आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मालामाल’ कंगाल! ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘माल है तो ताल है वरना तू कंगाल है, देखते ही देखते कमाल हो गया, कल का कंगाल मालामाल हो गया...मालामाल...मालामाल’ हे गाणे आहे नसिरुद्दीन शाह, सतीश शहा यासारख्या कसलेल्या कलाकारांनी उत्तम अभिनय केलेल्या ‘मालामाल’ या विनोदी चित्रपटातले. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर ब-याच काळाने म्हणजे २००६ साली ‘मालामाल विकली’, २०१२ साली ‘कमाल धमाल मालामाल’ असेही काही चित्रपट प्रदर्शित झाले.
माणसाने बेफाट मार्गाने अफाट संपत्ती गोळा केली की, सारी सुखे व त्याचबरोबर काही दु:खेही त्याच्या वाट्याला येतात हेच नर्मविनोदी शैलीतून या चित्रपटांत दाखवण्यात आले होते. भारतातील सा-याच जुन्या, नव्या राजकारण्यांनी बहुधा हेच चित्रपट पाहून आयुष्यात कसे मालामाल बनावे हा कित्ता गिरवला असावा! ६६.६५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री व अण्णाद्रमुक पक्षाच्या प्रमुख जयललिता यांच्यासह चार जणांना बंगळुरूच्या विशेष न्यायालयाने चार वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली असून १०० कोटी रुपयांचा दंडही केला आहे. म्हणजे जेवढे पैसे गैरमार्गाने जयललितांनी जमा केले, त्याची व्यवहारी भाषेत व्याजासकट भरपाई देण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे! जयललितांवरील हा खटला दाखल झाल्यानंतर त्याचा निकाल तब्बल १८ वर्षांनी लागला!! राजकारणात प्रवेश केल्यानंतर फक्त मालामाल होण्याचीच स्वप्ने बघणा-या बेरकी तसेच घोटाळेबाज नेत्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा व त्यांना जरब बसवणारा हा न्यायालयीन निकाल आहे.
मुख्यमंत्रिपदावर असताना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून न्यायालयाने शिक्षा सुनावून थेट तुरुंगात रवानगी झालेल्या जयललिता या देशातील पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यामुळे लालूप्रसाद यादव, मधू कोडा, बी. एस. येदियुरप्पा, ओमप्रकाश चौटाला, जगन्नाथ मिश्रा या माजी मुख्यमंत्र्यांनाही तुरुंगाची हवा खावी लागली होती. पण जयललितांनी सर्वांवर कडी केली आहे! महाराष्ट्रात लवकरच होणा-या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व मुख्य पक्षांनी स्वबळावर लढवण्याचे ठरवले. या पक्षांच्या नेत्यांमध्ये एक समानता ही आहे की, त्यांच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये झालेली प्रचंड वाढ ही ‘स्वबळावरच’ झालेली आहे! त्याचा सारा तपशीलच आम्ही ‘दिव्य मराठी’च्या रविवारच्या अंकात प्रसिद्ध केला होता. अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील यासारख्या नेत्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी त्यांच्या नावे शेतजमीन मात्र थोडकी असून त्यांची एकूण मालमत्ता व उत्पन्न अचंबित करणारे आहे. छगन भुजबळ यांची एकूण मालमत्ता २००४ साली १ कोटी ९१ लाख इतकी होती. पण त्यानंतर दहा वर्षांत ही मालमत्ता २१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
राजकीय नेत्यांच्या संपत्ती वाढीचा हा जो ‘झपाटा’ ऑर्केस्ट्रा सुरू आहे त्याचे प्रयोग त्यांना कधीही अडचणीत आणू शकतात! अमेरिका व पाश्चात्त्य देशांत राजकीय नेत्यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नातील प्रत्येक पैशाचा चोख हिशेब सरकारी यंत्रणेला द्यावा लागतो. तेथील नेत्यांनी जर बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचे उघडकीस आले तर वेळेत न्यायालयीन निकाल लावून त्यांना कडक शिक्षा सुनावल्या जातात. त्या देशांतील जनता या भ्रष्ट नेत्यांना खणखणीत जाब विचारून त्यांची राजकीय कारकीर्दच संपुष्टात आणते. भारतामध्ये राजकारण्यांनी फार संपत्ती गोळा करू नये असा एक विक्षिप्त साधनशुचितावादी विचार घुमत असतो. पण राजकारण्यांनी योग्य मार्गाने व्यवसाय करून आपली संपत्ती वाढवायला काहीच हरकत नाही. पण असे संत राजकारणी भारतात फारसे आढळत नाहीत! महाराष्ट्रात शिवाजीराव निलंगेकर, बॅ. ए. आर. अंतुले, अशोक चव्हाण आदी मुख्यमंत्र्यांना त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदावरून घालवले होते. कर्नाटकात घोटाळेबाज तत्कालीन मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना भाजपच्या पक्षप्रमुखांनी घरचा रस्ता दाखवला होता. केंद्रीय पक्षश्रेष्ठींबद्दल कोणाचीही कितीही नाराजी असली तरी त्यांच्या दरा-यामुळे किमान अशी कारवाई तरी होते. विविध राज्यांत सध्या जे प्रादेशिक पक्ष सत्तेवर आहेत त्यांच्या राजकीय नेत्यांनी कितीही भ्रष्टाचार केला तरी त्या पक्षांचे प्रमुख तिकडे सोयीस्कर कानाडोळा करतात. जयललिता या स्वत:च पक्षप्रमुख असल्याने तिथे तर काही बोलायची सोयच नव्हती. महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांनी जमवलेल्या बेहिशेबी संपत्तीचा नंगानाच आता खुलेआम पाहायला मिळणार आहे. त्यातून काही पक्षांच्या पदरात सत्तेचे दान पडेल, परंतु जनतेचे काडीचेही भले त्यातून होणार नाही. त्यामुळे हे पक्ष व नेते कितीही ‘मालामाल’ असले तरी नैतिकतेच्या दृष्टीने ते ‘कंगाल’ आहेत हेच सत्य मागे उरते!