आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा स्वच्छ भारत ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वच्छ भारत मोहिमेला हात घालून शिवधनुष्य उचलण्याचा खटाटोप पंतप्रधान मोदी करीत आहेत. अशा मोहिमा यशस्वी ठरलेल्या नाहीत. कारण सार्वजनिक स्वच्छतेची जाणीव भारतीयांमध्ये रुजलेली नाही. व्यक्तिगत स्वच्छतेबद्दलच जिथे फारशी आस्था नसते तेथे सार्वजनिक स्वच्छतेचा गंभीरपणे विचार होऊच शकत नाही. यामुळेच सार्वजनिक स्वच्छतेचे काम करणा-यांना हलकी वागणूक या समाजाने दिली. समाजातील या महान दोषाकडे महात्मा गांधींनी प्रथम लक्ष वेधले व स्वच्छतेचा नित्यक्रमात समावेश केला. हातात झाडू धरून रस्ते स्वच्छ करणे ही गोष्ट स्वातंत्र्यलढ्याने भारलेल्या काळात अगदीच अळणी वाटली असणार. परंतु त्यातून जातिभेद नष्ट करण्याचा संदेशही जात होता. महात्माजींचे लक्ष फक्त स्वातंत्र्यलढ्याकडे नव्हते तर राष्ट्रबांधणीकडे होते. नैतिक राष्ट्रबांधणीची पहिली खूण स्वच्छतेमध्ये पटते.
स्वत: गांधी अतिशय साधे राहत, पण त्यामध्ये गबाळेपणा नसे तर टापटीप असे. त्यांच्या आश्रमातील स्वच्छ वातावरण आजही मनावर प्रभाव टाकून जाते. स्वच्छ परिसर माणसाच्या मनावर थेट परिणाम करतो. त्याला अंतर्मुख करतो. परदेशात गेल्यावर तेथील स्वच्छता व टापटीप पाहून आपले नगरसेवकही भारावून जातात. मात्र आपल्या शहरातही स्वच्छता व टापटीप हे गुण आणावेत असे त्यांना कधी वाटत नाही. तशी मोहीम हाती घेणे दूरच राहिले. नरेंद्र मोदींनी मात्र स्वच्छता मोहीम हाती घेतली. याबाबत त्यांनी पूर्वीच निर्णय घेतला होता, हे वाराणसीतील भाषणातून कळले होते. संपूर्ण देशाच्या आचरणात स्वच्छता आणणे हे अतिशय अवघड काम आहे. याची पूर्ण कल्पना असूनही ते हाती घेण्यात मोदींच्या नेतृत्वाचे वेगळेपण आहे. आर्थिक पुनर्रचना, कायद्यातील बदल, नवी गुंतवणूक, शास्त्रीय शोध, आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती अशा कामात एकवेळ यश येऊ शकते, सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचारही एकवेळ निपटून काढला जाऊ शकतो; पण भारतीय सार्वजनिक जीवनात स्वच्छतेची अंमलबजावणी करणे अतिशय बिकट आहे.

अवघड गोष्टींना हात घालून त्या तडीस नेण्यात नेतृत्वाची कसोटी असते. मोदी यांनी स्वच्छ भारत मोहिमेतून अवघड गोष्टीला हात तर घातला आहे. ही मोहीम तडीस कशी नेली जाणार याबद्दल उत्सुकता आहे. नीटनेटक्या आकर्षक कपड्यात हातात झाडू घेऊन गांधी जयंतीला स्वच्छतेचा उद्घोष करणे सोपे आहे. त्यामध्ये सातत्य राखण्यासाठी अपार कष्ट करावे लागतील. वर म्हटल्याप्रमाणे हा मानसिकता बदलण्याचा प्रश्न आहे व ती बदलण्यासाठी काही कठोर पावले उचलावी लागतात. प्रसंगी लोकप्रियतेला तिलांजली द्यावी लागते. मात्र ती सर्वथैव अशक्य गोष्ट नाही. दिल्ली मेट्रोचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. दिल्ली कमालीचे अस्वच्छ स्टेशन होते व अद्यापही आहे. पण मेट्रोची स्थानके अतिशय स्वच्छ असतात.
नियमांची कठोर अंमलबजावणी केल्यावर दिल्ली मेट्रोमध्ये अस्वच्छता करण्याची हिंमत कोणालाही झाली नाही. नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली तर भारतीय सवयी बदलतात असा अनुभव आणीबाणीत आला होता. अप्रिय होण्याचा धोका टाळण्यासाठी नेते अशी अंमलबजावणी होऊ देत नाहीत. लोकांच्या सवयी बदलण्यापेक्षा प्रशासनाला हाताशी धरून मोदींना ही मोहीम तडीस न्यावी लागेल. स्वच्छतेला प्रशासनामध्ये अग्रक्रम नाही. तसा तो मिळाला तरी ब-याच गोष्टी साध्य होऊ शकतात. महात्माजींची स्वच्छता ही व्यक्तिगत आरोग्य व नैतिक आचरणासाठी होती. मोदी याकडे व्यवहार म्हणूनही पाहतात. भारतात पर्यटन वाढवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अस्वच्छता हा पर्यटनवाढीतील मोठा अडसर आहे. युरोप-अमेरिकेसारखी स्वच्छता सर्वत्र दिसली तर केवळ आंतरराष्ट्रीयच नव्हे तर देशांतर्गत पर्यटनही वाढू शकते. कचरा व्यवस्थापनातून अनेक बाय-प्रॉडक्ट निघू शकतात. मोदींचे त्याकडेही लक्ष आहे. किंबहुना भारतातील कचरा व्यवस्थापन हा करिअरचा विषय होऊ शकतो, असेही ते म्हणाले व त्यामध्ये तथ्य आहे. स्वच्छतेमुळे सार्वजनिक आरोग्यावरील खर्च बराच कमी होऊ शकतो व तो पैसा अन्यत्र वापरता येतो. तेव्हा स्वच्छतेकडे मोदी आर्थिक नजरेनेही पाहत आहेत व आजच्या काळात ते स्वागतार्हही आहे. तथापि या पुढच्या गोष्टी झाल्या. पहिल्या टप्प्यात स्वच्छता ही खर्चिक असते. शौचालये बांधून देणे सोपे आहे, पण त्यांची निगराणी राखणे महाग असते. गावांतील शौचालयांची निगराणी ग्रामपंचायती ठेवू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आज स्वच्छ भारतासाठी सुमारे ६७ हजार कोटी रुपये लागणार आहेत. केवळ शौचालये बांधून, जाहिराती करून ही समस्या सुटणारी नाही. शौचालयांची निगराणी, कच-याची विल्हेवाट, त्यासाठी लागणारी जमीन व तंत्रज्ञान या सगळ्यासाठी पैशाची मोठी तरतूद करावी लागेल. मात्र प्रत्येक भारतीयाने जिद्दीने हातभार लावला तर हे अशक्य नाही.