आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिभीषणाचे वंशज ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंकादहन करायचे असल्यास काही बिभीषण निश्चितच आवश्यक असतात, असे विधान भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस हे प्रामाणिक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचाराला वजन येण्यासाठी फडणवीस हाच योग्य चेहरा असल्याचे मानले जाते. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात विधानसभेत फडणवीस यांनीच आवाज उठवला.
कागदपत्रांच्या आधारे टीका करणे हा त्यांचा गुण. त्याला व्यक्तिगत स्वच्छ चारित्र्याची जोड मिळाली होती. यामुळेच सरकारविरोधातील त्यांच्या कडव्या मा-याला विश्वासार्हता मिळाली. अन्य नेत्यांबद्दल तोडपाण्याच्या गोष्टी बोलल्या जात असताना फडणवीस त्यांच्या स्वच्छ वागणुकीमुळे उठून दिसायचे. अशा फडणवीसांना पक्षासाठी असली विधाने करायची वेळ यावी याहून दुर्दैवी परिस्थिती नाही. फडणवीसांनी ज्यांच्याकडून राजकारणाची मुळाक्षरे गिरवली ते नितीन गडकरी अशी विधाने करण्यात प्रसिद्ध आहेत.
उपयुक्तता या एकमेव निकषावर गडकरींचे राजकारण चालत असल्याने त्यांच्या असल्या युक्तिवादाकडे जनता गंभीरपणे पाहत नाही. फडणवीस यांचे तसे नाही व ज्यांच्या जिवावर ते मते मागणार आहेत, त्या मोदींनीही असले युक्तिवाद केलेले नाहीत. परंतु सध्या भाजपचा सगळा कारभार विपरीत पद्धतीने चालू असल्याने कुठे काय बोलावे हे नेत्यांना समजत नाही असे झाले आहे. लोकसभा निवडणुकीतील मतांची संख्या पाहता खरे तर "शत-प्रतिशत भाजप' ही घोषणा प्रत्यक्षात आणण्याची संधी स्थानिक नेत्यांना होती.
राज्यातील नेते एकजुटीने उभे राहिले असते व युती तोडण्याचा निर्णय महिनाभरापूर्वीच घेतला असता तर चित्र वेगळे दिसले असते. मात्र मोदींच्या करिश्म्यावर भाजपचाच विश्वास नसावा अशा रीतीने पावले पडत गेली. अन्यथा पाचपुते, गावित अशासारख्यांना पक्षाची दारे उघडी करण्याचा निर्णय घेतला गेला नसता. राजकीय व्यूहनीती म्हणून अशा गोष्टी कराव्या लागतात असाही युक्तिवाद फडणवीस यांनी केला आहे. परंतु यातून भाजपची अगतिकता किंवा सत्तेसाठीची व्याकूळता फक्त दिसते. यामध्ये नीती कोणतीही नाही. लोकसभा निवडणुकीनंतर जे वेगळे वारे राज्यात वाहू लागले होते, जनतेमध्ये निवडणुकीबद्दल उत्साह होता; पण नेत्यांच्या अशा युक्तिवादामुळे तो कमी होण्याचा संभव आहे.

बिभीषणाची उपमा देताना फडणवीस यांची गल्लत झाली असे म्हणावे लागते. रामायणातील त्या घटनेचा असा उपयोग निदान फडणवीस यांच्याकडून अपेक्षित नव्हता. रामायणातील युद्ध मुळात एका तत्त्वासाठी होते. ते अन्यायाविरुद्ध होते. तत्त्व शुद्ध असल्यामुळे बिभीषणाचे वर्तन फितुरीत गणले गेले नाही. रामाकडून वालीचा झालेला वध ही फसवणूक होती असे सकृतदर्शनी वाटले तरी त्यामागचा मूळ हेतू शुद्ध असल्याने तो वधही रामासाठी पापाचरण मानले गेले नाही. इथे भाजप कसले तत्त्वाचे राजकारण करीत आहे? कोणत्या तत्त्वासाठी पाचपुते वा गावित अशांना पक्षात आणले? इथे तत्त्व फक्त सत्ता मिळवणे इतकेच आहे. तत्त्वशून्य राजकारणासाठी बिभीषणाला वेठीस धरणे हे हिंदुत्व मानणा-यांना तरी शोभत नाही. फडणवीस ज्यांचा गौरव करतात ते बिभीषणाचे वंशज नसून संधीसाधू आहेत.

अर्थात तत्त्वाच्या गोष्टी आजकाल सर्वच पक्षनेत्यांच्या तोंडी शोभू लागल्या आहेत. कोणत्या तत्त्वासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसची साथ सोडली हे जनतेला कळलेले नाही. आघाडी मोडण्याइतका पृथ्वीराज चव्हाण यांचा नेमका दोष काय, हे राष्ट्रवादीला सांगता आलेले नाही. शिवसेनेने १५० जागांचा आग्रह धरला तो कोणत्या तत्त्वातून हे स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेची मतसंख्या व जागांची मागणी ही एकमेकांना जुळणारी नाहीत तरीही हट्टाग्रह कायम होता. युती तुटल्यावर केंद्रातील सत्तेतून का बाहेर पडत नाही, असा सवाल राज ठाकरे करू शकतात आणि या सवालामुळे धास्तावलेले उद्धव ठाकरे ताबडतोब गिते यांना राजीनामा देण्यास सांगतात. शिवसेना सत्तेला कशी चिकटून आहे हे राज ठाकरे यांना सांगायचे असेल; पण पायाखाली काय जळत आहे हे त्यांना दिसत नाही असे म्हणावे लागते. कारण नाशिकमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसशी मनसेची झालेली युती हे कोणत्या तत्त्वाचे राजकारण आहे, असा सवाल जनतेने विचारला तर राज ठाकरेंकडे काय उत्तर आहे? नाशिकमधील सत्ता जाणार हे लक्षात आल्यावर मनसे हा पक्ष राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर बसणार; पण निवडणुकीत त्याच पक्षांवर तोंडसुख घेत महाराष्ट्राला नवे व्हिजन देण्याची भाषा करणार, यातील विसंवाद लोकांच्या सहज लक्षात येतो. पण तरीही हे सर्व नेते अशी भाषा पुढील काही दिवस बोलत राहणार. संख्याबळ मिळवणे
या एकमेव उद्देशाने सर्वकाही चालू आहे. निव्वळ राजकीय स्वार्थ यापलीकडे त्यामागे काहीही नाही.