आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवानगडावरचे संकेत ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाचे धोरण आणि रोख काय असेल, याचे संकेतच दस-यानिमित्त भगवानगडावर झालेल्या मेळाव्यातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या निवडणूक प्रचाराची सुरुवात शनिवारी बीडमधूनच व्हावी, हे त्या संकेतांचीच पुष्टी करणारे आहे. विजयादशमीला अर्थात दस-याला भगवानगडावर जाऊन जनसमुदायाला संबोधित करण्याचा पायंडा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पाळला होता. जोपर्यंत जिवात जीव आहे तोपर्यंत दस-याला भगवानगडावर येणे टाळणार नाही, असे वचनच त्यांनी भगवान भक्तांना आणि त्यांच्या चाहत्यांनाही दिले होते. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतरच्या या पहिल्याच मेळाव्याला विशेष भावनिक महत्त्व होते. ते ओळखून अमित शहा यांनी या मेळाव्याला आवर्जून हजेरी लावली.
गोपीनाथरावांना नरेंद्रभाईंनी ग्रामीण विकास खाते देऊन कसे महत्त्व दिले होते, हे त्यांनी चौंडीनंतर या ठिकाणी पुन्हा सांगितले. भगवानगडाविषयी एका मोठ्या जनसमुदायाच्या मनात असलेल्या श्रद्धेची कल्पना आल्यामुळे या गडाचे महत्त्व आणखी वाढवण्यासाठी आम्ही शक्य ती सर्व मदत करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. पंकजा यांच्याविषयी या जनसमुदायाच्या मनात असलेले प्रेम आणि सहानुभूतीची भावना कॅश करण्याचाही त्यांनी खुबीने प्रयत्न केला. तुमच्या मनात काय आहे हे मला माहिती आहे आणि आम्ही त्याची नक्की दखल घेऊ, असे सूचक विधान त्यांनी केले. त्याचा अर्थ त्यांनी पंकजा यांना मुख्यमंत्री करण्याचे सुचवले आहे, असा काढता येणार नाही. इतक्या लवकर अशा घोषणा करण्याइतके, नव्हे संकेत देण्याइतके अमित शहा अपरिपक्व राजकारणी नक्कीच नाहीत. तरीही भावनेवर जगणा-या समुदायाला त्यांच्या विधानाने नवी ऊर्जा नक्कीच मिळाली आहे. ही ऊर्जा भारतीय जनता पक्षाच्या गाडीला महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्चीपर्यंत न्यायला नक्कीच उपयोगी पडेल, असे शहा यांचे गणित असावे.

गेली २५ वर्षे महाराष्ट्रात असलेली युती तोडण्यामागे अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे दोघे गुजराती नेते आहेत, असे सांगत शिवसेनेने गुजराती विरुद्ध मराठी असा अस्मितेचा मुद्दा पुढे आणला आहे. पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींनाही ब-याचदा टीकेचे लक्ष्य करण्याचा प्रयत्न शिवसेना नेत्यांकडून होतो आहे. ज्या मोंदी प्रभावाच्या भरवशावर शिवसेनेशी काडीमोड घेण्याचे धाडस भाजपच्या नेत्यांनी दाखवले त्याच मोदींच्या प्रतिमेला त्यामुळे तडा जाण्याची भीती त्यांना आता वाटू लागली आहे. मराठी माणूस व्यवहारापेक्षा भावनेला अधिक महत्त्व देत असल्यामुळे आणि मराठी बाणा हा त्याच्या भावनेचा मुद्दा असल्यामुळे शिवसेनेच्या प्रचारावर भावनांनीच मात करण्याची भाजपची रणनीती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूतीची भावना त्यासाठी ते वापरू इच्छितात. मोदींच्या प्रचारसभांच्या प्रारंभासाठी बीडची केलेली निवड त्या रणनीतीचाच भाग आहे.
गोपीनाथ मुंडे ओबीसी समाजाचे नेते होते, हे सांगत असतानाच शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील ओबीसी आहेत, याची आठवण महाराष्ट्राला करून दिली. मराठी विरुद्ध गुजराती या शिवसेनेने उपस्थित केलेल्या अस्मितेच्या मुद्द्याला शहा यांनी चलाखीने दिलेले हे उत्तर आहे. गोपीनाथ मुंडे आणि अन्य ओबीसी नेत्यांमुळे या वर्गाची अस्मिता अधिक तीव्र बनली आहे.
महाराष्ट्रात इतर मागास वर्गांची संख्या लक्षात घेता मराठी विरुद्ध गुजराती या मुद्द्यापेक्षा पंतप्रधान ओबीसी असण्याचा मुद्दा या निवडणुकीत अधिक प्रभावी ठरू शकतो आणि तीच भाजपची रणनीती असेल, याचेही संकेत शहा यांनी दिले आहेत. पंकजा मुंडे यांच्या रणनीतीकडेही यानिमित्ताने लक्ष वेधले गेले आहे. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतरचा पहिलाच मेळावा असल्याने भगवानगडावर मोठा जनसमुदाय येईल याची त्यांना कल्पना होती. हा सारा जनसमुदाय गोपीनाथरावांनंतर आपल्या पाठीशी उभा आहे हे त्यांना यानिमित्ताने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दाखवून द्यायचे होते. केवळ मराठवाड्यातूनच नाही, तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या लोकांना हात वर करायला लावून त्यांची हजेरी पंकजा यांनी अधोरेखित केली. त्यातून आपल्याकडे केवळ गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून नव्हे, तर या मोठ्या जनसमुदायाची नेता म्हणून पाहिले जावे आणि त्या अनुषंगाने योग्य ते स्थान पक्षात आणि सत्तेतही मिळावे, हेच पंकजा यांना नेत्यांपर्यंत पोहोचवायचे होते. अमित शहा यांच्यापर्यंत तर ते नक्कीच पोहोचले आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपचे सरकार आले तर पंकजा यांना त्या सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान नक्कीच असेल. अर्थात, त्यासाठी भाजपचे सरकार बनेल का, या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहावी लागणार आहे.