आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्मितेचा ज्वर ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रात सध्या अस्मितेचा ज्वर वेगाने फैलावत आहे. भ्रष्टाचार हटवण्यासाठी होणारी निवडणूक आता अस्मितेच्या मुद्द्यावर लढवली जात आहे. एकदा अस्मिता उफाळून आली की शब्दांचे आपटबार फुटू लागतात. शिवसेना-भाजपची युती तुटली, तेव्हाच याची चाहूल लागली होती. भाजपने ज्या पद्धतीने युती तोडली ती पाहता शिवसेनेचा राग उफाळून येणार हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची गरज नव्हती. गेली काही वर्षे सेना जरा मंदावली होती.'सामना'तून वाघाच्या डरकाळ्या अधूनमधून उठत. या डरकाळीने १८ टक्क्यांहून अधिक मते कधीही मिळवली नसली, तरी ही डरकाळी लोकप्रिय होती व मराठी मनाला त्याचा आधार वाटे. शिवसेनेचे मतदार कमी असले, तरी सेनेबद्दल आस्था असणारे बहुसंख्य आहेत. या आस्थेपोटीच मोदी लाटेमध्ये शिवसेनेचीही मते वाढली. लोकसभेतील प्रतिसाद पाहता विधानसभेत भगवा फडकणार हे निश्चित मानले जात होते; परंतु कर्माच्या गती गहन असतात, या महाभारतातील वचनाचा प्रत्यय अचानक आला व दोन्ही पक्षांच्या कर्मदरिद्री हटवादीपणामुळे युती तुटली. युती तुटण्याचा लगोलग झालेला परिणाम म्हणजे शिवसेनेमध्ये पुन्हा त्वेष आला. पक्षातील मरगळ गेली. भाषेमध्ये जोम आला. उद्धव ठाकरेंना जे जमले नव्हते ते परिस्थितीने घडवून आणले व सेना ही सेनेसारखी वागू-बोलू लागली.

अडचणीत सापडला की मराठी माणूस जे करतो तेच शिवसेनेने केले व ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या अस्तित्वावर घाला असल्याची हाळी दिली. हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावून घेणारा भारतीय जनता पक्ष सेनेच्या निशाण्यावर आला. गेली पाच वर्षे गावोगावी फिरून कशासाठी पायाभरणी केली होती, हेच उद्धव ठाकरे विसरले व सेनेच्या हल्ल्यातून काँग्रेस व राष्ट्रवादीची सुटका झाली. भाजपला अडचणीत आणण्यासाठी सेनेने ठेवणीतील हत्यार उपसले. मुंबई हातातून जाणार अशी नुसती आवई उठली, तरी मराठी माणूस कासावीस होतो. शिवसेनेने आवईचे रूपांतर घोषणेत केले. अशीच आवई उठवून काँग्रेसने एकेकाळी शिवसेनेला मुंबईत जीवदान दिले होते. ती आठवण ठेवून काँग्रेस व राष्ट्रवादीने त्यामध्ये सूर मिळवला. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जेरीस आलेल्या या दोन पक्षांसमोर मतदारांचे लक्ष दुसरीकडे नेण्याची सुवर्णसंधीच चालून आली. आवईचे रूपांतर हळूहळू लाटेत होत भाजप त्यामध्ये सापडला. भाजपचे राज्यातील नेतेही इतके शामळू की वेगळा सूर लावण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही. अमित शहांना नमवण्याची ताकद यांच्यात आहे, हे स्थानिक नेत्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवले नाही. उलट काँग्रेसजन जसे गांधी घराण्यासमोर लीन होतात, तसाच प्रकार भाजपमध्ये झाला. शेवटी या प्रचाराला उत्तर देण्याची वेळ स्वत: मोदींवर आली. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणी दाखवू शकत नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली; पण त्यामुळे वातावरणात बदल होणार नाही. अस्मितेचा ज्वर आता इतका चढला आहे की राज्याचा विकास, आर्थिक गुंतवणूक, रोजगार असे महत्त्वाचे विषय मागे पडले आहेत. अस्मिता हे कित्येक अश्वशक्तीचे इंजिन असते; पण ते कोणत्या मार्गाने चालवायचे हे माहीत नसले, तर ही शक्ती फुकट जाते. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात वारंवार असे घडले आहे. मुंबई जाणार म्हणताच कासावीस होण्याची वेळ मराठी माणसावर येते. कारण मुंबईसारखी आणखी दहा शहरे राज्यात उभारण्यात मराठी राज्यकर्त्यांना अपयश आले.

अस्मितेची ताकद योग्यरीतीने वापरली असती, तर अशी शहरे उभी राहिली असती. मग रोजगार, विकास हे प्रश्नही वेगळ्या पातळीवर हाताळले गेले असते. अस्मितेची ऊर्जा निर्मितीसाठी वापरली गेली नाही. त्यातून केवळ अहंकार जोपासला गेला. याला सर्व पक्ष जबाबदार आहेत. अस्मितेची ऊर्जा कशी वापरायची याचे उदाहरण हवे असेल, तर इस्रोच्या कामगिरीकडे पाहावे. मंगळावरची भारताची झेप यशस्वी झाल्यावर अमेरिकेतील पुरोगामी म्हणवल्या जाणा-या न्यूयॉर्क टाइम्ससारख्या वृत्तपत्रात खोडसाळ व्यंगचित्र काढून भारताला हिणवण्यात आले होते. अमेरिकेपेक्षा कित्येक पट कमी पैशांत, पहिल्याच प्रयत्नात मिळवलेले यश गो-या कातडीचा गंड असणा-यांना रुचले नव्हते. मात्र, या व्यंगचित्रावर अशी काही सडकून टीका झाली की न्यूयॉर्क टाइम्ससारख्या बलाढ्य वृत्तपत्राला जाहीर माफी मागावी लागली. कर्तृत्वातून, निर्मितीतून आलेली अस्मिता महासत्तेलासुद्धा नमते घेण्यास भाग पाडते.
महाराष्ट्राला अशा अस्मितेची परंपरा होती. परकीय राजवटींना झुगारण्याची हिंमत फक्त याच मातीने दाखवली. मग तो शिवकाल असो वा स्वातंत्र्यलढा असो. देशातील प्रमुख राजकीय व सामाजिक विचारधारांची गंगोत्री हाच प्रदेश आहे; परंतु त्या वेळची अस्मिता इस्रोप्रमाणे निर्मितीक्षम होती. मराठी मनाला अशा निर्मितीक्षम अस्मितेची गरज आहे, अस्मितेच्या ज्वराची नव्हे.