पक्षांचे नेते जनतेच्या भावनांना वेठीला धरीत आहेत. महाराष्ट्रात राज्य करून काही बदल घडवून आणण्याची संधी उद्धव ठाकरेंना मोदींच्या लोकप्रियतेमुळे मिळत होती तर काँग्रेसमुक्त भारत या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्याची संधी नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात मिळत होती.
सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत उद्धव ठाकरे यांनी फार जबाबदारीने पावले टाकली. ठाकरी आवेशापासून स्वत:ला दूर ठेवले. मात्र काही दिवसांपूर्वी तो अचानक जागा झाला. त्यामागची खरी कारणे काय हे अद्याप कळलेले नाही. काही तर्क करता येतात व त्यातील एका तर्कानुसार मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला मिळवून देण्याची महत्त्वाकांक्षा जागी झाली. त्यातून जागावाटपांबाबत दुराग्रह सुरू झाला. अशी महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काहीही नाही. सत्ता हाती घेऊन राज्यात काही चांगले बदल करून दाखवण्याची इच्छाशक्ती हे नेतृत्वाचे एक लक्षण असते. पण शक्यतो ही सत्ता स्वत:च्या मनगटाच्या जोरावर आणावी लागते. मित्रपक्ष या नावाखाली कुबड्या घ्यायच्या व त्या कुबड्यांच्या आधाराने मुख्यमंत्रिपदाचा हट्ट धरायचा हे जनतेला मान्य होणारे नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळी शिवसेनेची लोकप्रियता भाजपपेक्षा अधिक होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.
स्वत:च्या ताकदीवर संपूर्ण देशात एकपक्षीय सत्ता आणणारा नेता मोदींच्या रूपात ब-याच वर्षांनंतर भारताला मिळाला आहे. मोदींमुळेच भाजपच्या महाराष्ट्रातील मतांची संख्या १४ टक्क्यांवरून एकदम २९ टक्क्यांवर गेली. हे वास्तव उद्धव ठाकरे यांना मान्य होण्यासारखे नसले तरी जनतेच्या मनावर ठसले आहे. या मतांनी जात, धर्म, प्रांत अशा संकुचित अस्मितांचा अव्हेर केला. मोदी यांची लाट आता ओसरली असली तरी त्यांच्या नेतृत्वाबद्दलची, निदान महाराष्ट्रातील आस्था कायम आहे. या परिस्थितीत भाजपच्या मदतीने महाराष्ट्रात आपले बस्तान सत्तेच्या मार्गाने बळकट करण्याची संधी उद्धव ठाकरे यांना होती. पण १५० जागांच्या मोहात पडून ही संधी गमावण्याचे ठाकरे यांनी ठरवलेले दिसते.

दुस-याबाजूला भाजपबद्दलही बरे बोलण्यासारखे नाही. शिवसेनेने भाजपशी अनेकदा दबावाचे राजकारण केले. त्याचा राग प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात खदखदत असतो. कमळाबाई या उल्लेखाने मनावर उठणारा व्रण भाजप कार्यकर्ते विसरत नाहीत. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्म्यापुढे त्यांना लोटांगण घालणे भाग पडत होते. त्या करिश्म्याची जराशी छाया राज ठाकरे यांच्यामध्ये दिसताच चहापान करून शिवसेनेला कोंडीत पकडण्याची धडपड भाजपने काही वर्षांपूर्वी केली. शिवसेनेला ठणकावणारा कणखर नेता भाजपला हवा होता. तो नरेंद्र मोदींच्या रूपात मिळाला. मोदींच्या करिश्म्याने भाजपची मतसंख्या दुपटीने वाढली व त्याबरोबर आवाजही वाढला. महाराष्ट्रावर पूर्ण हुकूमत बसवण्याची संधी समोर दिसू लागली. उद्धव ठाकरेंप्रमाणेच ही राजकीय महत्त्वाकांक्षा होती व राजकारणात असे चालतेच. प्रश्न आहे तो घोळ घालण्याचा. गतिमान निर्णयक्षमता असणारे नेते म्हणून मोदी ओळखले जातात.
झटपट व ठाम निर्णय घेण्याचे त्यांचे गुजरातमधील कौशल्य जनतेला आवडले होते. तथापि, निर्णयक्षमतेचा हा गुण दिल्लीत सत्ता मिळाल्यानंतर लोप पावलेला दिसतो. प्रशासकीय व परराष्ट्रीय राजकारणाच्या स्तरावर काही चांगले निर्णय होत असले तरी राजकीय, सामाजिक व आर्थिक स्तरावर मोदींची निर्णयक्षमता दिसलेली नाही. जागावाटपातील कुचंबणा हा अप्रत्यक्षपणे मोदींच्या पंगू निर्णयक्षमतेचा परिणाम आहे हे लक्षात घेतले पाहिजे. शिवसेना डोईजड वाटत असेल वा आपल्या व्यापक राजकीय व्यूहरचनेत सेनेची अडचण होत असेल तर युती वेळीच तोडून टाकणे हिताचे ठरले असते. त्यासाठी भरपूर वेळ हाती होता. युती तोडायची तर आहे, पण तसा निर्णय घेणे लांबणीवर टाकायचे ही शैली नरसिंह राव किंवा मनमोहनसिंग यांना शोभून दिसली असती. मोदींना नाही. वेळीच निर्णय झाला असता तर या निर्णयाचे बरेवाईट परिणाम भोगायला कार्यकर्ते मोकळे झाले असते. मुख्य म्हणजे जनतेच्या मनातील संभ्रम संपला असता. आज महाराष्ट्रातील जनतेमध्ये युतीबद्दलच्या संतापात भर पडत चालली आहे. युतीच्या सुदैवाने काँग्रेसी कारभारावरची नाखुशी ही एकमेकांना कमालीचे पाण्यात पाहणा-याभाजप-शिवसेनेवरील रागापेक्षा अधिक असल्याने जनता राग गिळते आहे. मात्र हे फार काळ चालणार नाही. मतदारांना अपमानित करणे युतीला झेपणार नाही.