आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताचे नवनिर्माण! ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या व दुस-या महायुद्धाच्या कालावधीत ‘मेड इन जर्मनी’ ही घोषणा विशेष प्रभावी होती. जर्मनीमध्ये उत्पादित होणा-या टाचणीपासून ते रणगाड्यांपर्यंत कोणत्याही वस्तू या दर्जेदारच असणार हा विश्वास जगभरात निर्माण झालेला होता. दुस-या महायुद्धात क्रूरकर्मा हिटलरचा पराभव झाल्यानंतर जर्मनीची पूर्व व पश्चिम जर्मनी अशी विभागणी जेत्या राष्ट्रांनी केली. त्यामुळे व्हायचा तोच परिणाम झाला.
वस्तुनिर्मितीतील जर्मनी या देशाचे असलेले प्राबल्य कालांतराने कमी होत गेले. अमेरिकेच्या उद्योगविश्वाचा व वस्तुनिर्मितीचा दबदबा या काळात होताच; परंतु त्यावर जर्मनीच्या दर्जेदार उत्पादन निर्मितीचे जे सावट होते ते दूर झाल्यानंतर अमेरिकेला हायसे वाटले होते. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील वस्तूंच्या उत्पादनांमध्ये क्रांती घडवून आणत १९६० नंतर जपानने जागतिक बाजारपेठ काबीज केली. त्यामुळे ‘मेड इन जपान’ या वाक्याला अतोनात महत्त्व प्राप्त झाले.
अगदी अमेरिकी उद्योगांनाही त्याचा फटका बसून जपानमधील उत्पादने खरीदण्याची चढाओढ जणू अमेरिकेसह बहुतांश देशांतील नागरिकांत लागली. याचे कारण जपानची उत्पादने दर्जेदारच असतात, अशी मनोधारणा जागतिक ग्राहकांची तयार झाली होती. ती आजही कायम आहे. स्वातंत्र्यपूर्व काळानंतर भारताने काही क्षेत्रांत लक्षणीय तर काही क्षेत्रांत माफक प्रगती केली आहे. परंतु देशातील दर्जेदार वस्तू उत्पादनाबाबत सर्वंकष विचार करायचा झाला तर त्याच्या चीनसारख्या विद्यमान स्पर्धक देशांच्या तुलनेत भारत मागे आहे. हे वास्तव लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतातील हवाई वाहतूक, वाहननिर्मिती, पर्यटन अशा सुमारे २५ क्षेत्रांमध्ये भरीव गुंतवणूक करावी म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी साद घातली आहे.
विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हेच ‘मेक इन इंडिया’चे एकमात्र उद्दिष्ट नाही. यूपीए सरकारच्या दुस-या कारकीर्दीत देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधानपदी असूनही केंद्र सरकारच्या अनेक धोरणांमध्ये विसंगती निर्माण झाली होती. अनेक घोटाळे उघडकीस येत होते. त्यामुळे केंद्र सरकारची पुरती नाचक्की झाली होती. त्याबद्दल भारतातील बलाढ्य उद्योगसमूहांमध्ये नाराजी होती. त्याच्या परिणामी या उद्योगसमूहांनी भारतात गुंतवणूक करण्यापेक्षा विदेशांतील उद्योगांत गुंतवणूक करून आपला विस्तार करण्याचा सपाटा लावलेला होता. देशातील आर्थिक, राजकीय स्तरावरील अस्थिरता संपुष्टात येऊन गुंतवणूकदारांसाठी साहाय्यभूत वाटेल, असे वातावरण निर्माण होण्याची गरज होती.
चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांत ‘अच्छे दिन आने वाले हैं’चा नारा देणा-या नरेंद्र मोदींच्या भाजपला मतदारांनी बहुमताने निवडून दिले. गेली दहा वर्षे काँग्रेसला दिलेली साथ सोडून भारतातील बहुतांश उद्योगसमूह नरेंद्र मोदी यांच्या पाठी या निवडणुकीत ठामपणे उभे राहिले होते ते याच भावनेतून. आपल्याला मदतीचा हात देणा-या भारतीय उद्योगसमूहांच्या भल्यासाठीही चार पावले टाकणे हे नरेंद्र मोदींसाठी आता अटळ राजकीय कर्तव्य होऊन बसले आहे. अशा सा-या संमिश्र भावनांची गुंफण असलेली ‘मेक इन इंडिया’ मोहीम सुरू करून मोदींनी ‘अच्छे दिन आने वाले हैं’ असा संकेत भारतीय उद्योगांनाही दिला आहे. भारतीय उद्योग विदेशांत करीत असलेली गुंतवणूक पुन्हा मायदेशाकडे वळवण्याचा निर्धारही या मोहिमेमागे आहेच.
‘एफडीआय म्हणजे फर्स्ट डेव्हलप इंडिया’ या नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रतिपादनातूनही हे सूत्र सहजी गवसू शकते. ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेबाबत सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया व चीन या देशांतून विशेष उत्सुकता दाखवली गेली. सिंह हा "मेक इन इंडिया'चे बोधचिन्ह आहे. सिंहाची झेप ही मोठी असते. सर्व वन्य प्राण्यांचा राजा म्हणून सिंहाची ओळख आहे. प्रतीक म्हणून हे सारे ठीक आहे. परंतु "मेक इन इंडिया'सारख्या मोहिमा संपूर्ण यशस्वी होण्यासाठी तसेच नव्या अर्थप्रवाहांना चटकन सामावून घेण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारला भारतीय अर्थव्यवस्थेच्या रचनेत काही नवे बदल करावे लागतील. मात्र ते करताना देशाच्या अर्थव्यवस्थेतील पूर्वीच्या सा-याच प्रथा कालबाह्य ठरलेल्या आहेत, असा सूर नरेंद्र मोदी सरकारने लावू नये.
भारतापेक्षा अनेक क्षेत्रांत अधिक प्रगती केलेल्या चीनने आपल्या उत्पादननिर्मितीचा दर्जा वाढवण्याकरिता अद्ययावत तंत्रज्ञान आयात करण्यासाठी तसेच संशोधन व विकासाला गती देण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्याची भारताने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे होते. "मेक इन इंडिया' या मोहिमेद्वारे ती सजगता मोदी सरकारने दाखवली असली तरी त्यात ढिसाळपणा येता कामा नये. नाही तर अच्छे दिन यायची काही शाश्वती नाही!